Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘विशाल सह्य़ाद्री’ कार्याध्यक्ष, सचिवपदावरून अखेर कुलकर्णी बंधूंची हकालपट्टी
सातारा, ३० जून / प्रतिनिधी

 

येथील विशाल सह्य़ाद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयंत कुलकर्णी व सचिव अ‍ॅड. सतीश कुलकर्णी यांनी नियोजित वार्षिक सभा घेण्याचे टाळल्याने संतप्त सभासदांनी विजय दामोदर अराणके यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस बंदोबस्तात सभा घेऊन त्यामध्ये कुलकर्णी बंधूंची पदावरून हकालपट्टी करून त्या जागी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सर्कल सेक्रेटरी धनाजी ऊर्फ दाजी फडतरे यांची कार्याध्यक्षपदी तर सचिवपदी आर. डी. लढ्ढा यांची निवड करण्यात आली असल्याचे दाजी फडतरे यांनी सांगितले.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले विशाल सह्य़ाद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. मात्र ते या सभेला उपस्थित राहिले नाहीत. या संस्थेची स्थापना १९८९ साली असून, शाहूनगर गोडोली परिसरात हायस्कूल चालविण्यात येते. महाराज्य राज्य विद्युत मंडळात कार्यरत असलेल्या महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या सभासदांनी व वीज मंडळाशी संबंधित असलेल्या विशाल सह्य़ाद्री हौसिंग सोसायटीमधील रहिवाशांनी ही संस्था स्थापन केली आहे. संस्थेत मनमानी कारभार सुरू झाल्याने त्यास सभासदांनी आव्हान दिले आहे. या वर्षीची सभा न्यायालयाच्या हुकमावरून बोलावण्यात आली. संस्थेचे ६०९ सभासद बैठकीसाठी विद्युत प्लॉट नं.१ विशाल हौ. सोसायटी शाहूनगर येथे आले असता सकाळी ११ वाजता गेटला कुलूप लावून सचिव घरात बसले तर कार्याध्यक्ष निघून गेले, असे आढळून आल्यानंतर प्रश्नंगणातच रस्त्यावर सभादांनी विजय दामोदर आराणके यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेतली. १७ विषय मंजूर करण्यात आले. या सभेत संस्थेच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने बुधवारपासून आपण संस्थेच्या कार्यालयात जाऊन कामकाज पाहण्यास सुरुवात करणार असल्याचे दाजी फडतरे यांनी सांगितले.
दरम्यान विद्युत नागरी पतसंस्थेच्या पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत दाजी फडतरे यांच्या नेतृत्वाखाली वीज मंडळ वर्कर्स फेडरेशनचे कॉ. दत्ताजी देशमुख पॅनेलचे रमेश क्षीरसागर (इतर मागास), सुनील पवार (आर्थिक दुर्बल), गजानन गावडे (भटके विमुक्त) व विठ्ठल मुकणे (अनुसूचित जाती) या चौघा उमेदवारांचे प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने ते बिनविरोध निवडून आल्यात जमा आहेत.