Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

लोकमानस

इंजिनीअरिंगच्या प्रवेशाबाबतची अट योग्यच
‘इंजिनीअरिंगच्या प्रवेशाबाबत जाचक व चुकीची अट’ या (२४ जून) पत्रासंदर्भात मी विचार मांडू इच्छितो.

 


१) इंजिनीअरिंग/फार्मसीच्या प्रवेशासाठी असलेली सीईटी ही परीक्षा देण्यासाठी एचएससी (१२वी) ही पात्रता परीक्षा आहे व एखाद्या महत्त्वाच्या पात्रता परीक्षेमध्ये ५० टक्के (तेसुद्धा फक्त पीसीएममध्ये) गुणांची अपेक्षा करणे हे रास्तच आहे. ज्या विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये १४०/१५०/१६० गुण मिळाले, पण ते एचएससीमध्ये पीसीएममध्ये किमान १५० गुण मिळवू शकले नाहीत, त्यांनी एचएससीच्या अभ्यासक्रमाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होते. अशा काही विद्यार्थ्यांसाठी एचएससीच्या १५० गुणांची अट शिथिल करणे म्हणजे इतर विद्यार्थ्यांवर, ज्यांनी सीईटीप्रमाणेच एचएससीलाही योग्य ते महत्त्व दिले व दोन्ही परीक्षांमध्ये चांगले गुण मिळविले, त्यांच्यावर निश्चितच अन्यायकारक ठरेल.
२) ५० टक्क्यांचा नियम कमीत कमी तीन वर्षे अस्तित्वात आहे व सीईटीचा अर्ज भरताना दिल्या गेलेल्या माहितीपत्रकात अगदी स्पष्टपणे नमूद केलेला आहे. त्यामुळे तो सर्व विद्यार्थ्यांना माहीत असणे अपेक्षित आहे. जर तो नियम ‘जाचक व चुकीचा’ वाटत असेल तर त्याची दाद कितीतरी आधी मागता आली असती. आता सर्व परीक्षांचे निकाल लागल्यावर व प्रवेशप्रक्रिया सुरू होण्याच्या मार्गावर असताना असे करणे योग्य नाही. त्यामुळे वेळ वाया जाऊन प्रथम वर्षांचा अभ्यासक्रम उशिरा सुरू होईल व यातून विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
३)इंजिनीअरिंगच्या सर्व जागा भरण्याच्या अट्टहासापोटी रास्त नियम शिथिल करणे हे शैक्षणिक दर्जा राखण्याच्या हेतूला मारक आहे. ही अट केवळ महाराष्ट्रात आहे हे काही ती शिथिल करण्यामागचे कारण असू शकत नाही.
संजय चेंदवणकर, अंधेरी, मुंबई

