Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

बिल्डरवरील कारवाई, ई-टेंडरवरून सांगली स्थायी समितीत वादावादी
काँग्रेस सदस्यांचे सर्वच विषयांवर आक्षेप
सांगली, ३० जून/प्रतिनिधी

 

वृक्षतोड करून बांधकाम करणाऱ्या एका वादग्रस्त बिल्डरवरील कारवाई, महावीर उद्यानाचा विकास व ई-टेंडर या मुद्दय़ावरून स्थायी समितीची मंगळवारची सभा वादळी ठरली. काँग्रेस सदस्यांनी या सर्वच विषयांवर सभेत जोरदार आक्षेप घेतले. सांगली शहरातील राजवाडा परिसरात वृक्षतोड करून सुरू असलेले बांधकाम तत्काळ रोखावे, असे आदेश गत स्थायी समितीच्या बैठकीत सभापती हरिदास पाटील यांनी दिले होते. मात्र मंगळवारच्या सभेत या विषयावर काँग्रेसच्या हणमंत पवार यांनी आवाज उठवित बिल्डर एम. व्ही. कुलकर्णी यांच्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याचे निदर्शनास आणून देत हे बांधकाम तत्काळ रोखावे, अशी मागणी केली. पण सत्ताधारी गटाने गत सभेत दिलेला आदेश मागे घेत संबंधित बिल्डरची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. चौकशीपूर्वी दोषी ठरविणे चुकीचे असून, या प्रकरणात प्रशासनानेही गलथान कारभार केला आहे. कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई केली जाईल, असे सभापती हरिदास पाटील यांनी सांगितले.
ई-टेंडर पद्धतीचा अवलंब केल्यानंतर अंत्यविधीसाठी लाकूड पुरविण्याच्या निविदेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप हणमंत पवार यांनी या सभेत केला. निविदा भरण्याची मुदत संपल्यानंतर तीन निविदा प्रश्नप्त झाल्या होत्या. पण प्रशासनाने तांत्रिक अडचण पुढे करून निविदा भरण्याची मुदत एक दिवसाने वाढवली. यात आणखी दोन निविदा दाखल झाल्या असून, त्यातील एकाला हा ठेका देण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. सत्ताधारी विकास महाआघाडी ई-टेंडरचा पारदर्शक कारभार सुरू असल्याचे सांगत असले तरी यातही टेंडर मॅनेज करता येऊ शकते, याचाच प्रत्यय सत्ताधारी गटाने आणून दिल्याचा आरोपही त्यांनी केला. या सभेत प्रशासनानेही तांत्रिक अडचणीमुळे ही चूक झाल्याची कबुली दिली.
महावीर उद्यानाच्या विकासावरूनही या सभेत मोठा गदारोळ उडाला. काँग्रेस सदस्यांनी या उद्यानावर आतापर्यंत ८३ लाख रुपये खर्च करण्यात आले असून, पुन्हा एक कोटी २० लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या सभेत २९ लाख रुपयांचा लॉन विकसित करण्याचा विषय पत्रिकेवर होता. त्यासाठी अंदाजपत्रकात २० लाख रुपयांची तरतूद केली असून, उर्वरित नऊ लाख रुपये खासदार निधीतून उभारण्यात येणार असल्याचा खुलासा आयुक्त दत्तात्रय मेतके यांनी केला. त्याला काँग्रेस सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला.
यंदाचे अंदाजपत्रक अद्यापपर्यंत मंजूर नसताना हा विषय मंजूर करणे योग्य ठरणार नाही, असा मुद्दा उपस्थित केला. अखेर सभापती हरिदास पाटील यांनी या विषयाला स्थगिती दिली.

सभा हायजॅक!
स्थायी समितीची सभा मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास महापालिका मुख्यालयातील कै. राजाभाऊ जगदाळे सभागृहात होती. या सभेला सर्व सदस्य उपस्थित असताना सभापती हरिदास पाटील हे मात्र उशिराने आले. तोपर्यंत काँग्रेसच्या हणमंत पवार यांनी सभापतींच्या आसनाचा ताबा घेऊन नगरसचिव विभागाला सभा सुरू करण्याचे आदेश दिले. तोपर्यंत सभापतींना याची कुणकुण लागताच ते तातडीने सभागृहात दाखल झाले व त्यांनी आपल्या आसनाचा ताबा हणमंत पवार यांच्याकडून घेतला. मात्र ही सभा काँग्रेस सदस्यांनीच हायजॅक केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली होती.