Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

बाजार समिती सदस्य निवडणुकीत बंडखोराला २६ मते
कोल्हापूर महापालिकेतील दोन्ही आघाडय़ाना फुटीचे ग्रहण
कोल्हापूर, ३० जून / विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर महानगरपालिकेत सत्तारूढ आणि विरोधी आघाडय़ांमध्ये गेले काही दिवस खदखदत असलेल्या असंतोषाचे दर्शन मंगळवारी सर्वसाधारण सभेत झाले. महापालिकेच्या सभागृहातून जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीवर पाठविण्याच्या एका सदस्याच्या निवडणुकीत दोन्ही आघाडय़ा एकत्र येऊनही तब्बल २६ सदस्यांनी बंडखोर उमेदवाराच्या पारडय़ात आपली मते टाकली. यामुळे दोन्ही आघाडय़ांना फुटीचे ग्रहण लागल्याचे स्पष्ट झाले असून महिनाभरात उंबरठय़ावर येऊन ठेपलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत महापालिकेचे राजकारण एका निर्णायक वळणावर येऊन ठेपले आहे.

बिल्डरवरील कारवाई, ई-टेंडरवरून सांगली स्थायी समितीत वादावादी
काँग्रेस सदस्यांचे सर्वच विषयांवर आक्षेप
सांगली, ३० जून/प्रतिनिधी

वृक्षतोड करून बांधकाम करणाऱ्या एका वादग्रस्त बिल्डरवरील कारवाई, महावीर उद्यानाचा विकास व ई-टेंडर या मुद्दय़ावरून स्थायी समितीची मंगळवारची सभा वादळी ठरली. काँग्रेस सदस्यांनी या सर्वच विषयांवर सभेत जोरदार आक्षेप घेतले. सांगली शहरातील राजवाडा परिसरात वृक्षतोड करून सुरू असलेले बांधकाम तत्काळ रोखावे, असे आदेश गत स्थायी समितीच्या बैठकीत सभापती हरिदास पाटील यांनी दिले होते. मात्र मंगळवारच्या सभेत या विषयावर काँग्रेसच्या हणमंत पवार यांनी आवाज उठवित बिल्डर एम. व्ही. कुलकर्णी यांच्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याचे निदर्शनास आणून देत हे बांधकाम तत्काळ रोखावे, अशी मागणी केली.

‘विशाल सह्य़ाद्री’ कार्याध्यक्ष, सचिवपदावरून अखेर कुलकर्णी बंधूंची हकालपट्टी
सातारा, ३० जून / प्रतिनिधी

येथील विशाल सह्य़ाद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयंत कुलकर्णी व सचिव अ‍ॅड. सतीश कुलकर्णी यांनी नियोजित वार्षिक सभा घेण्याचे टाळल्याने संतप्त सभासदांनी विजय दामोदर अराणके यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस बंदोबस्तात सभा घेऊन त्यामध्ये कुलकर्णी बंधूंची पदावरून हकालपट्टी करून त्या जागी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सर्कल सेक्रेटरी धनाजी ऊर्फ दाजी फडतरे यांची कार्याध्यक्षपदी तर सचिवपदी आर. डी. लढ्ढा यांची निवड करण्यात आली असल्याचे दाजी फडतरे यांनी सांगितले.

कोल्हापुरात डेंग्यूच्या रुग्णांची झपाटय़ाने वाढ
कोल्हापूर, ३० जून/विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर शहरामध्ये डेंग्यूच्या साथीच्या रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढते आहे. वेळोवेळी सूचना देऊनही आरोग्य विभागाकडून कोणतीच गांभीर्याने उपाययोजना न केल्यामुळे ही साथ आटोक्यात आणणे सोडाच, रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊ लागल्याने प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना केली पाहिजे, अन्यथा साथीचा फैलाव होऊन हाहाकार माजू शकेल, अशी भीती नगरसेवक अनिल आवळे यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

पॉलिश करण्याच्या बहाण्याने आठ तोळय़ांचे दागिने लंपास
कोल्हापूर, ३० जून / प्रतिनिधी

सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो, असे सांगून दोन वेगवेगळय़ा ठिकाणी सुमारे आठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास करण्याचे प्रकार आज दुपारी घडले. दरम्यान, लोकांनीच अशाच प्रकारची ठकबाजी करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोघाजणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी वेगवेगळय़ा ठिकाणी आणखी चौघाजणांना ताब्यात घेतले. हे सर्व सराईत भामटे असून त्यांच्याकडून आजपर्यंत झालेल्या अशाच प्रकारच्या गुन्हय़ांची उकल होण्याची शक्यता जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय कुरुंदकर यांनी सांगितले.

