Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

पावसाने दडी मारल्याने शेतकरी धास्तावला
मिरज, ३० जून / वार्ताहर

 

पावसाने दडी मारल्याने खरिपाची पेरणीच आता होणार नाही. खरिप हंगाम वाया जाणार असल्याने आता रब्बीची आशा धरून असणाऱ्या शेतकऱ्यांपुढे जनावरांच्या चाऱ्याची समस्या भेडसावत आहेत. सोयाबीन, संकरित ज्वारी व बाजरी या भुसार पिकाबरोबरच कडधान्याचा पेराही आता होणे अशक्य असल्याने सालबेगमी साधायची कशी, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
रोहिणी नक्षत्राने यंदा पूर्णपणे पाठ फिरवली असली तरी मृगाच्या पावसाने निर्माण केलेली आशा आद्र्रा नक्षत्र निम्मे सरले तरी कोमेजली आहे. पावसाची पहिली अडीच नक्षत्रे म्हणजे एक महिन्याहून अधिक काळ गेला तरी पावसाने हजेरी लावली नाही. दोन दिवसांपासून हवेतील उष्णता कमी झाली असली तरी पावसाची एखादी झडही आली नाही. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.
खरिप हंगामातील पेरणी आता होणेच अशक्य आहे. मागास पेरणी झाली, तर पीक राहोच, पण जनावरांना चाराही उपलब्ध होत नाही. सोयाबीन मागास झाले, तर तांबेराला बळी पडते. ज्वारी व बाजरी मागास झाले, तर काळी पडण्याबरोबरच कणगी होण्याचा धोका असतो व तूर, मटकी व मूग या पिकांना किडीचा मोठय़ा प्रमाणात प्रश्नदुर्भाव होत असल्याने झालेला खर्चही निघू शकत नाही. त्यामुळे खरिपाची आशाच आता शेतकऱ्यांनी सोडली आहे.
गेल्या वर्षीचा कडबा संपत आला असून जनावरांना पुढे वर्षभर पुरेल एवढा चारा कसा उपलब्ध करायचा, असा प्रश्न आताच निर्माण झाला आहे. पावसाने हुलकावणी दिल्याने माळरान, गायरान व बांधाला उगवणारे गवत यंदाही नसल्याने जनावरांना दिवसभर बडमीच्या कडब्यावर गुजराण करावी लागत आहे.
मिरज तालुक्यात सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्र खरिप लागवडीखाली आहे. यापैकी अवघ्या पाच टक्के म्हणजे तीन हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली असली तरी त्यापैकी बहुतांशी क्षेत्र सोयाबीन पिकाखाली आले आहे. त्यामुळे सालबिजमीसाठी लागणारा चारा कसा उपलब्ध होणार, असा प्रश्न आहे. पावसाच्या दिरंगाईने भाजी बाजारातील दरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.
वांगी, कोबी, फ्लॉवर व दोडका या भाजीचे प्रतिकिलो दर २० रुपयांवर असून कोथिंबिरीची जुडी १५ रुपयांवर पोहोचली आहे. विहिरीच्या पाण्याने तळ गाठला असून पावसाने आणखी विलंब केला, तर रब्बीवर केंद्रित झालेली आशाही मावळणार आहे.