Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

दारूबंदीसाठी वाठारच्या महिलांनी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे
पेठवडगाव, ३० जून / वार्ताहर

 

दारूबंदीसाठी हात उंचावून मतदान प्रक्रियेत मोजक्या मताच्या पराभवानंतर वाठार गावातील महिला आता दारूबंदीसाठी फेब्रुवारीमध्ये निघालेल्या नवीन अध्यादेशानुसार गुप्त मतदानाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करणार आहेत. तसेच महिला सरपंच वगळता १३ पैकी एकाही सदस्याने गावातील या दारूबंदी आंदोलनात रस घेतला नाही तर त्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या घरातील महिला या प्रक्रियेत सहभागी झाल्या नाहीत, त्याच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी ग्रामपंचायतीला टाळे ठोकून या ग्रामपंचायत सदस्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचा निर्णय वाठारच्या या महिलांनी घेतला आहे.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीने गजबजलेले वाठार (ता.हातकणंगले) हे गाव दारू दुकानासाठी परवाने मागणाऱ्यांची वाढती संख्या आणि सध्या असणारे ५ बार, २ देशी दारूविक्रीची व एक घाऊक विक्रीचे दुकान याबरोबरीने महिलांनी दारूबंदीसाठी घेतलेले आंदोलनाचा पवित्रा याने सध्या चर्चेत आहे.
एका ग्रामसभेत तब्बल १६ दारू दुकानासाठी परवानगी मागितली आणि तेथूनच सरपंच सुनीता शिंदे व स्वाती क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली दारूबंदीसाठी आंदोलन सुरू झाले. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी महिलांचे मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. अवघ्या कांही मिनिटात १०६८ हून अधिक महिलांचे मतदान प्रक्रियेत उघडपणे नोंदविण्याची प्रक्रिया तशी आवाहन देणारी होती. त्यातूनही १०५१ महिलांनी दारूबंदीत हात उंचावून पाठिंबा दिला. मात्र अवघ्या १७ मतांनी दारूबंदीचा निर्णय होवू शकला नाही आणि हरतऱ्हेचे प्रयत्न केलेले दारूदुकानदार व त्यांचे समर्थक आनंदी झाले. महिलांना मतदानापासून वंचित ठेवून घरी थांबविण्याचे, त्यांचे ओळखपत्र, रेशनकार्ड लपवून ठेवण्याचे यासह दारूबंदी होवू नये यासाठी करण्यात आलेले अनेक प्रकार आता उजेडात येताहेत. मतदान प्रक्रियेबाबतही शासनावर ठपका ठेवला जात आहे.