Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा
मुंबई, ३० जून / प्रतिनिधी

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोटक्षेत्रात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे दिवसेंदिवस तलावांतील पाण्याची पातळी खालावत आहे. १५ जुलैपर्यंत पाऊस झाला नाही तर राखीव साठा वापरण्याची वेळ पालिकेवर येण्यार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. जूनच्या पहिल्या आठवडय़ात पाऊस न पडल्यामुळे पालिकेने पाणीकपात सुरू केली.

वांद्रे-वरळी पुलास राजीव गांधी यांचे नाव !
पवारांच्या काँग्रेसबाबतच्या भूमिकेबद्दल आश्चर्य
मुंबई, ३० जून / खास प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्यावरून काँग्रेस व राष्ट्रवादीत बेबनाव निर्माण झाला असतानाच काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी वांद्रे-वरळी सागरी पुलाला राजीव गांधी यांचे नाव देण्याची आग्रही सूचना करून आज सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

परप्रांतीयांचे संरक्षण काँग्रेस करेल-सोनिया
जयप्रकाश पवार
मालेगाव, ३० जून

देशाच्या अन्य प्रांतातून रोजगारासाठी येणाऱ्या भाषिकांमुळे त्या त्या शहराचा वा राज्याचा विकासच होत असतो. अशा स्थितीत प्रांतवादाचा मुद्दा पुढे करून स्थलांतरीत नागरिकांना बाहेर घालविण्याची भाषा कुणी करणार असेल, तर यापुढे सहन केले जाणार नाही. काँग्रेस सरकार अशा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी उपाययोजना हाती घेईल, असा इशारा काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी राज ठाकरे यांचा नामोल्लेख न करता मालेगावच्या छोटेखानी सभेत दिला. परप्रांतीय वा त्यांच्या लोंढय़ांच्या आक्रमणाच्या मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण राज्यात रान उठवत आहेत.

वांद्रे वरळी सागरी मार्ग वाहतूक समस्या सोडविणार का ?
बंधुराज लोणे
मुंबई, ३० जून

मुंबईकरांसाठी आज खुल्या करण्यात आलेल्या वांद्रे-वरळी सागरी मार्गामुळे मुंबईतील वाहतूक समस्या सुटेल, असा दावा केला जात आहे. मात्र वाहतूक समस्येबाबत तयार करण्यात आलेल्या एका अहवालानुसार शहरात बांधण्यात येणाऱ्या नवीन पुलांमुळे वाहतूक समस्या सुटणार तर नाहीच उलट दक्षिण मुंबईत समस्या वाढण्याची शक्यता आहे. सागरी पुलामुळेही वरळी, हाजीअली आणि वांद्रे येथे प्रचंड वाहतूक कोंडी होणार आहे, असे मत वाहतूक तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

सोनियांनी फोडला प्रचाराचा नारळ
मुंबई, ३० जून / खास प्रतिनिधी

गेल्या पाच वर्षांंमध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्राला भरीव मदत केलीच, पण केवळ मुंबईला गेल्या आर्थिक वर्षांत १२ हजार कोटी रुपये दिले आहेत. मुंबईच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकार बांधील असल्याचे सांगत काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला.

भूमिपूजन ते उद्घाटन: स्वातंत्र्यवीर सावरकर ते राजीव गांधी असा ‘प्रवास’!
मुंबई, ३० जून/प्रतिनिधी

वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या भूमीपूजन समारंभाच्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्या सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याची घोषणा केली होती. त्याचा विसर राज्यातील सरकारला पडला असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना खूष करण्याकरिता मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्व. राजीव गांधी यांचे नाव देण्याची घोषणा घाईगर्दीत केल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी केली.

