Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

गेल्या खरिपातील नुकसानीसाठी सांगलीला पीकविम्याचे २१ कोटी
सांगली, ३० जून/प्रतिनिधी

 

राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेंतर्गत गेल्या खरीप हंगामातील ४० हजार हेक्टरवर शेतीच्या झालेल्या नुकसानीसाठी सांगली जिल्ह्य़ातील ७५ हजार शेतकऱ्यांना २१ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच जमा करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांनी दिली.
राज्य शासनाने यावर्षीही राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना जाहीर केली आहे. चालू वर्षीच्या खरीप हंगामात या योजनेचा लाभ जिल्ह्य़ातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरवून घ्यावा, असे आवाहन करून जिल्हाधिकारी वर्धने म्हणाले की, या योजनेत खरीप ज्वारी, बाजरी, सोयाबीन, भुईमूग, उडीद व मूग या पिकांचा समावेश आहे. पीकनिहाय प्रतिहेक्टरी विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता वेगवेगळा आहे. कृषी पीक विमा योजनेंतर्गत वरील सर्व पिकांसाठी हप्ता भरण्याची अंतिम मुदत दि. ३१ जुलै आहे. अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी विमा हप्त्यात दहा टक्के सवलत आहे.
मंडलातील निश्चित केलेल्या पिकासाठीच विमा हप्ता भरावा. अधिक माहितीकरिता सांगली जिल्ह्य़ातील सर्व राष्ट्रीयीकृत व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व शाखांत शेतकऱ्यांचे प्रस्ताव भरून घेतले जातील. याबाबतच्या अधिक माहितीसाठी कृषी विभागाकडील उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व सर्व मंडल कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज ८ अ व सातबारा पीक नोंदीसह पीक पेरणीचा तलाठय़ाचा दाखला व पीक हप्ता रकमेसह नजीकच्या बँक शाखेत प्रस्ताव सर्व पूर्ततेसह सादर करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी वर्धने यांनी केले.
जिल्हाधिकारी वर्धने यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कृषी अभियान, जिल्हा सूक्ष्म सिंचन योजना, महात्मा फुले भूसंधारण अभियान, जिल्हा पाणलोट विकास कार्यक्रम, विहीर पुनर्भरण, पीक विमा, अपघात विमा योजना व आत्मा या योजनेचा आढावा घेण्यात आला. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी पोतदार, नाबार्डचे सहायक व्यवस्थापक पोकळे, डाळिंब उत्पादक संघाचे संचालक आनंदराव पाटील व द्राक्ष बागायतदार संघाचे सचिव रंगराव इरळे आदी उपस्थित होते.