प्रामाणिकपणाचा असाही प्रत्यय
मुंबई महानगरीत माणूस माणसाला ओळखत नाही, असे लोक अनेक अनुभवांचा आधार देत म्हणतात. पण मंगळवारी सकाळी मला आलेला अनुभव या समजाला फाटा देणारा ठरला. मी बेस्टच्या ‘एए३’ या एसी बसने (क्र. ९९४९/२) शिवाजी पार्क येथून प्रियदर्शिनापर्यंत प्रवास केला. मला माझ्या स्टॉपवर उतरवून बस पुढे गेली आणि माझ्या लक्षात आले की मी माझी बॅग बसमध्येच विसरलो होतो! त्यात फार मोठी रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे, चेकबुक्स वगैरे होती. घरी येऊन मुलीला हा प्रकार सांगितला आणि म्हटले, ‘आता बॅग शोधायची तरी कशी?’ त्यावर मुलगी म्हणाली, ‘चिंता करू नका; नुकताच त्या बसच्या चालकाचा फोन आला होता आणि त्यांनी दुपारी आणिक आगार येथून तुमची बॅग घेऊन जायला सांगितलं आहे.’
मी बसमधून उतरल्यावर माझी बॅग तेथेच राहिल्याचे बसचे चालक पुरुषोत्तम कृष्णन (बॅज. क्र. ०८२७६१) आणि वाहक अमोल (बॅज क्र. १७९६५१) या दोघांच्या लक्षात आले होते आणि त्यांनी ती बॅग जपून ठेवली होती. एवढेच नव्हे तर माझा पत्ता, फोन नंबर शोधण्यासाठी त्यांनी बॅग उघडली होती, पण त्यातील सर्व वस्तू जिथल्या तिथे होत्या. फोन नंबर मिळाल्यामुळे मी घरी पोहोचण्याआधीच त्यांनी माझ्यासाठी निरोपही ठेवला होता!
दुपारी आणिक आगार येथून बॅग ताब्यात घेताना परतीच्या फेरीला निघालेले कृष्णन आणि अमोलही भेटले. त्यांना मी बक्षीस म्हणून १०० रुपये देऊ केले, ते घेण्याचे मात्र त्यांनी विनम्रपणे नाकारले. त्यांच्या प्रामाणिक स्वभावाची मला कमाल वाटली आणि फार फार कौतुकही! त्यांच्याबद्दल सर्वाना संगावेसे वाटले म्हणून हा पत्रप्रपंच.
माझ्यासारखा वय वर्षे ७५चा ज्येष्ठ नागरिक अनवधानाने आपली वस्तू एखाद्या ठिकाणी विसरला तर त्याला त्या ऐवजावर पाणीच सोडावे लागेल. पण माझे तसे झाले नाही कारण प्रामाणिक कर्मचारी आजही मुंबईत आहेत.
विजय निगुडकर, चेंबूर, मुंबई

