Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

पालिका व रस्ते विकास महामंडळात वाद अद्यापि कायम
रस्त्यांचा ताबा कोणाकडे ?
सोलापूर, ३० जून / प्रतिनिधी

 

९२ कोटी खर्च करून राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत शहरात तयार करण्यात आलेले रस्ते किती निकृष्ट दर्जाचे आहेत, याची ओरड सुरुवातीपासून होत असताना या रस्त्यांच्या प्रत्यक्ष ताब्यावरून महापालिका व रस्ते विकास महामंडळ एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचे पुनश्च स्पष्ट झाले आहे.
एकात्मिक रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत पाच वर्षापूर्वी तयार झालेल्या पहिल्या टप्प्यातील या रस्त्यांच्या दर्जाविषयी प्रथमपासूनच आक्षेप घेण्यात येत आहेत. परंतु रस्ते तयार झाल्यानंतर त्यांचा ताबा घेण्यास महापालिका अद्यापि तयार नाही. या उलट राज्य रस्ते विकास महामंडळाने या रस्त्यांचा ताबा यापूर्वीच महापालिकेस देण्यात आल्याचे स्पष्टीकरण केले आहे. त्यामुळे हे रस्ते नेमके कोणाच्या ताब्यात आहेत, याबद्दल नागरिकांत अद्यापि संभ्रम आहे.
या पाश्र्वभूमीवर या रस्त्यांची दुरवस्था होत असताना त्याकडे लक्ष वेधण्यासाठी महाराणा प्रताप जनहित संघटनेने एका रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ात चक्क वृक्षारोपण करून अभिनव आंदोलन छेडले. व्हीआयपी समजल्या जाणाऱ्या होटगी रस्त्यावर विमा रुग्णालयाजवळ भला मोठा खड्डा पडला असताना तो बुजवून रस्त्याची डागडुजी करण्याचे कर्तव्य बजावण्याची जबाबदारी महापालिका आणि रस्ते विकास महामंडळ एकमेकांवर ढकलत आहेत. त्यामुळे महाराणा प्रताप जनहित संघटनेने या रस्त्यावरील खड्डय़ात चक्क वृक्षारोपण केले. परंतु त्यानंतरही जाग आली तर त्या संबंधित यंत्रणा कसल्या? या अभिनव आंदोलनानंतर तब्बल सहा तासांनी अखेर महापालिका व राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी धावून आले, ते सुद्धा प्रसारमाध्यमांच्या दबावामुळे. नंतर रस्त्याच्या खड्डय़ात लावण्यात आलेले रोपटे काढून टाकण्यात आले. तत्पूर्वी हा खड्डा त्वरित दुरुस्त करण्याचे आश्वासन संबंधित यंत्रणांकडून घेण्यात आले.