पाच दिवस ‘टोल फ्री’
मुंबई, ३० जून / प्रतिनिधी

मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास महामंडळाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून सध्या मुंबईत २४ हजार कोटी खर्चाची कामे सुरू आहेत. आणखी ३० हजार कोटींची कामे आगामी काळात सुरू होणार असल्याचे सांगून, मुंबईकरांसाठी वांद्रे-वरळी सागरी सेतू पाच दिवस म्हणजे ५ जुलैपर्यंत ‘टोल फ्री’ ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज केली.

देशाची वाटचाल दुष्काळाच्याच दिशेने!
मान्सूनची लहर अन् नियोजन- १
अभिजित घोरपडे
देशात संपूर्ण जून महिन्यात सरासरीच्या निम्माच पाऊस पडला असून, हवामान विभागाने जाहीर केलेल्या सुधारित अंदाजानुसार जुलै आणि ऑगस्ट महिन्यांमध्येही ही तूट भरून निघण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भारताची वाटचाल दुष्काळाच्या दिशेनेच सुरू असल्याची भीती देशभरातील हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सुरुवातीच्या या धक्क्यानंतर पावसाळय़ाच्या अखेरच्या टप्प्यात ‘एल-निनो’ सक्रिय होऊन पावसावर विपरीत परिणाम होण्याचा इशाराही काही अभ्यासकांनी दिला आहे.

बोर्डाने तपासलेल्या उत्तरपत्रिका आता पाहता येणार!
आशिष पेंडसे
पुणे, ३० जून

गोपनीयतेच्या बागुलबुव्यामध्ये अडकून पडलेल्या दहावी-बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका विद्यार्थी-पालकांना आता पाहण्यास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. निकालाबाबत वाढत्या अविश्वासाच्या पाश्र्वभूमीवर बोर्डाच्या परीक्षांच्या मूल्यांकनाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरेल. बारावीनंतर आता दहावीच्या मूल्यांकनाबाबत विद्यार्थी-पालकांकडून मोठय़ा प्रमाणावर नाराजीचा सूर उमटला आहे.

लिबेरहान आयोगाचा अहवाल सादर; भाजप- काँग्रेस नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू
नवी दिल्ली ३० जून/पीटीआय

अयोध्येतील बाबरी मशिद पाडल्याच्या प्रकरणी नेमण्यात आलेल्या लिबेरहान आयोगाने आज अखेर सतरा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आपला अहवाल सरकारला सादर केला. हा अहवाल तयार करण्यासाठी आठ कोटी रूपये खर्च झाले आहेत. या आयोगाला ४८ वेळा मुदतवाढ मिळाली होती. अहवाल सादर करण्यासाठी ३९९ वेळा सुनावणी घेण्यात आली व शंभर साक्षीदार तपासण्यात आले.

विदर्भात वीज पडून सहा महिलांचा मृत्यू
नागपूर, चंद्रपूर ३० जून / प्रतिनिधी

शेतात वीज कोसळून पाच महिला शेतमजुरांचा मृत्यू तर, तिघे गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना कळमेश्वरजवळील घोराड येथे मंगळवारी दुपारी घडली. चंद्रपूर जिल्ह्य़ात येथेही एकाचा मृत्यू झाला. घोराड गावाजवळ वामन गोतमारे यांच्या शेतात सोयाबीन तर, मधुसूदन गोतमारे यांच्या शेतात कापसाची पेरणी सुरू होती. त्यासाठी घोराड गावातील महिला शेतात गेल्या होत्या. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्याबरोबर शेतातील महिला व शेतमालक वामनच्या शेतातील झोपडीत शिरल्या. तेवढय़ात प्रचंड आवाज करीत वीज त्या झोपडीवरच कोसळली. झोपडीत असलेल्या पाच महिलांचा मृत्यू झाला. चंद्रपूर- वरोरा व भद्रावती तालुक्यात आज सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वीज कोसळल्याने सुरेखा दशरथ ताजने या महिलेचा मृत्यू झाला तर, आशिष देवतळे हा गंभीर जखमी झाला.

 


महाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

 

प्रत्येक शुक्रवारी