Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

मूत्रमार्ग नियंत्रण गमावणाऱ्या रुग्णांना दिलासा देणारे तंत्र
कोल्हापूर, ३० जून / विशेष प्रतिनिधी

 

मानवी शरीरामध्ये लघवीवरील नियंत्रण गेल्यामुळे दैनंदिन मोठय़ा समस्यांना तोंड द्याव्या लागणाऱ्या रुग्णांसाठी एक खूशखबर आहे. या रोगामुळे त्रस्त होऊन जीवनाचा दर्जा घसरल्याच्या समस्येला त्यांना सामोरे जावे लागत असले तरी हा रोग औषधोपचाराने पूर्णत: बरा करता येऊ शकतो, असे जागतिक स्तरावर सिद्ध झाले आहे. यामुळे योग्य वेळी योग्य उपचार अशा रुग्णांच्या जीवनाला कलाटणी देऊ शकतो, असे मत प्रसिद्ध मूत्ररोगतज्ज्ञ डॉ. राजीव कोरे यांनी येथे एका पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
मूत्रमार्गावरील नियंत्रण गेल्यामुळे त्रस्त झालेल्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी अमेरिकन युरॉलॉजिकल सोसायटीने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून जागतिक स्तरावर २२ ते २८ जून हा जागतिक मूत्राशय सप्ताह म्हणून पाळला जातो. भारतात सिप्ला या विख्यात औषध उत्पादक कंपनीने यामध्ये पुढाकार घेतला असून, त्यानिमित्ताने आयोजित एका पत्रकार परिषदेत डॉ. कोरे यांनी हे मत व्यक्त केले.
लघवीवर नियंत्रण जाणे या रोगाने जगामध्ये कोटय़वधी लोकांना त्रस्त केले आहे. भारतात त्याचे प्रमाण ८ ते १० टक्के इतके आहे. अवेळी लघवी, सतत लघवीसाठी बाथरूमचा आधार घ्यावा लागणे यामुळे मनुष्याच्या आयुष्याचा दर्जा खालावतो. तसे वैद्यकीय, सामाजिक, मानसिक नातेसंबंधांवरही परिणाम होतो. हा आजार मुलांना लहान वयात, स्त्रियांना मध्यम वयात तर पुरुषांना पन्नाशीनंतर जडतो. मेंदूच्या अपरिपक्वतेमुळे लहान मुलांत हा आजार मोठय़ा प्रमाणावर दिसत असला तरी स्त्रियांना गर्भाशयाच्या पिशवीच्या कमकुवतपणामुळे तर पुरुषांना प्रश्नेस्ट्रेट ग्रंथींची वाढ झाल्यामुळे या आजाराला सामोरे जावे लागते. या आजारात काही रुग्णांच्या मूत्राशयात मोठा दाब निर्माण होऊन मूत्रिपड निकामी होण्याचा धोका असतो. यामुळे असा आजार सहन करीत बसण्यापेक्षा त्यावर योग्य वेळी उपचार केल्यास रोगापासून मुक्ती मिळू शकते असे डॉ. कोरे म्हणाले.
डॉक्टरी सल्ला, मर्यादित काळासाठी औषधांचे सेवन आणि काही ठराविक रुग्णांसाठी शस्त्रक्रिया असे यावर उपचार आहेत. हे उपचार केल्यास अतिशय नाममात्र खर्चात रुग्ण बरा होऊ शकतो, असा विश्वास डॉ. कोरे यांनी व्यक्त केला.