Leading International Marathi News Daily

मंगळवार, ३० जून २००९

विविध

जॅक्सनचा शवविच्छेदन अहवाल फुटला
मायकेल जॅक्सनच्या मृत्यूसमयी प्रथमोपचारात असंख्य चुका

लंडन, २९ जून/पीटीआय

पॉप गायक मायकेल जॅक्सन याच्या शवविच्छेदनाचा अहवाल अंशत: फुटला असून, मृत्युसमयी त्याच्या पोटात काही गोळय़ा होत्या, अन्न नव्हते असे समजते. तो काहीच खात नसल्यामुळे त्याच्या हाडांचा सापळा शिल्लक राहिला होता. ‘द सन’ या वृत्तपत्राने या अहवालातील माहिती प्रसृत केली असून, त्यात म्हटले आहे, की जॅक्सनच्या डोक्यावर केस शिल्लक नव्हते.

पुतळ्यांवर दोन हजार कोटींचा खर्च
मायावतींनी उभारलेल्या पुतळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

नवी दिल्ली, २९ जून/पीटीआय

मुख्यमंत्री मायावती व इतर नेत्यांचे पुतळे उभारून जनतेच्या पैशांची उधळपट्टी केल्याच्या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारला सर्वोच्च न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस दिली आहे. येत्या चार आठवडय़ात या नोटिशीला उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.

‘मायावतींचे पुतळे ही भारतीय राजकारणासाठी शरमेची बाब’
मदुराई,२९ जून/पीटीआय

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी कोटय़वधी रुपये खर्च करून स्वत:चे व काही नेत्यांचे पुतळे उभारले ही शरमेची बाब आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आज येथे केली. बसपचे निवडणूक चिन्ह असलेल्या हत्तीचे व स्वत:चे पुतळे उभारण्यासाठी मायावती यांनी एक हजार कोटी रुपये खर्च करणे ही गोष्ट भारतीय राजकारणासाठी शरमेची बाब आहे, असे सांगून चिदंबरम म्हणाले, की एक हजार कोटी रुपये खर्च करून उत्तर प्रदेशात उभारलेल्या या पुतळय़ांचा काय उपयोग आहे.

मान्सूनने मध्य भारत जवळजवळ व्यापला
नवी दिल्ली, २९ जून / पी.टी.आय.

नैऋत्य मान्सूनने आज संपूर्ण मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशचा बराचसा भाग व्यापल्याने लाखो लोकांना उकाडय़ापासून दिलासा मिळाला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाने मध्य भारतातील राज्यांवर मान्सूनची कृपादृष्टी झाली. संपूर्ण राजस्थान, उत्तर प्रदेशातही लवकरच मान्सून बरसेल, अशी माहिती भारतीय हवामान खात्याचे संचालक बी.पी. यादव यांनी पी.टी.आय.ला सांगितले. दोन दिवसात मान्सून वायव्य भारतही व्यापून टाकण्याची शक्यता आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयात काश्मिरी महिलेची नेमणूक
वॉशिंग्टन, २९ जून/वृत्तसंस्था

मूळ काश्मिरी असलेल्या फराह पंडित यांची अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यात मुस्लिम समुदायाच्या प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. जगातील मुस्लिम समुदायाविषयी ओबामा प्रशासनाचे धोरण ठरवण्यात त्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांना मदत करतील. जगातील मुस्लिम समुदायाशी संवाद साधण्याचे कामही फराह पंडित यांना करावे लागणार आहे. त्यांच्या या नियुक्तीने काश्मीरमधील मुस्लिम समुदायालाही आशेचा किरण दिसू लागला आहे.

जॅक्सनच्या मृत्यूपत्राबाबत कुटुंबीय अंधारात
लॉस एन्जेल्स, २९ जून / पी.टी.आय.