सोलापुरात विधानसभा जागांबद्दल काँग्रेस- राष्ट्रवादीमध्ये संघर्ष सुरू
सोलापूर, ३० जून / प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सोलापूर शहर उत्तर आणि सोलापूर दक्षिण या दोन मतदारसंघांची केलेली मागणी मान्य तर करूच नये उलट राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या पंढरपूर, माढा या मतदारसंघासह बार्शी मतदारसंघ काँग्रेस पक्षासाठी सोडण्यात यावे, अशी जोरदार मागणी शहर आणि जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आली. येथील शासकीय विश्रामगृहात ग्रामविकास राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षातील विधानसभा इच्छुक उमेदवारांची आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

हरळीच्या ज्ञानप्रबोधिनी निवासी शाळेत ७३ विद्यार्थ्यांना विषबाधा
सोलापूर, ३० जून/प्रतिनिधी

सोलापूरपासून जवळच असलेल्या हराळी (ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) येथील ज्ञानप्रबोधिनी निवासी शाळेत अन्नातून विषबाधा झाल्याने ७३ विद्यार्थ्यांना येथील छत्रपती शिवाजी सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात ६ ते १२ वर्षे वयोगटातील ५३ मुला-मुलींचा समावेश आहे. या सर्वाची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावरील धोका टळल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराशी निगडित असलेल्या हराळीच्या ज्ञानप्रबोधिनी निवासी शाळेत काल सोमवारी सकाळी ८.३० च्या सुमारास विद्यार्थ्यांना नाष्टय़ापोटी पोहे आणि दूध देण्यात आले होते.

पालिका व रस्ते विकास महामंडळात वाद अद्यापि कायम
रस्त्यांचा ताबा कोणाकडे ?
सोलापूर, ३० जून / प्रतिनिधी
९२ कोटी खर्च करून राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत शहरात तयार करण्यात आलेले रस्ते किती निकृष्ट दर्जाचे आहेत, याची ओरड सुरुवातीपासून होत असताना या रस्त्यांच्या प्रत्यक्ष ताब्यावरून महापालिका व रस्ते विकास महामंडळ एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचे पुनश्च स्पष्ट झाले आहे.

उदयनराजे व शशिकांत शिंदेंच्या सत्कारानिमित्त आज शक्तिप्रदर्शन
सातारा, ३० जून / प्रतिनिधी
खासदार उदयनराजे भोसले व आमदार शशिकांत शिंदे यांच्या सत्कारानिमित्त बुधवारी एक जुलै रोजी जोरदार शक्तिप्रदर्शन मेढा येथे होणार आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळात उत्कृष्ट भाषणपटू म्हणून राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते आमदार शशिकांत शिंदे यांना गौरविण्यात आले आहे. या जागरूक लोकप्रतिनिधींचा सत्कार जलसंपदामंत्री (कृष्णा खोरे विकास महामंडळ) रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या सोहळ्यापूर्वी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करून पुनर्रचित सातारा विधानसभा मतदारसंघातून आमदार शशिकांत शिंदे यांना येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीची मागणी करण्यात येणार आहे.

शॉर्टसर्किटने घराला आग
कोल्हापूर, ३० जून / प्रतिनिधी

उतरेश्र्वर पेठ येथील चांदी कारखानदार अरूण दिनकर खद्रे यांच्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरील दोन खोल्यांमध्ये शॉर्ट सर्किट मुळे आग लागून सुमारे २ लाख रूपयांचे नुकसान झाले. ही आग आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लागली. अग्निशामक दलाच्या जवानांनी अध्र्या तासात ही आग विझवली. या आगीत खोल्यांमध्ये असणारे फर्निचर,प्रश्नपंचिक साहित्य, इतर वस्तू जळून खाक झाल्या. या आगीत सुमारे दोन लाख रूपयांचे नुकसान झाले.

