Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

जागतिक मंदीवर मात करत बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनास यंदा दुप्पट प्रतिसाद
विनायक परब, व्हर्जिनिया, ३० जून

जागतिक मंदीच्या फेऱ्याने अमेरिकेला पुरते ग्रासले असून त्यामुळे बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या २ ते ५ जुलै दरम्यान होणाऱ्या अधिवेशनाला किती व कसा प्रतिसाद मिळणार या विषयी शंका उपस्थित केली जात होती. मात्र या सर्व शंकांना आता मूठमाती मिळाली असून गेल्या अधिवेशनाच्या तुलनेत यंदा प्रतिसाद दुप्पट झाला आहे. सिएटल येथे पार पडलेल्या गेल्या अधिवेशनास सुमारे दोन हजार ६०० प्रतिनिधी उपस्थित होते. तर यंदाच्या अधिवेशनाची नोंदणी आताच साडेचार हजारांवर गेली असून प्रत्यक्ष अधिवेशन सुरू होईल, त्यावेळेस उपस्थिती पाच हजारांवर असेल, अशी अपेक्षा आहे.

 


बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष श्रीनिवास ठाणेदार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना या वृत्तास दुजोरा दिला ते म्हणाले की, अधिवेशनाच्या आयोजनाच्या अगदी सुरुवातीपासून आम्हाला उपस्थिती अधिक असणार असा विश्वास होता. काही जणांनी जागतिक मंदीमुळे काय होणार अशी शंका व्यक्त केली होती खरी. परंतु त्याचा कोणताही परिणाम अधिवेशनावर नाही, ही सुखद बाब आहे. किंबहुना उपस्थिती गेल्या अधिवेशनाच्या तुलनेत दुपटीहूनही अधिक वाढते आहे. त्यामुळेच अधिवेशनाच्या खर्चातही वाढ होणे अपेक्षित आहे. अधिवेशनाचा खर्च सुमारे सहा कोटींच्या घरात जाईल, अशी अपेक्षा आहे. अधिवेशनाच्या आयोजनाची सर्व तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. दरखेपेस राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होते. मात्र सध्या राज्यातील परिस्थितीमुळे यंदा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना उपस्थित राहणे शक्य होणार नाही. त्यामुळे विख्यात अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होईल. अधिवेशनाच्य़ा पहिल्या दिवशी मराठी उद्योजकांची परिषद होणार आहे. या परिषदेमध्ये महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढविण्यावर विचार होईल आणि काही निर्णयही घेतले जातील.
अधिवेशनाच्या खर्च वाढल्याने अधिवेशनाच्या ग्रँड स्पॉन्सरची जबाबदारी श्रीनिवास ठाणेदार यांनी स्वत: स्वीकारली आहे. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, इकडचे कायदे कडक आहेत, कर्मचारी वर्ग इथलाच घ्यावा लागतो. तासाला ४० किंवा ५० डॉलर्स असा त्यांना दर असतो. अनेक बाबींना कोणताही पर्याय नसतो. उपस्थिती अधिक असल्याने मोठे कनव्हेन्शन सेंटर मंडळाने घेतले आहे. त्याचाही खर्च अधिक आहे. आणि केवळ वर्गणीदारांच्या पैशांतून हे सारे भागणे शक्य नसते. त्यामुळे ग्रँड स्पॉन्सर होण्याचा निर्णय घेतला. शिवाय हे सारे होते आहे ते मराठी माणसाच्या आणि मराठी संस्कृतीच्या भल्यासाठी त्यामुळे त्यात आनंदच आहे, असेही ते म्हणाले.

बीएमएमच्या अधिवेशनात प्रथमच पाच मराठी चित्रपटांचा प्रीमियर शो
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या फिलाडेल्फिया येथे होणाऱ्या १४ व्या अधिवेशनात प्रथमच पाच मराठी चित्रपटांचा प्रीमियर शो तर सध्या गाजत असलेल्या ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाचा खास शो होणार आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळ चित्रपट महोत्सवाच्या शीर्षकाखाली हे सर्व शो सादर होणार आहेत. याशिवाय प्रथमच विरोधी पक्षाच्या नेत्यांना पाचारण करण्याचा नवा पायंडाही मंडळाने पाडला असून यंदा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना खास पाचारण करण्यात आले आहे. ठाकरे यांनी छायाचित्रण केलेले गड-किल्ल्यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजनही अधिवेशनात करण्यात आले आहे.
मराठी चित्रपटांनी आता मळलेली वाट सोडली असून अनेक मराठी नवीन तरुण दिग्दर्शकांनी नवीन काही देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही वर्षांत त्यामुळेच नवीन वाटेवरील मराठी चित्रपट पाहता आले. या नव्या वाटेचा परिचय अमेरिकेतील नव्या-जुन्या पिढीला करून देण्याचा निर्णय यंदा घेण्यात आल्याची माहिती अधिवेशनाचे सहनिमंत्रक मंदार जोगळेकर आणि चित्रपट समिती सदस्य सचिन प्रभूदेसाई यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. सचिन प्रभूदेसाई म्हणाले की, मराठी चित्रपट निर्मात्यांना त्यासाठी आवाहन करण्यात आले होते. अट एकच होती की, यातील एक चित्रपट पूर्वी प्रदर्शित झालेला असू नये. एकूण ११ चित्रपटांच्या प्रवेशिका आल्या होत्या. त्यातील पाच चित्रपटांची आता महोत्सवासाठी निवड करण्यात आली आहे. यात ‘तांदळा’, ‘मेड इन चायना’, ‘वावटळ’, ‘गाभ्रीचा पाऊस’ आणि ‘अचानक’ या चित्रपटांचा समावेश आहे. तर सध्या महाराष्ट्रात सर्वत्र गाजत असलेल्या ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, या चित्रपटाचा विशेष शो आयोजिण्यात आला आहे. पाच जणांची एक परीक्षक समिती स्थापन करण्यात आली असून या समितीतर्फे दोन चित्रपटांची निवड करण्यात येणार असून त्यांना प्रथम व द्वितीय अशा दोन पुरस्कारांनी सन्मानित केले जाणार आहे. यंदा येथील ट्रेड एक्स्पोमध्ये प्रथमच महाराष्ट्र शासनाचे सात ते आठ स्टॉल्स असणार आहेत. याच एक्स्पोमध्ये उद्धव ठाकरे यांचे प्रदर्शन आणि संजय पेठे यांच्या चौदा विद्या चौसष्ट कलाने आयोजित केलेले पुण्याच्या विलास करंदीकरांचे भातुकलीचे प्रदर्शन याचाही समावेश आहे. याशिवाय यंदापासून प्रथमच विश्व गौरव पुरस्कार सुरू करण्यात आला असून हा पहिला पुरस्कार देऊन आशा भोसले यांना गौरविण्यात येणार आहे. भारतातून प्रथमच या अधिवेशनासाठी सुमारे ५० कलावंत येत आहेत. त्यात गझलनवाझ भीमराव पांचाळे यांचाही समावेश आहे.