Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

अग्रलेख

अमेरिकन ४२०

 

अमेरिकेतील निधी व्यवस्थापक व नॅसडॅक शेअर बाजाराचा माजी अध्यक्ष बर्नार्ड मडॉफ याला सुमारे ६५ अब्ज डॉलरचा अपहार केल्याप्रकरणी तब्बल १५० वर्षांची कारावासाची शिक्षा ठोठविण्यात आली आहे. ही शिक्षा झाल्याने अमेरिकेतील त्याच्या योजनेतील छोटय़ा गुंतवणूकदारांना खरे समाधान लाभले असेल. शिक्षक, कामगार, कर्मचाऱ्यांनी बर्नार्डच्या योजनात जास्त लाभ मिळत असल्याने गुंतवणूक केली होती. परंतु यातील अनेकांना त्याने लाभ देणे तर सोडाच; वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या. त्याच्याकडे गुंतवणूक करणारे जास्तीत जास्त लोक हे सेवानिवृत्त असल्याने त्यांना या प्रकाराने जगणे कठीण झाले होते. म्हणूनच लाखो गुंतवणूकदारांना देशोधडीला लावलेल्या या ‘फ्रॉड’ निधी व्यवस्थापकाला कठोर शिक्षा ठोठावावी अशी अमेरिकेत सार्वत्रिक भावना होती. बर्नार्डने आपली शिक्षा मान्य करताना आपले ७१ वर्षांचे वय लक्षात घेता आपल्याला १२ वर्षांचीच शिक्षा द्यावी अशी मागणी केली होती परंतु त्याच्या या मागणीचा विचार न करता तब्बल १५० वर्षांची शिक्षा त्याला ठोठावण्यात आली आहे. आज बर्नार्डचे वय ७१ वर्षे आहे, त्यामुळे शिक्षा पूर्ण होईल त्यावेळी त्याचे वय २२१ वर्षांचे असेल.. विज्ञानाचा कितीही चमत्कार झाला तरी तो २२१ वर्षे जगणे काही शक्य नाही. त्यामुळे त्याला नैसर्गिकरीत्या तुरुंगात मरण आल्यावर त्याची शिक्षा संपणार आहे. अमेरिकेत अशा प्रकारे गुन्ह्याच्या गांभीर्यावरून प्रदीर्घ काळ शिक्षा दिली जाते. काही गुन्हेगारांना ३०० ते ८०० वर्षांचीही शिक्षा झालेली आहे. अशी प्रदीर्घ शिक्षा देण्यामागे तो गुन्हा किती गंभीर आहे, हेच दाखवायचे असते. ‘व्हाइट कॉलर’ आरोपींमध्ये बर्नार्डला मिळालेली ही सर्वात मोठी शिक्षा आहे. बर्नार्डने केलेले गुन्हे हे आपल्याकडे शेअर बाजारातील एकेकाळचा बिग बुल हर्षद मेहता आणि केतन पारेख, बिगर बँकिंग वित्तीय कंपनी स्थापन करून गैरव्यवहार करणारा सी.आर. भन्साळी, दोन महिन्यांत पैसे दामदुप्पट करण्याची किमया करणारा अशोक शेरेगर किंवा उदय आचार्य यांच्या गुन्ह्यांहून काही वेगळे नाहीत. परंतु आपल्याकडे यातील अनेक जणांना एवढी मोठी शिक्षा झाली नाही. एवढेच काय, केतन पारेख ‘बेनामी’त शेअर बाजारात व्यवहार करीत असल्याची कबुली ‘सेबी’च्या अध्यक्षांनी दिली होती. त्यामुळे आपल्याकडे आर्थिक गैरव्यवहार होतात; मात्र हे गुन्हेगार काही काळ गजाआड जातात, नंतर त्यांना थातुरमातूर शिक्षा होते आणि पुन्हा काही काळाने ते बाहेर आल्यावर नव्याने गुन्हा करण्यास मोकळे होतात.. हे आपल्याकडे सर्रास घडते. त्यांनी केलेले गुन्हेही लोकांच्या विस्मरणात जातात. अमेरिकेत मात्र