मच्छिंद्रनाथांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ
आटपाडी, ३० जून/वार्ताहर

किल्ले मच्छिंद्रगड येथील मच्छिंद्रनाथाच्या पालखीने आटपाडीकरांचा पाहुणचार स्वीकारत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. शतकोत्तर परंपरा असणाऱ्या या पालखीचे आटपाडीत काल आगमन झाले होते. अशोकराव देशमुख, यशवंत देशमुख, प्रदीप पाटील, शिवाजी माळी, वसंत पाटील, मुरलीधर पाटील व रावसाहेब पाटील यांच्यासह अनेक भाविकांनी आटपाडी बसस्थानकानजीक सातभाई विठोबा मंदिरानजीक पालखीचे स्वागत केले. साडेसहा हजारांहून अधिक वारकरी असणाऱ्या या पालखीचे कल्लेश्वर देवस्थान ट्रस्ट व तांबडा मारुती देवस्थान ट्रस्टने स्वागत केले. पालखी रात्री तांबडा मारुती देवस्थान परिसरात विसावली होती. सायंकाळी आरती, रात्री भजन, भगव्या पताका व मुखी विठ्ठलनामाचा गजर यामुळे आटपाडीत पंढरपूर अवतरल्याचा भास होत होता. सकाळी न्याहारी व माणगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दुपारचे भोजन झाल्यानंतर ही पालखी पुढील मुक्कामाच्या दिशेने मार्गस्थ झाली.

नंदवाळकडे उद्या पायी दिंडी
कोल्हापूर, ३० जून / विशेष प्रतिनिधी
ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळ कोल्हापूर यांच्या संयोजनाखाली श्री क्षेत्र कोल्हापूर ते क्षेत्र नंदवाळ (ता.करवीर) असे ११ कि.मी. पायी िदडी व पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. या वर्षी या सोहळ्याचे पाचवे वर्ष असून या सोहळ्यात प्रथमच या वर्षीपासून माऊलींच्या रथाचा सहभाग असणार आहे. तसेच जिल्ह्य़ातील ८० हून अधिक खेडेगावातील वारकरी व दिंडय़ा सहभागी होणार आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पोवार व दिंडीप्रमुख आनंदराव लाड महाराज यांनी येथे दिली. २ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता मिरजकर तिकटी विठ्ठल मंदिर येथून नगरप्रदक्षिणा निघणार आहे. ही प्रदक्षिणा बिनखांबी गणेश मंदिर, जोतिबा रोड, भवानी मंडप, शाहू बँक मार्गे टिंबर मार्केट येथून सासने इस्टेट येथे विश्रांतीस जाणार आहे. या ठिकाणी िदडी प्रमुख हभप आनंदराव लाड महाराज यांचे प्रवचन होणार आहे. आषाढी एकादशीदिनी ३ जुलै रोजी सकाळी सात वाजता मिरजकर तिकटी विठ्ठल मंदिर येथून प्रतिपंढरपूर नंदवाळकडे दिंडी बिनखांबी गणेश मंदिर, उभा मारुती चौक, खंडोबा तालीम, सानेगुरुजी वसाहतमार्गे ही रवाना होणार आहे. या दिंडीचा विसावा पुईखडी येथे संकल्पसिध्दी मंगल कार्यालय येथे होणार आहे.

डॉ. बी. एस. सावंत शिवाजी विद्यापीठात डीन
सातारा, ३० जून / प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेच्या पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ. बी. एस. सावंत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कॉमर्स अ‍ॅन्ड मॅनेजमेंट विद्याशाखेच्या अधीष्ठाता (डीन) पदावर निवड झाली आहे. डॉ. सावंत हे एम. फिल व पीएच. डी.चे संशोधक मार्गदर्शक आहेत. आतापर्यंत त्यांच्या हाताखाली दोन विद्यार्थ्यांनी एम. फिल. पदवी प्रश्नप्त केली आहे. सध्या आठ विद्यार्थी पीएच. डी. व एम. फिल करीत आहे. डॉ. सावंत ‘एथॉस’ या संशोधन नियतकालिकाचे प्रमुख संपादक म्हणून काम करीत आहेत. तसेच ट्रॅजेक्टरी या संशोधन नियतकालिकाच्या संपादक मंडळावर ते काम करीत आहेत. दोन आंतरराष्ट्रीय व पाच राष्ट्रीय संशोधन नियतकालिकांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. डॉ. सावंत यांना डीन पदावरील निवडीसाठी शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. डी. टी. शिर्के, स्टँटिंग कमिटीचे अध्यक्ष प्रश्न. संभाजीराव देसाई, डॉ. जे. एफ. पाटील, डॉ. आर. एस. आडसूळ, डॉ. वासंती रासम, डॉ. क्रांतीकुमार पाटील. डॉ. आर. डी. सावंत. डॉ. एल. जी. जाधव, डॉ. रवींद्र ठाकूर आदींचे सहकार्य लाभले आहे. रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. रावसाहेब िशदे, उपकार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, माजी माजी कार्याध्यक्ष डॉ. एन. डी. पाटील, संस्थेचे सचिव प्रश्नचार्य जनार्दन जाधव यांच्यासह प्रश्नध्यापक व प्रशासकीय सेवकांनी डॉ. सावंत यांचे अभिनंदन केले आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेत अरूणा इटाई यांची नियुक्ती
सोलापूर, ३० जून/प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांची बदली करण्यात आली त्यांच्या जागी जतच्या गटविकास अधिकारी अरूणा इटाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुळीक यांची बदली सोलापूर जिल्हा परिषदेतच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) या पदावर करण्यात आली आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या नूतन उपमुख्य कार्यकारी अधिकारी इटाई या मूळच्या सोलापूरच्या असून त्यांनी यापूर्वी उत्तर सोलापूर आणि बार्शी येथे गटविकास अधिकारी म्हणून काम केले आहे.