मुंबई मराठी साहित्य संघाबाबत नाहक भुई धोपटणे
‘निर्थक वाद’ (२१ जून) हा प्रवीण बर्दापूरकर यांचा लेख वाचला. त्यांच्या लेखातील सर्वच मुद्दय़ांचा प्रतिवाद करणे शक्य आहे आणि आवश्यकही आहे. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करू इच्छिते की जेव्हा एखाद्या संस्थेकडून काही प्रयत्न होत नाहीत असे प्रसारमाध्यमांना वाटत असते तेव्हा महामंडळाच्या एकसंधतेला बाधा येऊ नये म्हणून काही गोष्टींचा गाजावाजा संस्थेने होऊ दिलेला नसतो. ८२ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन अमेरिकेत घेण्याबद्दल मुंबईतील बहुतेक ज्येष्ठ साहित्यिकांची मते मुंबई मराठी साहित्य संघाने जाणून घेतली होती. ती मते अशा संमेलनाच्या विरोधात आहेत आणि मुंबई मराठी साहित्य संघाचे मतही विरोधात आहे, असे आमच्या प्रतिनिधींनी महामंडळाच्या सभेत मांडले. हा विषय मताला टाकण्यात आला आणि बहुमताने मंजूर झाला. संस्थेचे अध्यक्ष जयंत साळगावकर यांनी पुन्हा एकदा प्रा. ठाले पाटील यांना पत्र लिहून या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी आग्रहाची विनंती केली होती.
त्यानंतर सॅन होजे येथील बे एरिया महाराष्ट्र मंडळ या संस्थेला महामंडळाशी संलग्नता देण्याच्या विरोधात मुंबई मराठी साहित्य संघाने मत मांडले व महामंडळाने तो विचार बाजूला ठेवला. अ. भा. मराठी साहित्य संमेलन परदेशात न घेण्याचा आमच्या संस्थेचा रेटा बहुमताविरोधातही कायम राहिला आणि विश्व मराठी साहित्य संमेलनाची कल्पना पुढे आली. २२ जून २००८ रोजी झालेल्या महामंडळाच्या सभेत ती सर्वानी मान्यही केली. सॅन होजे येथील आमंत्रकांनी करारपत्राचा जो मसुदा आणला होता, त्यावर कायदेविषयक सल्ला आम्ही घेतला आणि त्यातील महामंडळाला अडचणीत आणू शकणाऱ्या बाबींवर आक्षेप घेऊन त्यात अनेक दुरुस्त्या सुचविल्या. विश्व मराठी संमेलन घेण्याचे मान्य झाल्यावरही, निमंत्रक संस्थेने करारपत्रावर सह्या केल्या नाहीत या कारणास्तव हे संमेलन स्थगित करावे, अशीही सूचना आम्ही महामंडळाला केली होती. हे तपशील देण्याचे कारण एवढेच, की महामंडळाचे हित जपण्याचा आमचा प्रयत्न सर्वाच्या लक्षात यावा. त्याचबरोबर महामंडळाचा निर्णय मान्य केल्यावर त्यांना सर्व प्रकारचे सहकार्यही दिले. घटक संस्थेच्या जबाबदारीचे भान ठेवून आम्ही वागलो आहोत, असे संस्थेचे मत आहे.
विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकाळातील महामंडळाच्या हिशेबांचा प्रश्न आला असता, सनदी लेखापालाने संमत केलेल्या हिशेबांवर आक्षेप घेण्याचा महामंडळाला अधिकार नाही, अशी भूमिका आम्ही घेतली. परंतु धर्मादाय आयुक्तांकडून त्यासंबंधी विचारणा झाल्यावर तसा तपास व्हायला पाहिजे, असेही मत मांडले. विदर्भ साहित्य संघ किंवा महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष यांच्यापैकी कुणाच्याही बाजूने पक्षपात केलेला नाही.
बर्दापूरकर यांच्या लेखात साहित्य संस्थांच्या कारभाराबद्दल सरसकट विधाने आहेत. कुठल्याही साहित्य संस्थेला आपली प्रकाशने नियमित करावीत असे वाटत नाही, हे त्यातील एक विधान. मुंबई मराठी साहित्य संघाचे ‘साहित्य’ हे त्रमासिक अनेक वर्षे सातत्याने प्रसिद्ध होते आहे. ‘साहित्य’चा दर्जेदार दिवाळी अंकही प्रकाशित होतो. १९७५ साली संस्थेने ‘एका पिढीचे आत्मकथन’ प्रसिद्ध केले होते. त्याचे पुनर्मुद्रण झाले. त्याच धर्तीवर ‘दुसऱ्या पिढीचे आत्मकथन’ हे आजच्या ज्येष्ठ साहित्यिकांचे मनोगत सांगणारे पुस्तक प्रकाशित झाले. यंदा संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षांतही महत्त्वाची प्रकाशने येतील.
साहित्य संस्था नवनवीन प्रयोगांना उत्तेजन देत नाहीत असे म्हणताना, सहा वर्षे आयोजित होत असलेल्या महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलनांची दखल का घेतली नाही? विद्यार्थ्यांचे, विद्यार्थ्यांकरिता असे हे संमेलन असते. या वर्षी संस्थेने आयोजित केलेली ‘मराठी भाषा’ या विषयावरची अमृत व्याख्यानमालाही यशस्वी झाली. ‘शिवाजी महाराज आणि मराठी भाषा’ येथून सुरू झालेल्या या मालेत संत तुकाराम, संत रामदास, ख्रिस्ती मराठी साहित्य, पंडिती काव्य, शाहिरी साहित्य इत्यादी विषयांवर माहितीपूर्ण व्याख्याने झाली.
मुंबई मराठी साहित्य संघाच्या भव्य वास्तूचे नूतनीकरण झाले. ती ‘मालमत्तावृद्धीची फुशारकी’ ठरते काय? एखाद्या साहित्य संस्थेची प्रशस्त वास्तू असणे, स्वत:चे साहित्यिक कार्यक्रम सांभाळून, संस्थेला आर्थिक अडचणीत न टाकता तिची योग्य वेळी दुरुस्ती झाली, तर त्यात मराठी समाजाची प्रतिष्ठा वाढत नाही काय?
उषा तांबे
कार्यवाह, मुंबई मराठी साहित्य संघ,
साहित्य शाखा, गिरगाव, मुंबई