Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

अकोल्याचे जलसंकट टळले महान व दगडपारवा धरणातील जलसाठा वाढला
अकोला, २९ जून/प्रतिनिधी

रविवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे अकोला जिल्ह्य़ातील महान आणि दगडपारवा येथील धरणांमधील जलसाठय़ात वाढ झाली आहे. महानच्या धरणात ६ इंच तर दगडपारवा येथे ०.६२ टक्के जलसाठा वाढला असून, यामुळे पाणीटंचाईचे संकट तूर्त टळले आहे. रविवारी दिवसभर झालेल्या पावसाने सर्वाना दिलासा दिला. पावसामुळे शेतीच्या रखडलेल्या कामांना वेग येणार असून पाणीटंचाईचे संकटही काही प्रमाणात दूर होणार आहे.

डॉ. आंबेडकरांच्या महानिर्वाण, जन्मस्थळाचाही घोळ
इंग्रजी माध्यमाच्या पाचवीच्या पुस्तकात चुका
चंद्रपूर, २९ जून / प्रतिनिधी
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनाचा घोळ निर्माण करणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या पाचवीच्या पुस्तकात आता त्यांच्या जन्मस्थळाचाही उल्लेख चुकीच्या पध्दतीने करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचा जावईशोध शिक्षणतज्ज्ञ लेखकाने लावला आहे. इंग्रजी माध्यमांच्या केंद्रीय शिक्षण मंडळाच्या (सीबीएससी) पाचवीकरिता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट थ्रु व्हॅल्यू एज्युकेशन हे पुस्तक अभ्यासाला आहे.

एसटीच्या भंडारा विभागात मराठवाडय़ातील उमेदवारांची वर्णी
नाना पटोले यांचा आरोप
भंडारा, २९ जून/ वार्ताहर
राज्य परिवहन महामंडळाच्या नोकर भरतीत स्थानिक उमेदवारांना डावलून मराठवाडय़ातील बेरोजगारांची वर्णी लावल्या जात असल्याचा आरोप माजी आमदार नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत केला. राज्य परिवहन महामंडळ भंडारा येथील नोकरभरतीत जाणीवपूर्वक मोठय़ा युक्तीने स्थानिक उमेदवारांना डावलले जात आहे. हा अन्याय दूर झाला नाही तर जिल्हाभर तीव्र आंदोलनाचा इशारा छावा संग्राम परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पटोले यांनी यावेळी दिला आहे.

‘पाण्याचा काटकसरीने वापर करा’
चंद्रपूर, २९जून / प्रतिनिधी

येथील इरई धरणात दीड महिने पुरू शकेल इतकाच जलसाठा शिल्लक असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी प्रदीप काळभोर यांनी केले आहे.
शहरी व ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रदीप काळभोर यांनी दिली. शहरातील पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या इरई धरणाची पाण्याची पातळी २०२ मीटर एवढी असून ५७ एम.एम. क्यूब पाणी आहे. सध्या उपलब्ध असलेल्या पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर केल्यास पाण्याचा साठा साधारणत: दीड महिने पुरू शकतो.

दहावी व बारावीतील कमी टक्केवारीतही समाधान
न.मा. जोशी
यवतमाळ, २९ जून

विद्यार्थ्यांच्या जीवनात वळणाचा केंद्रबिंदू म्हणून उल्लेख होत असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत यवतमाळ जिल्हा अमरावती विभागातील पाचही जिल्ह्य़ांमध्ये शेवटच्या म्हणजे पाचव्या क्रमांकावर राहिला आहे ही बाब सध्या शिक्षणक्षेत्रात चिंतेचा विषय झाल्याचे दिसत आहे. निकालाची टक्केवारी अमरावती, अकोला, वाशीम आणि बुलढाणा या जिल्ह्य़ांच्या तुलनेत कमी आहे पण, तुलना वगळली तर निकाल समाधानकारक आहेत, असेच म्हटले पाहिजे.

