Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

विशेष लेख

आपली शिक्षण-पद्धती
समाजाशी फटकून..!

बहुजनांच्या अनुभव विश्वाशी संबंध नसलेले शिक्षण त्यांना नव्या जगातल्या स्पर्धेशी आणि त्याहीपेक्षा माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी निकोप दृष्टी कशी देऊ शकेल?

 

तुम्हाला एका वर्षांचे नियोजन करायचे असेल तर भात लावा, जर तुम्हाला दहा वर्षांचे नियोजन करायचे असेल तर झाडे लावा आणि जर तुम्हाला शंभर वर्षांचे नियोजन करायचे असेल तर विद्यार्थी घडवा! अशा अर्थाची एक चिनी भाषेतील म्हण ऐकली होती. ती आठवण्याचे कारण म्हणजे अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेतील शिक्षणाविषयी व्यक्त केलेली चिंता आणि त्याही पुढे जाऊन चीन आणि भारतातील विद्यार्थी आपल्याला (अमेरिकेला) मागे टाकतील, अशी त्यांनी व्यक्त केलेली भीती. ही भीती निदान भारताबाबत तरी अर्धसत्य आहे. कारण आज अमेरिकेची शैक्षणिक अवस्था जात्यात असली तरी भारताची शैक्षणिक अवस्था सुपात आहे.
भारतीय मानसिकता, साक्षरता आणि शिक्षण यांची नेहमीच गल्लत करीत आली आहेच; पण शिक्षणाचा संबंध थेट फक्त पोटार्थी, नोकरीबरोबरच जोडत आलेली आहे. तसा तो असायलाही हवा; पण तो एकमेव निकष असता कामा नये. शिक्षणाने व्यक्ती प्रगल्भ व्हायला हवी. आयुष्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन त्याला प्राप्त व्हायला हवा. सामाजिक, राजकीय, आर्थिक घडामोडींविषयी विचार करण्याची क्षमता आणि एकूणच सामाजिक भान शिक्षणातून यायला हवे. हे आपल्या शिक्षणातून साध्य होते का?
सद्य:स्थिती पाहता याचे उत्तर नकारार्थीच येते. याची अनेक कारणे आहेत. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आपली मानसिकता. अर्थसंकल्पातील शिक्षणासाठीची तरतूद पाहिली तरी याबाबतची सत्यता समोर येते. पण हे एकमेव कारण नाही. पाश्चात्त्यांचे अनुकरण करण्याच्या मानसिकतेबरोबरच समाजावर असलेला धार्मिक पगडा याही कारणांचा यात प्रामुख्याने समावेश होतो. आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे शिक्षणाबाबतची ध्येय-धोरणे ठरविण्याचा र्सवकष अधिकार आणि जबाबदारी सरकारी, तसेच त्यांनी नियुक्त केलेल्या तथाकथित शिक्षणतज्ज्ञ आणि नोकरशहा यांच्याकडे आहे. या प्रक्रियेत समाजाचा कोणताही थेट, प्रत्यक्ष सहभाग कधीही नव्हता व नाही. आर्थिक विकास, तंत्रज्ञान, परदेश व्यापार आणि धोरणे याबाबतची सरकारची असोशी आणि पिण्याचे पाणी, प्राथमिक शिक्षण, रोजगार याबाबतची सरकारी अनास्था पाहिली, की लक्षात येते इथल्या संपन्न म्हणजेच सत्ताधारी वर्गाला गरिबांच्या समस्येविषयी चीड आहे. त्यांना हे लोक विकासातील अडथळे वाटतात. त्यांच्या मते दूरचित्रवाणी, कॉम्प्युटर, अणुशक्ती या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. यातून घडते काय, की त्यांना आवश्यक असलेल्या शासकीय, प्रशासकीय सेवेसाठी विद्यार्थी घडविले जातात आणि हा सर्व वर्ग बहुतांशाने सरकारी शाळेत किंवा सरकारी अनुदानप्राप्त शाळेतून शिक्षण घेणारा मध्यमवर्ग असतो तर दुसरा उच्चभ्रू वर्ग कॉन्व्हेण्ट किंवा पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेणारा. या वर्गाचा समाजाशी, त्यांच्या समस्येशी थेट संबंध नसतो. हा वर्ग बहुराष्ट्रीय कंपन्या, बँका, परराष्ट्र सेवा आदी ठिकाणच्या उच्चपदांवर विराजमान होतो किंवा कला, साहित्य या क्षेत्रांत आंतरराष्ट्रीय सक्रिय असतो. लोककला, लोकसाहित्य यांचा वापर तो बौद्धिक फॅशनसाठी करतो.
