Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

नगरसेवक बंधूंवर २० लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप
सोलापूर, ३० जून/प्रतिनिधी

 

काँग्रेसचे नगरसेवक जब्बार शेख यांच्या खून खटल्यातील आरोपींच्या कुटुंबीयांना २० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक आरीफ शेख व तौफिक शेख या बंधूंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. दरम्यान, हा आरोप शेख बंधूंनी फेटाळून लावला आहे.
नई जिंदगी चौक भागातील नगरसेवक जब्बार शेख यांचा खून केल्याप्रकरणी अब्दुल रहीम सालार, मुन्ना सालार, वाजीद सालार आदींविरुध्द येथील सत्र न्यायालयात खटल्याची सुनावणी चालू आहे. या खटल्यातील पंचांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करून सालार कुटुंबीयांना त्रास दिला जात आहे. गुंडप्रवृत्तीचे नगरसेवक शेख बंधू हे २० लाखांची खंडणी मागत आहेत, असा आरोप सालार कुटुंबीयांतील सईदा रहीम सालार आणि सईदा अजीज सालार यांनी पत्रकार परिषदेत केला. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंदवूनसुध्दा शेख बंधूंवर कारवाई न होता उलट राजकीय दबाबापोटी सालार कुटुंबीयांनाच पोलीस त्रास देत आहेत. यात न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा सालार कुटुंबीयांनी दिला आहे.
दरम्यान, नगरसेवक आरीफ शेख यांनी सालार कुटुंबीयांनी केलेला आरोप स्पष्ट शब्दात फेटाळला आहे. या खून खटल्याशी आपला कसलाही संबंध नसताना त्यात सालार कुटुंबीयांना मदत न केल्यामुळेच आपल्या विरोधात हे कट कारस्थान रचले जात असल्याचे त्यांनी सांगितले.