राजकीय गुन्हेगारांपासून देशाला धोका -अण्णा हजारे
पुसद, २९ जून / वार्ताहर

भ्रष्टाचाराबरोबरच राजकारणातील गुन्हेगारीसुद्धा वाढत असून दहशतवाद्यांपेक्षाही अधिक धोका या राजकीय गुन्हेगारांपासून देशाला आहे. यांच्यामुळे आज भारतीय लोकशाही धोक्यात आली आहे. वेळीच यांना प्रतिकार केला नाही तर इंग्रजांच्या जुलुमी हुकूमशाहीपेक्षा यांची क्रूर हुकूमशाही देशात येण्याचा धोका आहे, असा गंभीर इशारा ज्येष्ठ समाजसेवक भ्रष्टाचार विरोधी जनांदोलन न्यायाचे प्रणेते अण्णा हजारे यांनी पुसद येथे पत्रकार परिषदेत केला. आज सत्ताधारी आणि विरोधक कमी पडत असल्यामुळे आपली लोकशाही धोक्यात आली आहे. सत्ताधारी केवळ सत्ता जाण्यालाच भीतात.

लेखा व कोषागार संचालकांचा सेवानिवृत्तांना श्रद्धा व सबुरीचा सल्ला!
प्रश्न सहाव्या वेतन आयोगाचा

यवतमाळ, २९ जून / वार्ताहर

राज्यातील जवळपास चार लाख सेवानिवृत्ती वेतनधारकांना सहाव्या वेतन आयोग संदर्भात राज्याच्या लेखा व कोषागार संचालकांनी श्रद्धा व सबुरीचा सल्ला दिला आहे. ‘सॉफ्टवेअर’ विकसित करण्याच्या कामात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने हे काम पूर्ण झाले नाही, त्यामुळे निवृत्ती वेतनधारकांची वेतन पुनर्रचना करण्यास विलंब होत आहे त्यामुळे सहाव्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतनश्रेणी प्रमाणे जून महिन्याचे निवृत्ती वेतन अदा करता आले नाही, अशी माहिती राज्याच्या लेखा व कोषागार संचालकांनी सर्व जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांना कळवली आहे.

स्वतंत्र राज्यनिर्मिती संबंधात ५ जुलैला शेगावला संयुक्त परिषद
विदर्भ, मराठवाडा, कोकण व तेलंगणाचा सहभाग
यवतमाळ, २९ जून / वार्ताहर

स्वतंत्र राज्यनिर्मितीच्या संकल्पनेबाबत, आवश्यकता महत्त्व आणि उद्देश इत्यादीबाबत सारासार विचार करण्यासाठी विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि तेलंगणा या विभागातील काही नेत्यांची संयुक्त परिषद ५ जुलैला शेगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या आयोजनाचा पुढाकार विदर्भवादी नेते माजी मंत्री नानाभाऊ एंबडवार यांनी घेतला आहे. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून नानाभाऊ एंबडवार सक्रिय व पक्षीय राजकारणापासून अलिप्त असून त्यांनी नागपुरात अनेकदा विदर्भवादी संघटनांना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला पण, तो यशस्वी झाला नाही. छोटय़ा राज्यांच्या निर्मितीची आवश्यकता प्रतिपादन करताना त्यात अडथळे कोणते आहेत, अशा प्रकारच्या छोटय़ा राज्यनिर्मितीसाठी मराठवाडा, कोकण विभागात कोणता विचारप्रवाह आहे हे जाणून घेण्यासाठी तसेच तेलंगणा राज्याची मागणी करणाऱ्या नेत्यांचीही मते जाणून घ्यावी, यासाठी नानाभाऊ एंबडवार यांनी ५ जुलैला बुलढाणा जिल्ह्य़ातील शेगाव येथे विदर्भ, मराठवाडा, कोकण व तेलंगणा विभागातील ठराविक नेत्यांची परिषद आयोजित केली आहे. नानाभाऊ एंबडवार यांनीच ही माहिती ‘लोकसत्ता’ला दिली असून या चारही विभागातील नेत्यांशी त्यांनी संपर्क केला असून परिषदेला उत्तम प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्ती केली आहे.

