Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

गाळे हस्तांतरणप्रकरणी केली जयंत पाटील यांनी कानउघडणी
मिरज, ३० जून / वार्ताहर

 

वादग्रस्त गाळे हस्तांतरणप्रकरणी सांगली महापालिका पदाधिकाऱ्यांची कानउघडणी करीत हे गाळे परत मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचा आदेश विकास महाआघाडीचे नेते गृहमंत्री जयंत पाटील यांनी दिले. मतभेद मिटविण्यासाठी गुरुवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या प्रीतिभोजनावर दोघा नगरसेवकांनी बहिष्कार टाकल्याने मतभेदांचीच जोरदार चर्चा झाली.
सांगली महापालिकेची सत्ता मिळाल्यानंतर सत्ताधारी विकास महाआघाडीच्या नगरसेवकांची बैठक मिरज येथील एका संस्थेत आयोजित करण्यात आली होती. पदाधिकारी व सदस्य यांच्यात निर्माण झालेला बेबनाव व अविश्वास दूर करण्याच्या हेतूने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विकास महाआघाडीच्या एका पदाधिकाऱ्यांनीच शाळेच्या आवारात प्रीतिभोजनाची व्यवस्थाही या बैठकीनिमित्ताने केली होती.
या बैठकीत प्रत्येक नगरसेवकाशी वैयक्तिक संपर्क साधून अडीअडचणी समजून घेण्याचा प्रयत्न विकास महाआघाडीचे नेते जयंत पाटील हे करणार होते. प्रत्येक नगरसेवकाला पाच मिनिटांचा अवधीही निश्चित करण्यात आला होता. याच वेळी महापौर बदलाबाबत सदस्यांची भूमिका काय, हे लक्षात घेऊन निर्णय घेतला जाण्याची शक्यता होती.
मात्र जयंत पाटील हेच रात्री उशिरा आल्यामुळे पूर्वनियोजित मुलाखतीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला. तत्पूर्वी एका प्रभाग समितीच्या सभापतींसह एका नगरसेवकाने प्रीतिभोजनासह बहिष्कार टाकत जयंत पाटील यांची भेट न घेताच बहिर्गमन केले. सांगली शहरातील ११ व मिरज शहरातील तीन दुकान गाळे हस्तांतरणामुळे सत्ताधारी गटाला टीकेचे लक्ष केले जात आहे. याबाबत जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांची कानउघडणी करीत हे गाळे परत मिळविण्याचे प्रयत्न करावेत, असे आदेशही त्यांनी दिले. या बैठकीत दोघा नगरसेवकांच्या बहिष्कारावरही चर्चा झाली. तसेच आपापसातील मतभेद दूर करण्यासाठी पुन्हा एकदा बैठक घेतली जाईल, असे गृहमंत्री जयंत पाटील यांनी उपस्थितांना सांगितले.