Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

कोल्हापुरात डेंग्यूच्या रुग्णांची झपाटय़ाने वाढ
कोल्हापूर, ३० जून/विशेष प्रतिनिधी

 

कोल्हापूर शहरामध्ये डेंग्यूच्या साथीच्या रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढते आहे. वेळोवेळी सूचना देऊनही आरोग्य विभागाकडून कोणतीच गांभीर्याने उपाययोजना न केल्यामुळे ही साथ आटोक्यात आणणे सोडाच, रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊ लागल्याने प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना केली पाहिजे, अन्यथा साथीचा फैलाव होऊन हाहाकार माजू शकेल, अशी भीती नगरसेवक अनिल आवळे यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
कोल्हापुरात गेल्या तीन महिन्यांत डेंग्यूच्या आजाराने तीन नागरिकांचा बळी गेला आहे. ठिकठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत, तर मोठय़ा संख्येने असलेल्या रुग्णांभोवती डेंग्यूच्या संशयाची टांगती तलवार कायम आहे. नगरसेवक अनिल आवळे यांना गेल्या पंधरवडय़ात डेंग्यूसदृश लक्षणे दिसू लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना स्वत: शासकीय यंत्रणेकडून आलेले अनुभव, प्रशासनाची अनभिज्ञता आणि रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांची ससेहोलपट या पाश्र्वभूमीवर कोल्हापुरात त्यांनी याची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. या सर्वेक्षणात कांही गंभीर माहिती हाती आल्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी त्यांनी या प्रकरणाकडे सभागृहाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. शहराच्या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाकडे मी लक्ष वेधतो आहे. मला पाच मिनिटे बोलण्याची संधी द्या, असे आवळे सभागृहात ओरडून सांगत होते; परंतु सभागृहात आरक्षणे उठवण्याचा ठराव करण्यात रममाण झालेल्या बहुसंख्य सदस्यांनी त्यांना बोलू दिले नाही. यामुळे सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधून त्यांनी ही माहिती दिली. कोल्हापुरात गेल्या आठवडय़ात एकाच रुग्णालयात डेंग्यू पॉझिटिव्ह आणि संशयित अशा प्रकारच्या एकूण १७ रुग्णांनी उपचार घेतल्याची माहिती त्यांनी दिली. यापैकी पाच रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे, तर उर्वरित १२ रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमालीचे घसरले आहे. या रुग्णालयाखेरीज शासकीय रुग्णालये व अन्य रुग्णालयांतही अशा प्रकारचे रुग्ण मोठय़ा संख्येने निदर्शनास येऊनही खबरदारीचा उपाय म्हणून कोणत्याच हालचाली प्रशासनाकडून होत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. दाखल झालेल्या रुग्णांपैकी बहुसंख्य रुग्ण हे दाट लोकसंख्या असलेल्या वस्तीतील आणि आर्थिकदृष्टय़ा कमकुवत गटातील आहेत. अशा रुग्णांना औषधोपचारासाठी त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे, असे आवळे या वेळी म्हणाले.
संबंधित रुग्णांना औषधोपचाराबरोबर रक्ताची मोठय़ा प्रमाणात गरज भासते. प्लेटलेट्सचा पुरवठा करणे ही आवश्यक बाब बनते. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीत रक्त उपलब्ध नाही आणि रुग्णाच्या नातेवाइकांनी जरी रक्त देण्याची तयारी दर्शविली तरी रक्तातील पेशींचे विघटन करणारे यंत्रच बंद पडल्यामुळे त्यांना मोठय़ा समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे आवळे यांनी निदर्शनास आणून दिले. ते म्हणाले, शासकीय रुग्णालयातील रक्तपेढी वगळता अन्यत्र खासगी रक्तपेढय़ांतून रक्त महाग दराने मिळते. निव्वळ प्लेटलेट्स घ्यावयाच्या तर त्याचा खर्चही मोठा आहे आणि उपचारादरम्यान अशा अनेक रक्ताच्या बाटल्या उपलब्ध कराव्या लागतात. रुग्णच गरीब असल्याने एका बाजूला आजाराशी सामना करताना दुसऱ्या बाजूला त्यांना पैशाच्या जोडणीसाठी दारोदार फिरावे लागते आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पंधरा दिवसांपूर्वी हा मुद्दा आपण उपस्थित केला होता. रोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने हालचाली करण्याच्या सूचना दिल्या. पण प्रत्यक्षामध्ये प्रशासनाकडून दृश्य स्वरूपात कोणत्याच हालचाली होताना दिसत नाहीत. साहजिकच हे प्रकरण हाताबाहेर जाण्याच्या मार्गावर येऊन ठेपले आहे.