औद्योगिकीकरण, संगणकीकरण, व्यवस्थापनिकीकरण, जागतिकीकरण या सर्वामुळे तर शिक्षण या क्षेत्राचे मूलभूत मूल्यच हरवले आहे. त्यामुळे या युगात विज्ञान आणि तंत्रज्ञान हे परवलीचे शब्द झाले आहेत. शिक्षण म्हणजे केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञानच! बरे, हे सर्व करून आपल्या येथे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टी येते का?
विज्ञान-तंत्रज्ञान याचे शिक्षण आवश्यक आहेच; पण ते म्हणजे शिक्षण हा जो प्रचार आहे तो थांबायला हवा. या शिक्षणालाच संपूर्ण शिक्षण समजल्याने या वर्गाची समाजापासून नाळ तुटत आहे. सामाजिक भान, सामाजिक दायित्व, राष्ट्र त्यासंबंधातली आपली कर्तव्ये, जबाबदाऱ्या यापासून नागरिक दुरावत चालला आहे. यातून अनेक सामाजिक आणि मानसिक समस्यांचा जन्म होतोय.
या सर्वामधून नवी सामाजिक, कौटुंबिक व्यवस्था निर्माण होते आहे. नवनिर्माण मानवी संस्कृतीला, समाजाला उन्नत करणारे हवे. ते त्याच्या समूळ नाशाला, अधोगतीला कारण ठरत असेल तर त्याचा पुनर्विचार होणे आवश्यक आहे.नव्या व्यवस्थेत कौटुंबिक, सामाजिक घडी विस्कटली. यातून न्यूक्लिअर फॅमिलीचा जन्म झाला आणि त्याची परिणिती आई-वडिलांना सांभाळण्यासाठी कायद्याच्या निर्मितीत झाली. मुद्दा नव्या व्यवस्थेपेक्षा आपल्या शिक्षणप्रक्रियेत आहे, आपण चांगला माणूस घडवू शकत नाही हा आहे.
शिक्षणाचा थेट संबंध समाजाशी, जगण्याशी हवा. केवळ भौतिक गरजा, तांत्रिक, यांत्रिक सोयी-सुविधा यांना प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षण पद्धतीने सामाजिक, मानवी आयुष्य धोक्यात येऊ शकते. यामुळेच बराक ओबामा यांनी अमेरिकन समाजातील वाढत्या निरक्षतेबद्दल आणि शैक्षणिक घसरणीबद्दल चिंता व्यक्त केली. इंटरकॉलेजेस स्टडीज इन्स्टिटय़ूटने केलेल्या पाहणीत अमेरिकन विद्यार्थी गणित आणि विज्ञान या विषयात आघाडीवर आहेत; परंतु इतर ज्ञान शाखांमध्ये अमेरिकन विद्यार्थ्यांची घसरण चिंताजनक आहे. आपला इतिहास,परंपरा आणि आवश्यक किमान ज्ञान याचा मोठय़ा प्रमाणावर अभाव आहे. म्हणजे ही शिक्षण व्यवस्था अमेरिकन काय किंवा तिचे अनुकरण करीत आपण राबवीत असलेली व्यवस्था काय, माणसाला एक यंत्र बनवत आहे. माणसाला स्पर्धात्मक जगाच्या रेसकोर्सवर पळविण्यासाठी ही शिक्षण व्यवस्था स्टड फार्मचे कार्यच पार पाडत आहेत. परंतु माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे ही मूलभूत बाबच यामध्ये विसरली जाते. मग तिकडे कोणी जॉन उठतो आणि आपल्या बंदुकीतून वर्गात गोळीबार करून पाच-दहा निष्पापांचे बळी घेतो आणि आपल्या इथे.?