पॉप संगीताच्या दुनियाचा अनभिषक्त सम्राट मायकेल जॅक्सन याच्या मृत्यूपत्राबाबत संभ्रम असल्याचे जॅक्सनचे वकील लॉन्डेल मॅकमिलन यांच्या विधानामुळे स्पष्ट झाले आहे. जॅक्सनच्या मृत्यूपत्राबाबत त्याचे कुटुंबीय अंधारात आहेत, असे मॅकमिलन यांनी म्हटले आहे.
लॉन्डेल मॅकमिलन यांची मायकेल जॅक्सनचे वडील जो जॅक्सन यांनी अटर्नी म्हणून नेमणूक केली होती. मायकेल जॅक्सनच्या कुटुंबाला अद्यापही त्याने मृत्यूपत्र करून ठेवले आहे वा नाही, याची कल्पना नाही, असे मॅकमिलन म्हटल्याचे वृत्त सीएनएन वृत्तवाहिनीने दिले आहे. मायकेल जॅक्सनवर प्रचंड कर्जाचा डोंगर होता. परंतु, त्याची स्थायी संपत्ती आणि बँकेतील गुंतवणुकीची रक्कम डोळे विस्फारणारी असल्याने त्याचे कुटुंबीय त्याच्या मृत्यूपत्राची माहिती घेत आहेत. जर मायकेल जॅक्सनने मृत्यूपत्र केलेले नसेल तर त्याची संपत्ती कॅलिफोर्निया लॉ नुसार त्याच्या पहिल्या वारसाला मिळेल. मुलांचे सर्वोच्च हित डोळ्यापुढे ठेवून त्याच्या कुटुंबाच्या संमतीने हा निर्णय घेतला जाऊ शकतो. कदाचित जॅक्सनची आई कॅथरिन जॅक्सन यांच्याकडे संपत्तीची देखभाल करण्याची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. जॅक्सनच्या मृत्यूनंतर त्याच्यावर कशा पद्धतीने अंत्यस्कार केला जावा, याविषयी कुटुंबीय संभ्रमात होते. त्याच्यावर फक्त निवडक लोकांच्या उपस्थितीत चाहत्यांना दूर ठेवून अंत्यसंस्कार करण्यात आले, असे जॅक्सनच्या एका निकटच्या नातेवाईकाने पत्रकारांना सांगितले.

काश्मीरमधून ‘लष्कर विशेषाधिकार कायदा’ टप्प्याटप्प्याने मागे घेण्याचा विचार..
नवी दिल्ली, २९ जून/पी.टी.आय.

सेनादलांना विशेषाधिकार देणारा ‘आम्र्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स अ‍ॅक्ट’ टप्प्याटप्प्याने मागे घेण्याच्या प्रस्तावावर केंद्र सरकार विचार करीत आहे. हा कायदा काश्मीरमधून हटविला जावा, अशी जोरदार मागणी ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील जम्मू-काश्मीर सरकारने केली आहे.
या प्रक्रियेची सुरुवात म्हणून राज्याच्या काश्मीर खोऱ्यातील श्रीनगर आणि बडगाम व जम्मू विभागातील जम्मू आणि कथुआ या जिल्ह्यांतून हा कायदा टप्प्याटप्प्याने मागे घेता येईल का यावर केंद्र सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. या चार जिल्ह्यांमध्ये हिंसक घटनांमध्ये लक्षणीय प्रमाणात घट झाली आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अलीकडेच दिल्लीमध्ये येऊन गृहमंत्री पी. चिदम्बरम व संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी हा कायदा राज्यातून मागे घ्यावा अथवा त्यात दुरुस्ती करून तो सौम्य करावा अशी जोरदार मागणी केली होती. चार जिल्ह्यांमधून तो टप्प्याटप्प्याने मागे घ्यावा, हा प्रस्तावही त्यांनीच दिला होता. या मुद्दय़ावर गृह व संरक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक लवकरच होणार आहे.

नक्षलवाद्यांना हुसकावण्याची मोहीम महत्त्वाच्या टप्प्यावर
काटापहाडी, २९ जून/पी.टी.आय.

प. बंगालमधील नक्षलवाद्यांना हुसकावण्याची मोहीम आता अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपली असून सुरक्षादलांचे तब्बल १६०० जवान या कामासाठी तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षादलांनी आज पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील काटापहाडी या माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गावात प्रवेश करून तो उद्ध्वस्त केला. लालगड, रामगड परिसरात सुरक्षादले तैनात केल्यानंतर त्यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. आज सुरक्षादलांनी या दोन्ही गावांकडून काटापहाडीत प्रवेश केला.

दलित कुटुंबाला मारहाण; आठजणांना तुरुंगवास
कोतद्वार (उत्तरखंड), २९ जून / पीटीआय
दलित कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी येथील जिल्हा न्यायालयाने दोन महसूल अधिकाऱ्यांसमवेत आठजणांना एक वर्षांसाठी तुरुंगवास ठोठावला आहे. जेठू लाल व त्याच्या सूनेला मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. लाल याच्या मुलाचे एका विवाहितेशी संबंध होते असा संशय आरोपींना होता.