अरुणावती आणि अडाण वाहू लागल्या
यवतमाळ, २९ जून / वार्ताहर

उन्हाळ्यात कोरडय़ा ठण्ण पडलेल्या अडाण व अरुणावती नद्या आद्र्राच्या पहिल्या दमदार पावसामुळे दुथडी भरून वाहू लागल्या असून जिल्ह्य़ातील लहान मोठय़ा नद्या आणि नालेदेखील वाहू लागले. यवतमाळ-आर्णी मार्गावर जवळाच्या पुढे असलेल्या नवीन पुलाला पाण्याने स्पर्श केला आहे. जूनच्या उत्तरार्धात प्रथमच कोसळलेल्या पावसाने नद्यांना आलेले पूर पाहण्याची मौज लुटण्यासाठी ग्रामस्थांनी नदी काठावर गर्दी करून वरुण राजाला धन्यवाद दिले. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी नांगरणी वखरणी करून बी-बियाणे खरेदी करून ठेवले होते. पावसाचीच तेवढी वाट होती आणि रविवारच्या पावसाने प्रतीक्षा संपवून शेतकरी व सामान्य जनतेला दिलासा दिला. उन्हाळ्यात निर्माण झालेली तीव्र पाणी व चारा टंचाईची समस्या थोडय़ा फार प्रमाणात सुटली आहे.

अ‍ॅनिमेशनला चांगला वाव- बिनॉय शंकर
भंडारा, २९ जून / वार्ताहर

कुमार आर्ट्स, शहीद वॉर्ड व ग्रीन हेरिटेज संस्थेच्यावतीने नुकतेच एकदिवसीय ‘अ‍ॅनिमेशन व चित्रकला’ कार्यशाळा आयोजित करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून ‘टूनवन’ अ‍ॅनिमेशन संस्थेचे संचालक बिनॉय शंकर व प्रश्न. नीळकंठ रणदिवे उपस्थित होते. प्रकाश शाळेचे येळणे, ग्रीन हेरिटेजचे मो. सईद शेख, यशवंत गायधनी, जयंत धनवलकर, चंदा मुरकुटे आदी याप्रसंगी उपस्थित होते.बिनॉय शंकर म्हणाले की, एक चांगला अ‍ॅनिमेटर बनण्याकरिता चित्रकलेत निपुण होणे आवश्यक आहे. अ‍ॅनिमेशन क्षेत्राला आज चांगला वाव आहे. यात क्लासिकल अ‍ॅनिमेशन, फिल्म इंडस्ट्री, स्क्रिप्ट, फिल्म लँग्वेज, फिल्म टेलिव्हिजन इत्यादींचा समावेश असून वेतनही भरपूर मिळते.प्रश्न. नीळकंठ रणदिवे म्हणाले, चित्रकला ही अ‍ॅनिमेशनची आत्मा आहे. विविध कलांचे मिश्रण अ‍ॅनिमेशनमध्ये पहायला मिळते. येळणे यांनीही विचार व्यक्त केले. यावेळी मॅजिक शोचेही आयोजन करण्यात आले. संचालन यशवंत गायधनी यांनी तर आभार कुमार आर्ट्सचे संचालक शरद लिमणे यांनी मानले.

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल
खामगाव, २९ जून / वार्ताहर

शासकीय निवासस्थान खाली करण्याच्या कारणावरून दोन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांमध्ये चांगलाच वाद उफाळून आल्याची घटना फॉरेस्ट वसाहतीत नुकतीच घडली. वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल शेषराव पाठक यांना गेल्यावर्षी निलंबित करण्यात आले. निलंबनानंतरही शासकीय निवासस्थानाचा ताबा त्यांच्याकडे असून निवासस्थान खाली करण्यासाठी त्यांना नोटीसही देण्यात आल्या. मात्र, त्यांनी अद्यापही निवासस्थान रिकामे केले नाही. याच वसाहतीतील वनपरिक्षेत्र अधिकारी नसिरखान सिंघल यांच्याशी पाठक आणि त्यांच्यात चांगलाच वाद झाला. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी सिंघल यांच्यासह तिघांनी पाठक यांच्या अंगणातील टीनपत्रे फेकून कम्पाऊंडची तोडफोड केली, असा आरोप आहे. या प्रकरणी अनिल पाठक यांच्या तक्रारीवरून नसिरखान सिंघल, काळेसे, ए.के. पाटील या तिघांविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नसिरखान यांच्या तक्रारीवरून पाठक यांच्या विरुद्ध शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली.

