Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

बाजार समिती सदस्य निवडणुकीत बंडखोराला २६ मते
कोल्हापूर महापालिकेतील दोन्ही आघाडय़ाना फुटीचे ग्रहण
कोल्हापूर, ३० जून / विशेष प्रतिनिधी

 

कोल्हापूर महानगरपालिकेत सत्तारूढ आणि विरोधी आघाडय़ांमध्ये गेले काही दिवस खदखदत असलेल्या असंतोषाचे दर्शन मंगळवारी सर्वसाधारण सभेत झाले. महापालिकेच्या सभागृहातून जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीवर पाठविण्याच्या एका सदस्याच्या निवडणुकीत दोन्ही आघाडय़ा एकत्र येऊनही तब्बल २६ सदस्यांनी बंडखोर उमेदवाराच्या पारडय़ात आपली मते टाकली. यामुळे दोन्ही आघाडय़ांना फुटीचे ग्रहण लागल्याचे स्पष्ट झाले असून महिनाभरात उंबरठय़ावर येऊन ठेपलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत महापालिकेचे राजकारण एका निर्णायक वळणावर येऊन ठेपले आहे.
महापालिकेच्या शाहू सभागृहात मंगळवारी शेतीउत्पन्न बाजार समितीवर पाठविण्यात येणाऱ्या एका सदस्याच्या निवडीसाठी खास सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. महापौर उदय साळोखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सभागृहनेते अजित ऊर्फ िपटू राऊत यांच्या उमेदवारीवर सत्तारूढ जनसुराज्य राष्ट्रवादी व विरोधी ताराराणी या दोन्ही आघाडय़ांनी आपले समर्थन जाहीर केले होते. ताराराणी आघाडीने तर िरगणात असलेले आपले उमेदवार प्रकाश चौगुले यांना माघार घेण्यास भाग पाडून ही निवड अविरोध करीत असल्याचे संकेत दिले. प्रत्यक्षात मात्र जनसुराज्य-राष्ट्रवादी आघाडीत बंडखोरीचा शड्डू मारून उभारलेल्या रफिक मुल्ला यांच्या उमेदवारीने दोन्ही आघाडय़ांना धक्का दिला. सभागृहनेते अजित राऊत विरुद्ध रफिक मुल्ला अशा थेट लढतीमध्ये राऊत ४२ मते मिळवून विजयी झाले असले, तरी मुल्ला यांनी २६ मते मिळविल्याने दोन्ही आघाडय़ांचे कारभारी हादरून गेले आहेत.
शेती उत्पन्न बाजार समितीवर पाठविण्यात येणाऱ्या सदस्य निवडीची महापालिकेच्या राजकारणात फारशी दखल घेतली जात नाही. किंबहुना आजपर्यंत काही सदस्यांना अनिच्छेने जाणे भाग पडत होते. यंदा मात्र ही निवड अधिक चुरशीची बनली. या पदासाठी भावनिक गुंतागुंत झालेले सभागृहनेते अजित राऊत यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आणि जनसुराज्य राष्ट्रवादी आघाडीत बंडखोरीचे वारे वाहू लागले. राऊत यापूर्वी विरोधी पक्षनेते होते. पालिकेत त्यांची आघाडी सत्तारूढ होताच त्यांना सभागृहनेत्याचा मानही मिळाला. यामुळे तीन वषार्ंच्या कालावधीत दोन पदे भोगणाऱ्या राऊत यांना तिसरे पद कशासाठी? असा सवाल करीत कांही सदस्यांनी बंड पुकारले. या बंडाची चाहूल लागल्यामुळे गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम क्षणी ताराराणी आघाडीने आपले उमेदवार प्रकाश चौगुले यांचा अर्ज दाखल केला. सोमवारी संपूर्ण दिवसभर सत्तारूढ आणि विरोधी दोन्ही आघाडय़ांचे सदस्य राऊत यांच्या अविरोध विजयासाठी धडपडत होते. मुल्ला यांनी माघार घेतल्यास चौगुले यांची माघार घेऊन निवड अविरोध करण्यात येईल असे सांगून दोन्ही आघाडय़ांचे कारभारी बंडखोरांबरोबर तडजोड करीत होते. मंगळवारी सर्वसाधारण सभा सुरू होईपर्यंत हे प्रयत्न चालू राहिले. परंतु बंडखोर ठाम राहिल्याने शेवटी निवडणूक अटळ ठरली आणि महापालिकेतील दोन्ही आघाडय़ांच्या असंतोषाचे जाहीर दर्शन झाले.
सभागृहात अन्य झालेल्या कामकाजामध्ये शहरातील तीन महत्त्वाच्या भूखंडांवरील आरक्षण उठविण्यात आले. यामध्ये पर्यावरण संतुलनासाठी आरक्षित केलेले फ्लोईंग ग्रीन गार्डन, क्रीडांगण व अन्य एका वाणिज्य वापराच्या भूखंडांचा समावेश आहे. सभेत हे आरक्षण उठविण्याचे विषय पुढील सभेत चर्चेला ठेवावेत असा आग्रह काही सदस्यांचा होता तर गेले काही दिवस डेंग्यूसदृश आजाराने फणफणत असलेले नगरसेवक अनिल आवळे यांनी शहरात डेंग्यूचे १५ रुग्ण असल्याचे ओरडून सांगत सभागृहात चर्चेची मागणी केली. परंतु म्होरक्यांनी एकगठ्ठा विषय मंजूर अशी आरोळी ठोकून सभा संपल्याची घोषणा केली.