Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

महाबळेश्वर नगराध्यक्षपदी किसन शिंदे बिनविरोध
महाबळेश्वर, ३० जून/वार्ताहर

 

महाबळेश्वर नगराध्यक्षपदी लोकमित्र जनसेवा आघाडीचे किसनराव शिंदे तर उपनगराध्यक्षपदी नंदा खामकर यांची बिनविरोध निवड झाली. निर्वाचन अधिकारी कुमार खैरे यांनी आजच्या विशेष सर्वसाधारण सभेत त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. या वेळी मावळते नगराध्यक्ष युसुफभाई शेख, मावळत्या उपनगराध्यक्षा छायाताई शिंदे, आघाडीचे डी. एम. बावळेकर, पी. डी. पार्टे, मुख्याधिकारी किशोर बोर्डे आदी उपस्थित होते.
महाबळेश्वरच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांच्या निवडीसाठी आज (मंगळवारी) वाईचे प्रश्नंताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार खैरे यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची विशेष सभा पालिका सभागृहात दुपारी १ वा. च्या सुमारास सुरू झाली. दरम्यान, नगराध्यक्षपदासाठी काल चार उमेदवारांपैकी तीनजणांनी अर्ज मागे घेतले होते. त्यामुळे त्यातील चौथा अर्ज असणारे किसनशेठ शिंदे हे बिनविरोध नगराध्यक्ष होणार हे सोमवारीच निश्चित झाले होते. मात्र उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया मंगळवारी (आज) सुरू झाली. सकाळी या लोकमित्र जनसेवा आघाडीच्या नगरसेविका नंदा किसन खामकर यांचा एकटय़ाचाच अर्ज मुख्याधिकारी किशोर बोर्डे यांच्याकडे दाखल झाला. त्यामुळे त्याही बिनविरोध निवडल्या जाणार हे सकाळीच निश्चित झाले होते.
दरम्यान, निर्वाचन अधिकारी खैरे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी विशेष सभा सुरू झाली. त्यावेळी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी अनुक्रमे किसनशेठ शिंदे व नंदा खामकर यांचा एकेकच फॉर्म आल्याने नगराध्यक्षपदी श्री. शिंदे तर उपनगराध्यक्षपदी श्रीमती खामकर यांनी बिनविरोध निवड झाल्याचे श्री. खैरे यांनी जाहीर केले. तिचे स्वागत उपस्थितांनी टाळ्या वाजवून केले. यावेळी पालिकेचे सर्व नगरसेवक व विविध समाजाचे प्रतिनिधी, नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. महिलांचाही त्यात विशेष सहभाग होता. याच वेळी प्रशासनाच्या वतीने श्री. खैरे यांनी तर पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी किशोर बोर्डे यांनी पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.