आरोग्य सेवा अधिकारी महासंघाचे आंदोलन
खामगाव, २९ जून / वार्ताहर

सुधारित वेतनश्रेणी, वेतन भत्ते, कालबद्ध पदोन्नती, २० वर्षे सेवेनंतर डॉक्टरांसाठी खास असलेली कालबद्ध योजना, व्यवसायरोध भत्त्यावर महाभाई भत्ता केंद्र शासनाप्रमाणे न दिल्यामुळे महाराष्ट्र शासन सेवेतील वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर्स, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, उपसंचालक, संचालक व वरिष्ठ पदावरील डॉक्टर्स यांच्यात तीव्र असंतोष आहे.
सहाव्या वेतन आयोगातील झालेल्या अन्यायामुळे आरोग्य सेवा अधिकारी महासंघ राज्य कार्यकारिणीने दिलेल्या अन्यायामुळे आरोग्य सेवा अधिकारी महासंघ राज्य कार्यकारिणीने दिलेल्या आदेशानुसार तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला असून या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा कार्यकारिणीने निवेदन दिले. या संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी डॉ. नावाडे, डॉ. राठोड, डॉ. नीलेश टापरे, डॉ. अन्सारी, डॉ. प्रशांत राठोड, डॉ. उमेश जाधव, डॉ. सांगळे, डॉ. खेरोडकर, डॉ. चराटे, डॉ. अवचार, डॉ. फाळके, डॉ. फाईम, डॉ. सावंत, डॉ. दहाटे, डॉ. ढाकणे उपस्थित होते.

डिगडोहची अश्विनी गुजर तालुक्यात प्रथम
हिंगणा, २९ जून / वार्ताहर

शालांत परीक्षेत डिगडोहच्या शांती विद्या भवनची विद्यार्थिनी अश्विनी रमेश गुजर हिने ८९.६९ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. नेहरू विद्यालय हिंगण्याची श्रृतिका बबन कांबळे ८९ टक्के गुणाने द्वितीय तर यशवंत विद्यालय गुमगावची पपिता विष्णू साठवणे ही ८७.३९ टक्के गुण घेऊन तिसरी आली आहे. तालुक्याची निकालाची टक्केवारी ८६ आहे.लोकसेवा विद्यालय खैरी पन्नासे, महात्मा गांधी विद्यालय वानाडोंगरी, चित्रलेखा देवी भोसले हायस्कूल कान्होलीबारा व श्रीकृष्ण हायस्कूल सावंगी (आसोला) या चार शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. नेहरू विद्यालयाची पल्लवी शेटे (८७ टक्के), पूजा राजलखन त्रिपाठी (८६ टक्के), शांती विद्या भवनची मोनाली राऊत (८५ टक्के), सवरेदय विद्यालयाचा आशीष चक्रवर्ती याने (८० टक्के) शाळेतून प्रथम स्थान पटकावले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक व संस्थाचालकांनी अभिनंदन केले आहे.

हिंगण्यातील शुभम् शेंदरेचे सुयश
हिंगणा, २९ जून / वार्ताहर

हिंगणा (रायपूर) येथील शुभम् प्रकाशराव शेंदरे याने दहावीच्या परीक्षेत ९०.४६ टक्के गुण मिळवले. त्याला सर्वच विषयात प्रवीण्य मिळाले. तो यशोदा मराठी माध्यमिक विद्यालय (इंग्रजी माध्यम) त्रिमूर्ती नगर रिंगरोड येथील विद्यार्थी आहे. शुभम् हा विद्यालयातूनही दुसरा आला असून त्याने िहगणा तालुक्यात सर्वाधिक गुण मिळवून प्रथम स्थान पटकावले आहे. त्याने यशाचे श्रेय आई-वडील व शिक्षकांना दिले आहे.

