Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

वसंतदादांच्या स्वप्नातील सांगली प्रतीक पाटील यांनी घडवावी- शेंडगे
सांगली, ३० जून/प्रतिनिधी

 

कै. वसंतदादा पाटील यांच्या स्वप्नातील सांगली जिल्हा घडविण्यासाठी खासदार प्रतीक पाटील यांनी आपल्या केंद्रीय राज्यमंत्रिपदाचा उपयोग करून घेऊन जिल्ह्य़ातील दुष्काळी भागातील अपूर्ण पाणी योजना मार्गी लावण्याबरोबरच सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रकाश शेंडगे यांनी मंगळवारी केले.
सांगली जिल्ह्य़ाला प्रतीक पाटील यांच्या रूपाने प्रथमच केंद्रीय राज्यमंत्रिपदाची संधी मिळाल्याबद्दल आमदार शेंडगे यांनी प्रतीक पाटील यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले, तसेच जिल्ह्य़ातील विविध विकासकामांबाबत चर्चा केली.
वसंतदादा पाटील यांच्या विचाराच्या सांगली जिल्ह्य़ाला प्रथमच केंद्रीय राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे. त्याचा जिल्ह्य़ाच्या विकासासाठी प्रतीक पाटील यांनी उपयोग करावा. राज्यातील पाच महत्त्वाची खाती जिल्ह्य़ातील आटपाडी, तासगाव, जत व कवठेमहांकाळ या दुष्काळी भागातील ताकारी, म्हैसाळ, टेंभू व आरफळ या पाणी योजना अपूर्ण आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी निधी उभारावा. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी कोणताही उद्योग-व्यवसाय उभारलेला नाही. त्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून नवनव्या योजना आखून जिल्ह्य़ातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.
कै. शिवाजीराव शेंडगे यांनी राज्यातील धनगर समाजाला काँग्रेसच्या पाठीशी उभे करण्याचे काम केले. त्या धनगर समाजालाही न्याय देण्याची भूमिकाही प्रतीक पाटील यांनी पार पाडावी, तसेच शेतकऱ्यांची फसवणूक करून चित्रपट अभिनेते व दलालांनी उभ्या केलेल्या पवनचक्क्यांमुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. त्यांनाही न्याय देण्याची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही आमदार शेंडगे यांनी व्यक्त केली