Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘तुलनेत किसन वीर कारखाना दुसरा हप्ता जादा देणार’
वाई, ३० जून/वार्ताहर

 

सातारा जिल्ह्य़ात इतर सहकारी साखर कारखान्यांच्या तुलनेत दुसरा हप्ता जास्त देणार असल्याची माहिती आ. मदन भोसले यांनी किसनवीर कारखान्याच्या ३९ व्या वार्षिक सभेत सभासदांना दिली.
कारखान्याच्या परिसरात झालेल्या वार्षिक सभेला सभासदांनी मोठी गर्दी केली होती. या सभेत संचालक मंडळाने सादर केलेला अहवाल, ताळेबंद, नफातोटा पत्रक, हिशेब तपासणी अहवाल, ठेवीतून वाढीव भाग, विक्री व व्याज समान ठेवण्याला मंजुरी देण्यात आली. बॉयलर व टर्बाईन खरेदी, परफ्यूम प्लान्ट उभारणीस मंजुरी आदी विषयांचा त्यात समावेश आहे.
या वेळी केलेल्या अध्यक्षीय भाषणात आ. भोसले म्हणाले की, विक्रमी गाळप, विक्रमी साखर उताऱ्याबरोबरच सभासदांचे हित जोपासण्याचा प्रयत्न कारखाना व्यवस्थापन करीत आहे. कारखान्याच्या माध्यमातून इतर उत्पन्नाचे अनेक प्रकल्प राबवून ऊस उत्पादकाला जादा दर देण्याचा प्रयत्न केला आहे.
या वेळी खासदार व कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर म्हणाले की, कारखाना परिवारावर सभासदांचा विश्वास आहे. सभासदांच्या मनात गोंधळ निर्माण करणारे विरोधक या सभेला नाहीत, याचा अर्थ सभासदांपासून ते दूर गेले आहेत. या वेळी कारखान्याचे सर्व संचालक, अधिकारी, आ. मदन भोसलेंचे नेतृत्व मानणारे सर्व ज्येष्ठ सभासद उपस्थित होते.