श्रुती सुरूशेचे पालकमंत्र्यांकडून अभिनंदन
बुलढाणा, २९ जून/ वार्ताहर

शालांत परीक्षेत अमरावती विभागातून प्रथम आलेल्या भारत विद्यालयाची श्रुती अशोक सुरूशे या विद्यार्थिनीने राज्यातून द्वितीय क्रमांक पटकावला. या बद्दल पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी श्रुतीच्या निवासस्थानी जाऊन पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी ज्योतीराव राऊत, भास्करराव काळे, डॉ. अशोक सुरूशे, डॉ. निर्मला सुरूशे आदी उपस्थित होते.दहावीच्या निकालात जिल्ह्य़ाच्या भारत विद्यालयाची विद्यार्थिनी श्रुती अशोक सुरूशेने ९७.६९ (६३५) टक्के गुण मिळवून राज्यातून द्वितीय क्रमांकाने तर सात पारितोषिकांसह अमरावती विभागात अव्वल स्थानी येण्याचा बहुमान पटकावून बुलढाणा जिल्ह्य़ाला नावलौकिक मिळवून दिले. त्याबद्दल डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी श्रुतीचे कौतुक केले. गेल्या अनेक वर्षात दहावीच्या परीक्षेत जिल्ह्य़ाला विभागात पहिले स्थान मिळाले नव्हते. मात्र, श्रुतीने शिक्षण क्षेत्रात भारत विद्यालयाबरोबर जिल्ह्य़ालाही लौकिक मिळवून दिला. त्याबद्दल त्यांनी श्रुतीचे अभिनंदन केले.

विविध दाखल्यासाठी विद्यार्थी, पालक त्रस्त
खामगाव, २९ जून / वार्ताहर

शाळा, महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेसाठी जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर, अधिवास, उत्पन्नाचा दाखला आवश्यक असतो. सेतू कार्यालयातून ही प्रमाणपत्रे दिल्या जातात परंतु, गेल्या काही दिवसांपासून या प्रमाणपत्रासाठी विद्यार्थी व पालकांना कमालीच्या त्रासासोबतच आर्थिक भरुदड व मन:स्ताप सहन करावा लागत आहे. एका प्रमाणपत्रासाठी १० ते १५ दिवस उलटल्यानंतरही प्रमाणपत्र मिळत नाही. कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उडवा उडवीची उत्तरे देऊन अनेकांना वेठीस धरत आहेत. त्याचप्रमाणे या कार्यालयात दलालांचाही सुळसुळाट असून विनाविलंब दाखले देण्याची मागणी होत आहे. या संदर्भात जगदीश रणछोडदास मकवाना यांनी उपविभागीय अधिकाऱ्याकडे तक्रार सादर केली आहे. तर मैत्र ग्रुपच्या वतीने दीपक महाकाळे यांनी निवेदन सादर केले आहे.

भ्रष्टाचार निर्मूलन समितीची आज सभा
बुलढाणा, २९ जुलै/प्रतिनिधी

जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा मंगळवार ३० जूनला दुपारी १२ वाजता अपर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालय सभागृहात आयोजित करण्यात आली. ज्या व्यक्तींना भ्रष्टाचाराबाबतच्या तक्रारी व गाऱ्हाणी दाखल करावयाच्या असतील त्यांनी पुराव्यानिशी व स्पष्ट शब्दात आपल्या तक्रारी समिती समोर सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

वरोरा नगराध्यक्षाची उद्या निवड
वरोरा, २९ जून/ वार्ताहर
नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी बुधवार १ जुलैला निवडणूक होत असून या पदासाठी चौघांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. काँग्रेसचे प्रकाश बोरा व प्रमोद काळे, शिवसेनेचे अनिल वरखडे व राष्ट्रवादीच्या जना पिंपळशेंडे, यांनी अर्ज दाखल केले आहेत. २३ सदस्य असलेल्या वरोरा नगरपालिकेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याचे अध्यक्षपदासाठी कमालीची चुरस आहे. काँग्रेसच्या पुगलिया गटाचे प्रकाश बोरा यांच्याकडे १४ नगरसेवकांचे समर्थन असल्याचे सांगण्यात येत आहे.

