Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

सोलापुरात विधानसभा जागांबद्दल काँग्रेस- राष्ट्रवादीमध्ये संघर्ष सुरू
सोलापूर, ३० जून / प्रतिनिधी

 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सोलापूर शहर उत्तर आणि सोलापूर दक्षिण या दोन मतदारसंघांची केलेली मागणी मान्य तर करूच नये उलट राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या पंढरपूर, माढा या मतदारसंघासह बार्शी मतदारसंघ काँग्रेस पक्षासाठी सोडण्यात यावे, अशी जोरदार मागणी शहर आणि जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आली.
येथील शासकीय विश्रामगृहात ग्रामविकास राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षातील विधानसभा इच्छुक उमेदवारांची आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला सोलापूर शहर उत्तर आणि सोलापूर दक्षिण (पूर्वीचा दक्षिण सोलापूर) हे विधानसभा मतदारसंघ सोडण्यास कडाडून विरोध करण्यात आला. गेल्या शनिवारी राष्ट्रवादीचे नेते, ग्रामविकासमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या बैठकीत वरील दोन मतदारसंघांची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे आग्रह धरण्यात येणार असल्याचे श्री. मोहिते-पाटील यांनी सांगितले होते. या पाश्र्वभूमीवर शहर आणि जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत राष्ट्रवादीने केलेल्या केलेल्या दोन मतदारसंघांची मागणी अमान्य करण्यात यावी. उलट काँग्रेसचा प्रभाव असलेल्या पंढरपूर, माढा आणि बार्शी हे तीन मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यात यावे, अशी कार्यकर्त्यांनी आग्रही मागणी केली. कार्यकर्त्यांच्या या भावनेची कदर करून पक्षाच्या केंद्रीय आणि प्रदेश नेतृत्वाकडे आग्रह धरण्यात येईल, असे श्री. म्हेत्रे यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये जागांच्या संदर्भात संघर्षाची ठिणगी पडली असून यातून केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे हे कोणत्या पद्धतीने मार्ग काढतील, याकडे दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले असून उत्सुकताही वाढली आहे.
काँग्रेसच्या बैठकीस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, शहराध्यक्ष धर्मा भोसले, ज्येष्ठ नेते विष्णुपंत कोठे, माजी मंत्री आनंदराव देवकते, महापौर अरुण वाकसे, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा डॉ. सुनीता गायकवाड, माजी महापौर प्रश्न. पुरणचंद पुंजाल, काँग्रेसच्या शहराध्यक्षा अलका राठोड, महेश कोठे, अंबादास गुत्तीकोंडा, सलीम कल्याणी आदी उपस्थित होते.