Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

हरळीच्या ज्ञानप्रबोधिनी निवासी शाळेत ७३ विद्यार्थ्यांना विषबाधा
सोलापूर, ३० जून/प्रतिनिधी

 

सोलापूरपासून जवळच असलेल्या हराळी (ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) येथील ज्ञानप्रबोधिनी निवासी शाळेत अन्नातून विषबाधा झाल्याने ७३ विद्यार्थ्यांना येथील छत्रपती शिवाजी सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात ६ ते १२ वर्षे वयोगटातील ५३ मुला-मुलींचा समावेश आहे. या सर्वाची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावरील धोका टळल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराशी निगडित असलेल्या हराळीच्या ज्ञानप्रबोधिनी निवासी शाळेत काल सोमवारी सकाळी ८.३० च्या सुमारास विद्यार्थ्यांना नाष्टय़ापोटी पोहे आणि दूध देण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या अध्र्या तासाने या विद्यार्थ्यांना उलटय़ांचा त्रास सुरू होऊन पोटात कळा मारू लागल्या. त्यामुळे सर्वाना सुरुवातीला जेवळी येथील प्रश्नथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आले. नंतर रात्री दहाच्या सुमारास सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील बालरोगतज्ज्ञ डॉ. शाकिरा सावस्कर व डॉ. व्ही. एन. धडके यांच्या नेतृत्वाखालील ४० डॉक्टरांच्या दोन पथकांनी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू केले. या वेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश देवकर यांनी व्यवस्थापन सांभाळले.
या विषबाधित विद्यार्थ्यांना अन्नातून नेमकी कशामुळे विषबाधा झाली, हे स्पष्ट झाले नाही. अन्नाचे व उलटय़ांचे नमुने रासायनिक तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. औषधोपचारानंतर विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवरील धोका टळला असला तरी त्या सर्वाना आणखी २४ तास निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. देवकर यांनी सांगितले.