कुलूप तोडून चोरी
फलटण, ३० जून/वार्ताहर
बंद बंगल्याचे कुलूप तोडून चोरटय़ांनी १८ हजार रुपये किमतीचे चांदीचे सामान चोरून नेल्याची घटना लक्ष्मीनगर भागात घडली. दि. २२ रोजी रमेश शंकर फौजदार, रा. लक्ष्मीनगर, फलटण हे बाहेरगावी काही कामानिमित्त गेले असता मध्यरात्रीच्या सुमारास चोरटय़ांनी त्यांच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून कपाटातील १८ हजार रु. किमतीचे चांदीचे सामान, त्यामध्ये निरंजन, तांब्या, वाटी, ताट आदी चोरून नेले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय पुजारी करीत आहेत.

रझाक हुंडेकरी यांचे अल्पशा आजाराने निधन
सोलापूर, ३० जून/प्रतिनिधी
येथील पंजाब तालीम भागातील मुस्लीम समाजाचे प्रतिष्ठित कार्यकर्ते हाजी अ. रझाक हाजी इब्राहिम हुंडेकरी (वय ६५) यांचे सोमवारी नवी दिल्लीत अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या मंगळवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या निवासस्थानापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.हुंडेकरी हे मित्रांसह अजमेर येथे ख्वाजा गरीब नवाज दर्गाहच्या उर्स शरीफसाठी गेले होते. तेथून परतताना नवी दिल्लीत ते आजारी पडले. एका खासगी रुग्णालयात उपचार चालू असताना त्यांचे निधन झाले. सिटीझन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक-सचिव, पंजाब तालीम मशीद व हजरत अ. रहीमबाबा अन्सारी दर्गाहचे विश्वस्त म्हणून ते कार्यरत होते.

मालमोटारीखाली चेंगरून तरुणाचा मृत्यू
सोलापूर, ३० जून/प्रतिनिधी

हैदराबाद रस्त्यावर सिद्धेश्वर मार्केट यार्डाजवळ एका भरधाव वेगातील मालमोटारीखाली चेंगरून संतोष महादेव शिंदे (वय ३५) हा गंभीर जखमी होऊन मरण पावला. शिंदे (रा. कर्देहळ्ळी, ता. सोलापूर) हा मार्केट यार्डातून नजीकच्या ज्वारी संशोधन केंद्रामार्गे तुळजापूर नाक्याच्या दिशेने निघाला होता; परंतु भरधाव वेगाने येणाऱ्या मालमोटारीखाली तो चेंगरला गेला. शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो मरण पावला.