ऐंशीच्या दशकानंतरच्या शिक्षणात विज्ञान आणि तंत्रज्ञानाला नको इतके महत्त्व देण्यात आलेच; पण त्याचबरोबर जुन्या रूढी परंपरा आणि त्याहीपेक्षा भूतकाळाच्या मिथ्या मोठेपणात, खोटय़ा सांस्कृतिक वारशांना गौरवाचा मुलामा देत समाजात अगोदरच असलेल्या दैववादी मानसिकतेला अधिक प्रबळ करीत धार्मिकतेचा प्रसार करण्यात आला. परंपरावादी मूलतत्त्ववादी विचारांना शिक्षणाच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात आले. त्यासाठी नैतिक ऱ्हासाचा डांगोरा पिटत धार्मिक मूल्यांची दहशत घालण्यात आली आणि एकूणच शैक्षणिक ध्येय-धोरणांना भूतकाळाकडे वळवून परंपरावादी दृष्टिकोन लादून परिवर्तनशील शिक्षणाची, विचारांची द्वारेच बंद करण्यात आली. हे प्रकरण इतके पुढे गेले, की विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ज्योतिष ‘शास्त्रा’चा समावेश करण्याच्या हालचाली सुरू करून शिक्षण प्रक्रियेला भगवा रंग फासण्याचेही प्रयत्न सुरू झाले आणि त्याची परिणती गुजरात दंगल ते मालेगाव बॉम्बस्फोट आणि एकूणच मूलतत्ववादी हिंदू हिस्टीरियात झाली.
हे सारे एका रात्रीत घडले नाही. यामागे वर्षांनुवर्षांचे प्रयत्न आहेत. आपल्या पाठय़पुस्तकात सुरुवातीपासून पौराणिक नायक-नायिकांना महत्त्व देण्यात आले आहे. ज्ञान आणि माहितीच्या नावाखाली नेहमीच जातीचे, वर्गाचे उल्लेख हेतुपुरस्सर करून सामाजिक मानसिकता अपर्वितनीय करण्यात आली आहे. राष्ट्र, समाज, माणूस यांची उपासना, गुणगौरवाऐवजी देवाची, विद्येची देवता सरस्वती म्हणून तिची उपासना प्रार्थना करण्यात येते. तीही ज्या शाळा, संस्था सरकारी अनुदाने, सरकारी भूखंड आणि इतर सोयी-सुविधा सरकारकडून लाटतात त्या शाळांमध्ये. या प्रार्थना, देव, धर्म यांचा मुलांची भाषा, कल्पनाविश्व, त्यांची जिज्ञासा याबरोबर काडीचाही संबंध नसतो. पण यातून एकच होते मुलांवर धार्मिकता लादली जाते आणि एक उग्र धार्मिक मानसिकता तयार होते.
दूरगामी परिणाम म्हणजे मग ना आपले साहित्य जागतिक स्तरापर्यंत पोहचते, ना चित्रपट, ना जागतिक क्रीडाकौशल्य! याचे मूळ कारण वर वर्णन केलेली धार्मिक मानसिकता. त्यातून झालेले जिज्ञासेचे दमन आणि त्यातून निर्माण होणारे तोकडे अनुभवविश्व ! तेच तोकडे अनुभवविश्व आपल्या नाटकात, चित्रपटात, साहित्यात डोकावते. मग ते साहित्य परदेशी भाषेत असू द्या वा इतर भारतीय भाषेत.