वीज रोहित्रामधील तांब्याची तार चोरणाऱ्या तिघांना अटक
रिसोड, २९ जून / वार्ताहर

वीज रोहित्रामधील तांब्याची तार विकणाऱ्या तीन अट्टल चोरांवर गुन्हे शाखेचे पोलिसांनी बसस्थानकावर पकडले. यामुळे जिल्हाभरातील वीज रोहित्र फोडीच्या घटनांचा तपास लागणार आहे. वीज रोहित्रामधील तार चोरणाऱ्या मोठय़ा टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वाशीम येथील गुन्हे शाखेचे जमादार रमेश मोरे तपासासाठी मेहकरवरून रिसोड येथे आल्यावर रिसोड बसस्थानकाजवळ तांब्याची तार विकण्यास मेहकरकडून घेऊन येणाऱ्या काळी-पिवळीतील तिघांना त्यांनी मोठय़ा शिताफीने पकडले. पिशव्यांमध्ये महावितरणांच्या विद्युत रोहित्रामधील १०० किलोहून अधिक तांब्याची तार आढळली. मेहकर तालुक्यातील उकळी-सुकळी येथील आरोपी सुभाष विनोद पवार, भागवत विनोद पवार, लक्ष्मण श्रीराम पवार हे चोर असल्याचे समजते.

व्याजासह पॉलिसीची रक्कम देण्याचे आदेश
गोंदिया, २९ जून / वार्ताहर

भारतीय जीवन विमा महामंडळाची हेल्थप्लस पॉलिसी पूजा दखने यांनी अर्धवार्षिक हप्त्यामध्ये घेतली होती. मात्र, महामंडळाच्या चुकीमुळे पॉलिसीचा वार्षिक २२ हजार रुपये भरणा करावे, असे पत्र ग्राहकाला देण्यात आले. यासाठी असमर्थ असलेल्या ग्राहकांनी जिल्हा ग्राहक मंचाकडे धाव घेत दाद मागितली. या प्रकरणाची सुनावणी करून जिल्हा ग्राहक मंचाचे सदस्य अल्का पटेल, अध्यक्ष पोटदुखे व सदस्य अजितकुमार जैन यांनी तक्रारकर्त्यांची बाजू योग्य ठरवून विमा महामंडळ ११ हजार रुपये व्याजासह तसेच मानसिक त्रासापोटी ३ हजार व न्यायालय खर्च १ हजार अशी एकूण रक्कम एक महिन्याच्या आत देण्याचे आदेश दिले.

राज्य सशस्त्र पोलीस दलात भरती
गडचिरोली, २९ जून / वार्ताहर
भारत राखीव बटालियन (आय.आर.बी.) राज्य राखीव पोलीस दलात ६७५ सशस्त्र पोलीस शिपाई पदांची निवड प्रक्रिया गोंदिया पोलीस मुख्यालय, कारंजा, येथे १६ जुलैपासून सुरू होणार आहे. या निवड प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी योग्यता धारण उमेदवारांना पाचारण करण्यात आले आहे. उमेदवाराची किमान उंची १६८ सें.मी., छाती ७९ सें.मी. (न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक ५ सें.मी. पेक्षा कमी नसावा.), इयत्ता १२ किंवा महाराष्ट्र शासनाने या परीक्षेस समकक्ष घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ३० जून २००९ रोजी वय कमीत-कमी १८ वर्षे जास्तीत जास्त वय २५ वर्षापेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीयांना ५ वर्षे शिथिलक्षम), शासनाने घोषित केलेल्या नक्षलवादग्रस्त भागातील रहिवासी असलेल्या अनुसूचित जमातीसाठी व नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मृत जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी यांच्या मुलांमधील इयत्ता ७ वी परीक्षा उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. पुरुष उमेदवारांना उंचीमध्ये २.५ सें.मी. व छातीच्या मोजमापात सुट देय राहील, असे कळवण्यात आले आहे. पात्रताधारक उमेदवारांनी या प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे एका पत्रकान्वये करण्यात आले आहे.