गुन्हेगार, मग तो कोणत्याही आर्थिक स्तरातील असो, त्याला शिक्षा ही होतेच. आणि ती एवढी मोठय़ा कालावधीची होते की, त्याला सुटून बाहेर येण्याची संधीही मिळत नाही. बर्नार्डच्या शिक्षेवरून हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. १९६० साली वयाच्या केवळ २२व्या वर्षी बर्नार्डने कमविलेल्या पाच हजार डॉलरच्या उत्पन्नावर गुंतवणूक कंपनी स्थापन केली. त्या वेळी हा तरूण पुढे ६५ अब्ज डॉलरचा गैरव्यवहार करेल असे कुणालाही वाटले नव्हते. बर्नार्डची कंपनी गुंतवणूकदारांना १० टक्के परतावा देत असे. एक टक्क्याहून कमी व्याजदर असलेल्या अमेरिकेत १० टक्के गुंतवणुकीवर परतावा म्हणजे मोठे घबाडच मिळण्यासारखे होते. त्यामुळे बर्नार्डच्या या योजनेकडे अनेक लोक, अगदी सुक्षिशित लोकही, आकर्षित झाले. बर्नार्डची कंपनी भरभराटीला येणे स्वाभाविकच होते. त्याने ‘पोन्झी’ या ब्रँड नावाने गुंतवणूक योजना बाजारात आणली. कार्लोस पोन्झी या इटालियन स्थलांतरित गृहस्थानेही अशीच योजना १९२० साली आणली होती. त्यामुळे त्याच्या नावाने ही योजना सुरू केली. बर्नार्डने आपल्याच नावाने ‘बर्नार्ड एल. मडॉफ इन्व्हेस्टमेंट सिक्युरिटीज’ ही कंपनी स्थापन केली. शेअर बाजारात एक छोटा दलाल म्हणून करिअर सुरू केलेल्या बर्नाडने अतिशय कमी किंमतीचे समभाग मोठय़ा प्रमाणावर खरेदी करून त्यांच्यात सट्टा खेळून पैसा वाढविण्यास प्रारंभ केला. त्याचे यात चांगलेच बस्तान बसले. न्यूयॉर्क शेअर बाजारात वरिष्ठ गोटात त्याने अल्पावधीत आपले स्थान पटकाविले. ज्या वेळी शेअर बाजारात संगणकीकरण सुरू झाले त्या वेळी त्यात पुढाकार घेणाऱ्यांत बर्नार्डही होता. ‘नॅसडॅक’ शेअर बाजार सुरू झाल्यावर त्याने तेथेही उडी घेतली. तेथे बर्नार्डने महत्त्वाची भूमिका पार पाडली. ‘नॅसडॅक’वर ‘मार्केट मेकर’ म्हणून त्याची कंपनी काम करू लागली. एक काळ असाही होता की, बर्नार्डची कंपनी ही ‘नॅसडॅक’वर सर्वात मोठी ‘मार्केट मेकिंग’ करणारी होती आणि वॉल स्ट्रीटवर ‘मार्केट मेकिंग’ करणारी सहावी मोठी कंपनी होती. एवढी मोठी कंपनी असल्याने अनेक गुंतवणूकदारांचा बर्नार्डने आखलेल्या गुंतवणूक योजनेवर विश्वास बसणे स्वाभाविकच होते. त्याची कंपनी गुंतवणूक विषयक सल्ला देण्याचे काम करीत असताना होणाऱ्या आर्थिक गुन्ह्यांची चौकशी करण्याचेही काम करीत असे. बर्नार्ड हा अमेरिकेतील दलालांच्या ‘नॅशनल असोसिएशन ऑफ सिक्युरिटीज डीलर्स’ या संघटनेचा सक्रिय सदस्य होता. एवढेच नव्हे तर ‘नॅसडॅक’चा तो अध्यक्षही झाला. आर्थिक क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केल्यावर बर्नार्डने हळूहळू आपला मोर्चा सरकारी क्षेत्राकडे वळवला. मोठय़ा प्रमाणावर सामाजिक संस्थांना देणग्या देऊन आपला दानशूरपणा लोकांपुढे आणला. अर्थातच