आपल्या सर्व शिक्षण व्यवस्थेवर सरकार, वरिष्ठ नोकरशहा अर्थात उच्चवर्गीय आणि त्या अनुषंगाने उच्च जात वर्गातले मध्यमवर्गीयांचाच पगडा राहिला आहे. त्यामुळे शिक्षण प्रक्रिया, तिच्या गरजा, अभ्यासक्रम, त्याची पाठय़पुस्तकादी साधने आणि एकूण मानसिकता यावर या वर्गाचाच ठसा असतो. तुलनेत बहुजनवर्गातील, ग्रामीण वा आदिवासी क्षेत्रांतील अभावग्रस्त विद्यार्थ्यांना आकलनात अडथळे येतात.
यातून मग विविध सामाजिक गंड निर्माण होतात, जसे इंग्रजी भाषेचे स्तोम. त्याचप्रमाणे या मानसिकतेतूनच आलेल्या ध्येय-धोरणाबाबत म्हणजेच सरकारी खर्चावर चालणाऱ्या या प्रक्रियेत मूठभर उच्च वगाचीच मक्तेदारी ठरलेले उच्च शिक्षण स्वस्त ठेवण्यामागील कारणमीमांसा कोणी विचारत नाही आणि बहुसंख्य समाजासाठी आवश्यक नव्हे तर मूलभूत असलेल्या प्राथमिक शिक्षणाकडे कमालीचे दुर्लक्ष होते. त्यासाठीच्या तुटपुंज्या तरतुदीबद्दल कोणी ब्र काढत नाही.
उच्च वर्गाची मुले पैशाच्या बळावर शिकतील आणि गरीब, दलित, शोषित शिकलेच तर त्यांच्या योग्यतेच्या बळावर, हा गंड दूर करायला हवा. खरे तर सामाजिक न्यायाचा आणि शिक्षणाचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. शिक्षणातूनच सामाजिक न्यायाच्या कल्पनेचा जन्म होतो, पण त्यासाठी डोळस शिक्षण गरजेचे आहे आणि आपल्याकडे त्याचाच तर अभाव आहे.
सामाजिक अन्याय, शोषण, दडपशाही यांच्याविरुद्ध संघर्षांची जबाबदारी पुरोगामी संघटना आणि व्यक्तींची असल्याचे चित्र आहे. पण तेच ‘राम मंदिर’सारख्या मानसिक हिस्टीरियात हजारो, लाखो सुशिक्षित, तरुण, तरुणी यांचा सहभाग असतो. सामाजिक मानसिकता निरोगी नसल्याचेच हे लक्षण. म्हणजेच योग्य शिक्षण नसल्याचेच लक्षण. आपली शिक्षण प्रक्रियासाठी मुळातूनच एका विशिष्ट अनुत्पादक वर्गाचे श्रेष्ठत्त्व अबाधित ठेवण्यासाठी त्यांना लाभदायक असलेली संस्कृती, धर्म, जैसे थे स्थितीत ठेवण्याच्या हेतूनेच प्रेरित आहे. त्यामध्ये परिवर्तन, सामाजिक न्याय, तळागाळातील नागरिक यांना कधीही स्थान नव्हते. यामुळेच ठराविक वर्गाच्या जगण्याचा, त्यांना लाभदायक असलेल्या शतकानुशतकांच्या व्यवस्थेचा पाठपुरावा ही शिक्षण पद्धती करताना दिसते. बहुजनांच्या अनुभव विश्वाशी संबंध नसलेले शिक्षण त्यांना नव्या जगातल्या स्पर्धेशी आणि त्याहीपेक्षा माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी निकोप दृष्टी कशी देऊ शकेल?
सुलेखा नलिनी नागेश