Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

लूटमारीतील ४७ हजार कागलमध्ये हस्तगत
कागल, ३० जून/वार्ताहर

 

कागल को-ऑप. बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांवर अ‍ॅसिड फेकून त्यांच्याकडील २० लाख रुपये असलेली बॅग पळवून नेणाऱ्या सहाजणांना पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर अवघ्या काही तासांत पकडले होते. त्यांच्याकडून १९ लाख ५१ हजार रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली होती. उरलेल्या ४९ हजार रुपयांपैकी ४७ हजार रुपये आज कागल पोलिसांनी मारुती रामचंद्र दाबाडे याच्याकडून हस्तगत केले.
वीस लाख रुपयांची लूट केल्यानंतर या गुन्ह्य़ातील एक प्रमुख आरोपी शिवाजी साताप्पा पाटोळे हा ही रक्कम घेऊन कोगनोळी येथील त्याचा मामा मारुती दाबाडे याच्याकडे गेला होता. पैसे असलेली गुन्ह्य़ातील बॅग ओळखली जाईल म्हणून शिवाजीने त्याचा मामा मारुती दाबाडे याच्या घरातून यूरियाचे प्लॅस्टिकचे रिकामे पोते घेतले. या पोत्यामध्ये नोटांची बंडले भरून हे पोते मामाच्या ताब्यात दिले. त्यानंतर तो कोल्हापुरात आला.
सायंकाळी तो पुन्हा कोगनोळी येथे आला. त्याने मामाकडून पैशाचे पोते घेतले आणि तो निघून जात असताना मामा मारुती दाबाडे म्हणाला की, मला बक्षीस देतोस का? अशी विचारणा केल्यानंतर शिवाजीने पोत्यातून लाखाचे बंडल बाहेर काढले व त्यातील अंदाजाने काही नोटा मामाला बक्षीस म्हणून दिल्या. उर्वरित नोटा स्वत:च्या खिशात ठेवल्या. एक हजार रुपये दारूसाठी आणि जेवणासाठी खर्च केले.
भाच्याने दिलेले ४७ हजार रुपये मामा दाबाडे याने एवढी रक्कम घरात कशी ठेवायची म्हणून एका पिशवीत घालून त्या नोटा शेतामध्ये एका झाडाजवळ खड्डा खणून ती पिशवी पुरून टाकली. कागल पोलिसांनी आज शिवाजीचा मामा मारुती दाबाडे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ४७ हजार रुपये जप्त केले. आता या गुन्ह्य़ात २० लाखांपैकी १९ लाख ९८ हजार ४०० रुपये वसूल करण्यात आले आहेत.