याचा सर्व फायदा त्याला व्यवसायवृध्दीसाठी होत होता. अशा प्रकारे बर्नार्डने आपला सर्व थरांत दबदबा निर्माण केला. त्यामुळेच अशी ही ‘वजनदार’ व्यक्ती आपल्याला १० टक्के परतावा देत आहे, या गोष्टीवर गुंतवणूकदारांचा विश्वास बसला. परंतु प्रत्यक्षात या योजनेखाली घेतलेला पैसा तो कुठेही गुंतवीत नसे. तर केवळ आपल्याकडेच ठेवून तो पैसा ‘खेळता’ कसा राहील हे पाहत असे. म्हणजे एखाद्याने त्याच्याकडे ठेवलेल्या पैशाचा परतावा देण्यासाठी तो दुसऱ्याकडून पैसे घेत असे. नंतर त्याच्या ठेवींवरील परतावा देण्यासाठी तिसऱ्याच्या पैशाचा वापर करी. अशा प्रकारे साखळी चालूच राही. आपल्याकडे अशोक शेरेगर हा ‘बेस्ट’ मधील बदमाशही अशाच साखळीचा वापर करून अनेकांना दोन महिन्यांत पैसे दुपट्ट करून देई. परंतु ही साखळी तुटल्यावर त्याचे खरे रूप उघड झाले. बर्नार्डची दोन मुले मार्क आणि अॅन्डय़ू यांनीच आपल्या बापाचे खरे रूप उघड केले. बर्नार्डने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस जाहीर केल्यावर १० डिसेंबर २००८ रोजी त्याच्या दोघा मुलांनी आपल्या बापाच्या कंपनीची आर्थिक कुवत नसताना कसा काय बोनस जाहीर केला याची शंका व्यक्त केली आणि पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी केली. त्याच्याच दुसऱ्या दिवशी बर्नार्डला अटक करण्यात आली. आपल्याकडे ‘सत्यम’चा गैरव्यवहार स्वत: रामलिंग राजू याने पत्राद्वारे ‘सेबी’ला कळविल्यावरही त्याला अटक करण्यास आठवडा उजाडला होता. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बर्नार्डला अटक झाल्यानंतर केवळ सहा महिन्यांतच त्याला १५० वर्षांची शिक्षा झाली आहे. आपल्याकडील न्यायव्यवस्थेने व सरकारने हीदेखील बाजू लक्षात घेतली पाहिजे. बर्नार्डचे मॅनहॅटन येथील आलिशान पेंट हाऊस, दोन विमाने, यॉट याचा ताबा लागलीच सरकारने घेतला. नाहीतर आपल्याकडे हर्षद मेहताच्या गैरकारभाराच्या दोन दशकानंतर आत्ता कुठे त्याच्या घराचा लिलाव झाला. अमेरिकेतील व आपल्याकडील वित्तीय गैरव्यवहारांची तुलना करण्याचे कारण एवढेच की, आपण आता आर्थिक शिथिलीकरणाच्या दिशेने वाटचाल करीत असताना असा घटना होणारच आहेत. मात्र आपण अशा घटनांना समर्थपणे तोंड दिले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याची पुनरावृत्ती होणार नाही हे पाहिले पाहिजे. यासाठी वेळोवेळी कायद्यात बदल करावे लागतील. कायद्यात बदल करून योग्य ती शिस्त लावणे म्हणजे उदारीकरणाच्या धोरणाच्या विरोधात काम करतो असे मुळीच नाही. उलट उदारीकरण बळकट करण्यासाठी अशा प्रकारचे गैरव्यवहार टाळण्यासाठी कडक कायदे करण्याची व त्याची अंमलबजावणी आक्रमकतेने करण्याची गरज आहे. बर्नार्ड प्रकरण जरी अमेरिकेत घडले असले तरी त्यातून आपण बोध घेण्याची आवश्यकता आहे.