Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

पॉलिश करण्याच्या बहाण्याने आठ तोळय़ांचे दागिने लंपास
कोल्हापूर, ३० जून / प्रतिनिधी

 

सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो, असे सांगून दोन वेगवेगळय़ा ठिकाणी सुमारे आठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास करण्याचे प्रकार आज दुपारी घडले. दरम्यान, लोकांनीच अशाच प्रकारची ठकबाजी करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोघाजणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी वेगवेगळय़ा ठिकाणी आणखी चौघाजणांना ताब्यात घेतले. हे सर्व सराईत भामटे असून त्यांच्याकडून आजपर्यंत झालेल्या अशाच प्रकारच्या गुन्हय़ांची उकल होण्याची शक्यता जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय कुरुंदकर यांनी सांगितले.
आज दुपारी अंबाई टँक परिसरात एका मोटारसायकलवरून दोघेजण आले. तेथे त्यांनी एका घरात सोन्याचे दागिने तसेच अन्य वस्तू पॉलिश करून देतो असे सांगितले. पॉलिश करणाऱ्या या दोघाजणांबद्दल आसपासच्या लोकांना संशय आल्यानंतर लोकांनी त्यांना पकडले आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. या दोघाजणांकडे पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्यांचे आणखी चार साथीदार वेगवेगळय़ा भागांत अशाच प्रकारचे गुन्हे करण्यासाठी फिरत असल्याचे समजले.
ताब्यात असलेल्या दोघाजणांना फोनवरून त्यांच्या साथीदारांशी संपर्क साधण्यास पोलिसांनी सांगितले. या दोघाजणांनी आम्ही जनता बझार येथे आहोत तेथे या, असे आपल्या साथीदारांना सांगितल्यानंतर तेथे आलेल्या आणखी दोघाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशाच पद्धतीने आणखी दोघाजणांना ताब्यात घेतले. हे सहाही संशयित आंतरराज्यीय टोळीचे सदस्य असावेत. त्यांचा एक म्होरक्या मराठवाडय़ात असून त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक आज रात्रीच तिकडे रवाना होणार आहे.
दरम्यान, शाहू नाका परिसरात राहणाऱ्या मंगला शाहू पाटील या महिलेकडे आज दोघेजण दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने आले होते. मंगल पाटील हिने आपल्या हातातील तीन तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या पॉलिशसाठी दिल्या. तिथे हातचलाखी करून दोघेजण पसार झाले. कळंब तर्फ ठाणे येथेही आज पार्वती शंकर शिंदे या महिलेस दागिने पॉलिश करतो असे सांगून साडेचार तोळे वजनाचे सोन्याचे चिताक आणि अर्धा तोळे वजनाची सोन्याची अंगठी या भामटय़ांनी हातोहात लंपास केली. आज एकाच दिवशी दोन वेगवेगळय़ा ठिकाणी अशाच पद्धतीचे गुन्हे घडले. मात्र पोलिसांच्या सुदैवाने नागरिकांनी अंबाई टँक परिसरात दोघा भामटय़ांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्यामुळे अशा प्रकारचे आज झालेले गुन्हे आणि यापूर्वी झालेले गुन्हे या आंतरराज्यीय टोळीकडून उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.