‘बेण्टेक्स’चे मंगळसूत्र चोरणाऱ्याला चोप
यवतमाळ, २९ जून / वार्ताहर
रस्त्याने जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून पळून जाणाऱ्या तरुणाला नागरिकांनी पकडून झोडपले व पोलिसांच्या हवाली केले. मोठय़ा ‘आशेने’ मंगळसूत्र लंपास करणाऱ्या त्या तरुणाच्या हाती लागलेले मंगळसूत्र ‘असली’ नव्हते तर, ‘बेण्टेक्स’चे म्हणजे नकली होते. मंगळसूत्र चोरीच्या अनेक घटना शहरात घडल्याने महिला देखील ‘सावध’ झाल्या. त्यांनी सोन्याचे मंगळसूत्र घालण्याचा नाद सोडला असेल हे या चोरटय़ाला माहीत नसावे. लोकांचा मारही खाल्ला आणि पदरी काहीही न पडता पोलिस हवालात जावे लागले. आणखी मजेदार बाब म्हणजे आरोपीचे नाव गौरव आहे तो श्रमिक वसाहतीत राहतो.

रिसोड बसस्थानक परिसरात वृक्षारोपण
रिसोड, २९ जून / वार्ताहर
आमदार राजेंद्र पाटणी यांचा ४५ वा वाढदिवस शिवसेना उपशहर प्रमुख नवनाथ खैरे यांनी साजरा केला. याप्रसंगी रिसोड बसस्थानक परिसरात वृक्षारोपन करण्यात आले. याप्रसंगी अतुल भुरे, डॉ. पंजाब झनक, विष्णूपंत भुतेकर, कडूजी जाधव, भगवान देशमुख, विजय गाडे, सतीश झनक उपस्थित होते.

प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेणार -आमदार बावनकुळे
कोराडी, २९ जून / प्रतिनिधी

कोराडी-महादुला येथील प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळावी, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले असून त्याला यश आल्याची माहिती आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना कोराडी व खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात नोकरी मिळावी, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनग्रस्तांची दखल घेऊन मी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा येत्या ३१ जुलैपर्यंत औद्योगिक प्रशिक्षण घेतलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना नोकरीत घेऊ. तसेच ज्यांनी प्रशिक्षण घेतले नाही, त्यांनाही प्रशिक्षित करून रिक्त पदावर घेऊ, असे आश्वासन संबंधित मंत्र्यांनी दिल्याचे बावनकुळे यांनी याप्रसंगी सांगितले. ४५० प्रकल्पबाधीत बेरोजगारांना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तसेच १४४ उमेदवार हे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेतलेले आहे, अशी माहितीही बावनकुळे यांनी यावेळी दिली. पत्रकार परिषदेला राजेश रंगारी, के.पी. राऊत, संजय मैंद, कोराडीच्या सरपंच अनुराधा अमिन यांच्यासह प्रकल्पग्रस्त बेरोजगार मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

महिला व बालकांची आरोग्य तपासणी
वाशीम, २९ जून / वार्ताहर

मंगरूळपीर तालुक्यातील भडकुंभा येथे नुकतेच आरोग्य शिबीर पार पडले. शिबिरात महिला व बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरामध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. अलका मकासरे उपस्थित होत्या. घरातील एक स्त्री जर सुदृढ, आरोग्यसंपन्न असली तर ते कुटुंब सुखी व आनंदी असते. भावी पिढी सुदृढ, सक्षम बनवण्याची जबाबदारीही स्त्रियांवरच असते. म्हणून कुटुंबातील स्त्रियांनी सर्वप्रथम स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी डॉ. अका मकासरे यांनी केले. सृजनाची, नवनिर्माणाची अमूल्य देणगी ईश्वराने स्त्रियांना दिली आहे परंतु, समाजात आर्थिक व सामाजिक कारणांमुळे स्त्रिया आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नसल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. या शिबिराप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मेघा वाघमारे, संघटन सचिव कविता चव्हाण, मीनाक्षी मुळे, गावंडे, डॉ. लव्हाळे, डॉ. मंजुश्री जांभरूणकर, भडकुंभा येथील सरपंच छगन चव्हाण उपस्थित होते. यावेळी प्रश्नस्ताविक डॉ. लव्हाळे यांनी केले. डॉ. मंजुश्री जांभरूणकर यांनी स्त्रियांना आरोग्यविषयक व आहारासंबंधी मार्गदर्शन केले. मेघा वाघमारे यांनी महिलांच्या आरोग्याविषयी मनोगत व्यक्त केले.

