Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

निर्माते बदलल्याशिवाय नाटकाचं काही खरं नाही!
रविवारच्या ‘लोकरंग’ (२१ जून) अंकातील व्यावसायिक रंगभूमीची मृत्युघंटा?, चालत्या नाटकांची चांदीची घंटा आणि समांतर रंगभूमीची नकारघंटा कानावर पडली. पण या तिन्ही प्रकारच्या आवाजांत ज्यांच्यासाठी नाटक करायचं असतं त्या प्रेक्षकांचा आवाज कुठे आहे? काल-परवापर्यंत नाटकाचा प्रेक्षक हा प्रामुख्याने उच्चभ्रू, पांढरपेशा व मध्यमवर्गीय प्रेक्षक होता. तोच नाटकाचा मोठा आश्रयदाता होता. गेल्या काही वर्षांत ही परिस्थिती पार पालटलेली आहे. नाटकाच्या प्रेक्षकांत सरळसरळ दोन गट पडले आहेत. दुसरा गट हा नवसाक्षर वर्गातला आहे. हा प्रेक्षक केवळ टाइमपाससाठी, क्षणिक रंजनासाठीच नाटक बघतो. नाटकाकडून तो कसल्याही मूल्याबिल्यांची अपेक्षाच करीत नाही.

विज्ञान
डार्विन महोत्सव

उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणाऱ्या चार्ल्स डार्विन यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षांनिमित्त ५ ते १० जुलै या कालावधीत ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात ‘डार्विन महोत्सव’ आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये चार्ल्स डार्विन यांनी अभ्यासलेल्या विविध विषयांचा आणि संशोधनांचा ऊहापोह करण्यात येणार आहे. यानिमित्त यंदा जगभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांमध्ये या महोत्सवाचे विशेष महत्त्व आहे.


महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांच्या उद्घाटन सोहळ्यात राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच झाला. यात महाराष्ट्रातील पारंपरिक नृत्य सादर करताना हे कलावंत.

‘रंगपीठ’तर्फे प्रा. वामन केंद्रे यांची कार्यशाळा
‘रंगपीठ’ या संस्थेतर्फे ज्येष्ठ नाटय़-दिग्दर्शक आणि मुंबई विद्यापीठातील अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचे संचालक प्रा. वामन केंद्रे यांची आवाजसाधनेच्या संदर्भातील कार्यशाळा १० ते ३१ जुलैदरम्यान दररोज सायं. ६.३० ते रात्री ९.१५ वा.पर्यंत प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतील वातानुकुलित हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत १६ ते ५० वर्षे वयोगटातील मर्यादित व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे. तीन आठवडय़ांची ही कार्यशाळा ४० सत्रांमध्ये विभागण्यात आली असून, तीत आवाजाची संकल्पना, आवाजनिर्मिती प्रक्रिया, आवाज व आवाजाची जोपासना, आवाजाची वैशिष्टय़े, त्याचे विविध प्रकार, श्वसन व आवाज, आवाजातील चढउतार, आवाजात ऊर्जेचा वापर, बोलण्यातील प्रभाव, अभिनयात आवाजाचे महत्त्व, संवादफेक, शब्दोच्चार, संवादांचे प्रकार, संवादातील ताल, तोल व लय, भाषण आणि संभाषण, संगीत व संभाषण, भूमिका आणि आवाज, आवाजाद्वारे भावनाविष्कार आदी विषयांवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले जाणार आहे. ही कार्यशाळा नाटक, चित्रपट, मालिकांत काम करू इच्छिणाऱ्यांसाठी, तसेच रेडिओ कलावंत, सूत्रसंचालक, निरूपक, वृत्तनिवेदक, वक्ते, एकपात्री कलावंत, कथा-काव्यवाचन करणारे सादरकर्ते, शिक्षक, समुपदेशक, व्याख्याते अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींसाठी उपयुक्त ठरणार आहे. कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी दूरध्वनी क्र. ०२२-२८५४०३४० किंवा मोबाईल क्र. ९८२०८६८६२८ वर कार्यशाळेचे संयोजक राजा अबोले किंवा गौरी केंद्रे यांच्याशी संपर्क साधावा.

‘अप्पू अस्वल्या..’चा रौप्यमहोत्सव
एकेकाळी ‘लिट्ल थिएटर- बालरंगभूमी’ निर्मित बालप्रेक्षकांच्या पसंतीची भरपूर दाद मिळविणारे ‘अप्पू अस्वल्या करी गुदगुल्या’ हे कै. विनोद हडप लिखित नाटक दादरच्या अमर हिंद मंडळाने एप्रिल महिन्यात पुनश्च एकदा रंगमंचावर आणले होते. आजचे आघाडीचे लेखक-दिग्दर्शक संतोष पवार यांनी या पुनरुज्जीवित बालनाटय़ाचं दिग्दर्शन केलं होतं. या बालनाटय़ाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग रविवार, ५ जुलै रोजी सकाळी ११ वा. शिवाजी मंदिर येथे होणार आहे. याप्रसंगी लिट्ल थिएटरच्या प्रणेत्या सुधा करमरकर, नाटककार रत्नाकर मतकरी, निर्माते-अभिनेते प्रभाकर पणशीकर आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक अजय अंबेकर उपस्थित राहणार आहेत.

नाटक व मालिका लेखन कार्यशाळा
मंगेश कला मंच या संस्थेतर्फे १२ जुलै ते १६ ऑगस्ट (फक्त रविवारी) या कालावधीत दुपारी ४.३० ते सायं. ६.३० या वेळात आनंदराव पवार विद्यालय, वजीरा नाका, बोरीवली पश्चिम येथे नाटक व मालिका लेखन कार्यशाळा घेण्यात येणार आहे. देवेंद्र पेम, सुरेश जयराम, आनंद म्हसवेकर, राजीव जोशी, सुहास कामत हे या कार्यशाळेत मार्गदर्शन करतील. संपर्क- ९८६९८७४१८२/ ९८७०४६०६९२.