पॉलिटेक्निक, व्यवस्थापन अभ्यासक्रम प्रवेश सुरू
सांगली, ३० जून/प्रतिनिधी

व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेच्या नानासाहेब महाडिक पॉलिटेक्निक इन्स्टिटय़ूट व व्यंकटेश्वरा इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटला प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता मिळाल्याची माहिती संस्थेचे सचिव जिल्हा परिषद सदस्य राहुल महाडिक यांनी दिली. संस्थापक-अध्यक्ष काँग्रेसचे जिल्हा खजिनदार नानासाहेब महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या डी.एड., बी.एड. व माध्यमिक विद्यालय पेठ नाका येथे सुरू आहे. संस्थेने डिप्लोमा इंजिनिअरिंग व मॅनेजमेंट या शैक्षणिक क्षेत्रात पाऊल टाकले असून, ५० एकर इतक्या भव्य जागेत शैक्षणिक संकुलाची उभारणी केली आहे. या संकुलात मेकॅनिकल, इलेक्ट्रिक, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, आयटी व एमबीए आदी अभ्यासक्रम उपलब्ध केले आहेत.या संस्थेला एआयसीटीई, मुंबई, शिवाजी विद्यापीठ व महाराष्ट्र शासनानेही प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता दिली आहे. पुढील वर्षी डिग्री इंजिनिअरिंग, एमसीए, बीसीए हे अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या संस्थेत उच्चशिक्षित व अनुभवी प्रश्नध्यापकवर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, इंटरनेट सुविधा, संगणक कक्षाची व्यवस्था करण्यात आल्याचे राहुल महाडिक यांनी सांगितले.

सांगलीत तिघे हप्तेखोर पोलीस निलंबित
मिरज, ३० जून / वार्ताहर
कर्नाटकातून सांगली पेठेत शेतीमाल घेऊन येणाऱ्या वाहनधारकांना अडवून हप्ता वसुली होत असल्याच्या तक्रारीवरून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या दोन पोलिसांसह मुख्यालयाकडील एका अशा तीन कर्मचाऱ्यांना मंगळवारी निलंबित करण्यात आले. याबाबत पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी अद्याप लेखी आदेश दिले नसले तरी बिनतारी संदेश यंत्रणेमार्फत तात्काळ कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. म्हैसाळ रस्त्यावरील वड्डी पंपानजीक मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी राजू रेडेकर व राजू कर्नाळकर व पोलीस मुख्यालयाकडील अविनाश भोसले हे तिघेजण वाहनधारकांची अडवणूक करीत असल्याची तक्रार मंगळवारी सकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात करण्यात आली. पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी या घटनेची सत्यता पडताळून या तिघांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. याबाबत पोलीस निरीक्षक अमर देसाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही घटना घडल्याचे मान्य केले. मात्र याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून अद्याप लेखी आदेश प्रश्नप्त झाले नसल्याने कार्यवाही झालेली नाही, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, कर्नाटकातून येणाऱ्या वाहनधारकांकडून महापालिका जकात नाक्यावरही अडवणूक होत असल्याच्या तक्रारी असून अतिरिक्त रक्कम उकळली जात असल्याच्या तक्रारी आहेत.

अन्य विषयांत ७० टक्के, गणितात मात्र शून्य गुण!
कोल्हापूर, ३० जून / प्रतिनिधी

अन्य विषयांमध्ये ६० ते ७० टक्के गुण मिळविणाऱ्या परीक्षार्थ्यांना गणित विषयात ० गुण मिळाले आहेत. हा शालान्त परीक्षा मंडळाचा घोटाळा आहे की संगणकाचा घोटाळा आहे, असा सवाल जनता दलाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अरुण सोनाळकर यांनी कोल्हापूर शालान्त परीक्षा मंडळाच्या अधिकाऱ्यांना विचारला. हा गणित घोटाळा नेमका कशातून झाला हे स्पष्ट होत नाही, तोपर्यंत विभागीय मंडळाच्या कार्यालयासमोर रोज धरणे आंदोलन सुरू राहील असा इशाराही या वेळी देण्यात आला. माजी गृहराज्यमंत्री आणि समाजवादी अध्यापक सभेचे नेते भाई वैद्य यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा मंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर आज धरणे धरण्यात आले. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्य़ांमधील सुमारे २ लाख ६५ हजार परीक्षार्थी गणित या विषयात नापास झाले आहेत. हा संगणकाचा घोटाळा आहे की परीक्षकांचा घोटाळा आहे असा सवाल जनता दलाच्या वतीने विभागीय परीक्षा मंडळाला विचारण्यात आला. अ‍ॅड.अरुण सोनाळकर तसेच शिवाजीराव परूळेकर यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने परीक्षा मंडळाचे एक अधिकारी श्री. पायमल यांची भेट घेतली आणि त्यांना गणित विषयाचा घोटाळा सांगितला. हा घोटाळा स्पष्ट होत नाही, तोपर्यंत मंडळाच्या कार्यालयासमोर दररोज २० शाळांचे १०० प्रतिनिधी लाक्षणिक उपोषण करतील असा इशारा या शिष्टमंडळाने पायमल यांना दिला.