Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

कोल्हापुरात पोटनिवडणुकीसाठी युतीचे सचिन भोळे, आर. डी. पाटील
कोल्हापूर, ३० जून / विशेष प्रतिनिधी

 

कोल्हापूर महानगरपालिकेतील घोडेबाजाराला आळा घालण्यासाठी पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन सेनेचे शहरप्रमुख राजेश क्षीरसागर व भाजपा शहर प्रमुख महेश जाधव यांनी मंगळवारी येथे एका पत्रकार परिषदेत केले.
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २३ मीराबाग येथील नगरसेवक उमेश कांदेकर यांच्या निधनामुळे तसेच प्रभाग क्रमांक ५१ खरी कॉर्नर येथील नगरसेवक विजय सरदार यांना अपात्र ठरविण्यात आल्यामुळे सध्या पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी सेना-भाजप युतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अनुक्रमे सचिन भोळे (शिवसेना) व माजी नगरसेवक आर.डी.पाटील (भाजपा) यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उभयतांनी हे आवाहन केले. या दोन्हीही उमेदवारांचे अर्ज भव्य रॅलीने दाखल करण्यात येतील, असे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
पत्रकार परिषदेत महानगरपालिकेच्या अनागोंदी आणि भ्रष्ट कारभाराकडे उभयतांनी लक्ष वेधले. पैशाच्या जीवावर निवडून येणारे प्रतिनिधी कसे विकावू ठरतात आणि त्यांचा कल पुन्हा गुंतवलेले पैसे वसूल करण्याकडे कसा असतो हे सध्याच्या सभागृहानेच दाखवून दिले आहे. त्यांना अशा प्रकारच्या प्रवृत्तींकडून विकासाची अपेक्षा करण्यापेक्षा पक्षाचे नियंत्रण असलेल्या सेना-भाजप युतीच्या उमेदवारांना विजयी केले पाहिजे असे या वेळी सांगण्यात आले.
राजेश क्षीरसागर म्हणाले, महापालिका प्रशासन सध्या सर्वच बाबीत अपयशी ठरले आहे. प्रशासनाला पंचगंगेचे प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करता येत नाही. थेट पाइपलाइनचा प्रश्न सोडविता येत नाही. नियमितपणे कचरा उठाव करता येत नाही आणि या सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे याविषयी प्रशासनाला जाब विचारण्याचा अधिकारही नगरसेवकांनी गमावला आहे. केवळ पैशाच्या वाटय़ासाठी नगरसेवक भांडताना दिसत असल्याने पुन्हा अपक्ष वा काँग्रेस, राष्ट्रवादीच्या भ्रष्ट उमेदवारांना निवडून देण्याऐवजी सेना-भाजप युतीला निवडून देऊन विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापुरात परिवर्तनाचे निशाण रोवले पाहिजे.