‘कृषी कर्ज सवलत योजनेचा लाभ घ्या’
चंद्रपूर, २९ जून / प्रतिनिधी

कृषी कर्ज सवलतपात्र सभासदांनी उर्वरित रक्कम ३० जूनच्या आत बँकेत जमा करून वीस हजारांच्या कर्जमाफीस व नवीन कर्जवाटपास पात्र होण्याचे आवाहन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी केले आहे. केंद्र शासन कृषी कर्जमाफी व कर्ज सवलत योजना २००८ व महाराष्ट्र शासन कृषी कर्ज व कर्ज सवलत योजना २००९ अंतर्गत कृषी कर्ज सवलतपात्र सभासदांनी कृषी कर्ज सवलत वीस हजार किंवा २५ टक्के वजा जाता उर्वरित रक्कम ३० जूनच्या आत बँकेकडे भरणा करून कर्जखाते निरंक करावे व चालू खरीप हंगामात नवीन कर्ज वाटपास पात्र व्हावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष शिंदे यांनी जिल्हय़ातील शेतकऱ्यांना केले आहे. जिल्हय़ातील प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना कर्ज वाटपाकरिता बँक कटिबद्ध आहे. कर्ज सवलत पात्र सभासदांनी उर्वरित रक्कम ३० जूनच्या आत भरणा करून कर्ज सवलत रकमेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीकरिता जवळच्या शाखेशी संपर्क साधावा. जिल्हय़ातील शासनाच्या कर्जमाफी योजनेमुळे कर्जमुक्त झालेल्या कोणताही गरजू पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही व मागणी केल्यास त्याप्रमाणे त्वरित कर्जपुरवठा केला जाईल. याबाबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दक्षता घेत आहे, असेही अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी कळवले आहे.

वाशीममध्ये चोरी; ३ लाखांचा माल लंपास
वाशीम, २९ जून / वार्ताहर
येथील लाखाळा परिसरातील चांडक ले-आऊटमध्ये गुरुवारी मध्यरात्री दरम्यान चोरटय़ांनी डॉ. सुरेश अग्रवाल यांच्या घराचे कुलूप तोडून तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. मानोरा तालुक्यातील पाळोदी येथील डॉ. सुरेश अग्रवाल सध्या वाशीम येथील चांडक ले-आऊटमध्ये वास्तव्यास आहेत. गुरुवारी औंढा नागनाथ येथील बहिणीच्या मुलाच्या विवाहनिमित्त डॉ. अग्रवाल सहपरिवार गेले होते. ही संधी साधून चोरटय़ांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील एक लाख २५ हजार रुपये रोख आणि दोन लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने असा तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. डॉ. अग्रवाल शुक्रवारी रात्री घरी पोहोचले तेव्हा ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. या घटनेबाबत डॉ. अग्रवाल यांनी वाशीम पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी ‘प्रभारी’ ठाणेदार राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट दिली. लगेच श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. वाशीम शहरात चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चोरटय़ांची दहशत निर्माण झाली आहे. चोरटय़ांना पकडण्यात पोलिसांना अपयश येत असल्याने वाशीम पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वाशीम शहरातील व परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आता पुढाकार घेऊन ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ ब्रीदवाक्य सार्थकी लावावे, अशी मागणी विविध स्तरातून होत आहे.

कुहीत चोऱ्या वाढल्या
कुही, २९ जून / वार्ताहर

कुहीत एकाच रात्री तीन घरफोडय़ा झाल्या. या घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यरात्री नागरिक झोपेत असताना चोरांनी रमेश प्रभू येळणे, देवेंद्र पांडुरंग येळणे, अनिल तलमले यांची घरे फोडून एक लाखाहून किमतीचा माल लंपास केला. सकाळी चोरीची घटना लक्षात येताच माजी सरपंच राजू येळणे, रामकृष्ण डहाके, ग्रामपंचायत सदस्य मोरेश्वर लेंडे यांनी चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली.