Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

नवीन कामांना कात्री!
महापालिकेचे करवाढ नसलेले शिलकी अंदाजपत्रक
औरंगाबाद, ३० जून/प्रतिनिधी
महानगरपालिकेचे २००९-१० या आर्थिक वर्षांचे अंदाजपत्रक प्रशासनाने आज स्थायी समितीसमोर सादर केले. एकूण १२ लाख ५ हजार रुपये शिलकीच्या ४ अब्ज ९४ कोटी ५२ लाख १५ हजार रुपयांच्या या अंदाजपत्रकातून एकही नवीन काम होणार नाही. गेल्या दोन-तीन वर्षांची थकलेली कामेच पूर्ण करण्यात येणार आहेत. देखभाल दुरुस्तीसाठी १९ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीचे अंदाजपत्रक ४ अब्ज ८३ कोटी रुपयांचे होते.

नांदेड महापौरपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी
नांदेड, ३० जून/वार्ताहर

महापौरपदी संधी मिळावी यासाठी इच्छुक नगरसेवकांनी आपापल्या परीने जोरदार मोर्चेबांधणी केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी एकानेही उमेदवारी दाखल केली नाही. महापौर बलवंतसिंग गाडीवाले व उपमहापौर सरजितसिंग गिल यांनी आपापल्या पदाचा राजीनामा दोन आठवडय़ांपूर्वी दिल्यानंतर नव्या महापौर-उपमहापौरांच्या निवडीसाठी ६ जुलैचा मुहूर्त निश्चित झाला.

पूर्ववैमनस्यातून पूर्णेत तरुणाचा खून
वडिलांच्या खुनाचा ‘बदला’!
परभणी, ३० जून/वार्ताहर
पूर्णेतील फुलेनगरमध्ये राहणाऱ्या अंकुश दामोदर खाडे (वय ३५) याचा आज सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास चाकूने सपासप वार करून खून करण्यात आला. आरोपी ज्ञानबा चाकोरे याने सात वर्षांपूर्वी वडलांच्या झालेल्या खुनाचा बदला या खुनाने घेतल्याचे सांगण्यात आले. नंतर तो स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. मृत व आरोपी आत्ये-मामेभाऊ आहेत.

पावसाने ताण दिल्याने दुधाचे उत्पादन घटले
सुहास सरदेशमुख
उस्मानाबाद, ३० जून

पावसाने ताण दिल्यामुळे मराठवाडय़ातील दूध उत्पादनात गेल्या महिनाभरामध्ये कमालीची घट झाली आहे. शासकीय दूध संकलन केंद्रांमध्ये गेल्या महिन्यापर्यंत लाख २२ हजार लिटर दूध संकलित होत होते. तो आकडा ९६ हजार लिटपर्यंत खाली आला आहे. आणखी काही दिवस पाऊस नाही पडला, तर यात घटच होण्याची भीती आहे. दरम्यान पशुखाद्याचे भावही दीडपटीने वाढले आहेत.

प्रवेशासाठी शाळेत देणगी मागितल्यावरून गोंधळ
औरंगाबाद, ३० जून/प्रतिनिधी

‘कोणत्याही शाळेकडून देणगीची मागणी झाली तर लगेच पोलिसात तक्रार द्या,’ असे आवाहन शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले होते. त्यानुसार येथील एका शाळेतील पालक पोलिसांकडे धावले. पोलिसांनी तडजोड केल्याने गुन्ह्य़ाची नोंद मात्र झाली नाही. उल्कानगरी भागातील जयभवानी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत आज दुपारी हा प्रकार घडला. संतप्त पालकांची मुख्याध्यापक-शिक्षकांशी जोरदार खडाजंगी झाली.

शेतकरीमित्र!
शेतकऱ्यांनी वर्गणी जमवून अधिकाऱ्याला पाठविले इस्राईलला!
प्रताप खेडकर
गेवराई, ३० जून

तालुक्यातील शेतकऱ्यांनी वर्गणी जमा केली. कशासाठी? तर सरकारी अधिकाऱ्याला परदेशी पाठविण्यासाठी! ‘शेतकऱ्यांचा खरा कैवारी’ अशी ओळख असलेला हा अधिकारी म्हणजे मंडल कृषी अधिकारी रामेश्वर रामप्रताप चांडक! त्यांनी गेल्या २६ वर्षांच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन सेवा केली आणि विश्वास निर्माण केला. त्याचे फळ म्हणजे इस्राईल दौरा.

प्रसिद्ध वुल्फ आणि कटलर यांची औरंगाबादमध्ये प्रात्यक्षिके
आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धा
औरंगाबाद, ३० जून/खास प्रतिनिधी
भारतीय शरीरसौष्ठव संघटनेतर्फे महाराष्ट्रात प्रथमच आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. ही स्पर्धा औरंगाबादमधील सिडको, एन-५च्या भव्य नाटय़गृहात २४ ते २७ जुलैदरम्यान रंगणार आहे. जगातील पहिल्या पाच व्यावसायिक शरीरसौष्ठवपटूंमध्ये समावेश असलेले डेनिस वुल्फ आणि मि. ऑलिम्पिया हा किताब पटकाविणारे जे. कटलर यांची प्रात्यक्षिके बघावयास मिळणार आहेत.

प्रेमविवाहाचे खडतर सहा महिने..
संशय, दररोज मारहाण नि आता मरणासन्न अवस्था
औरंगाबाद, ३० जून/प्रतिनिधी
सहावीनंतर शाळा सोडून आईसोबत मोलमजुरी करणारी ती, तर काहीच कामधंदा न करता इकडे तिकडे हुंदडणारा तो. सरकारी रुग्णालयात परिसरात सुरू असलेल्या कामावर आईसोबत ती मजुरी करत होती. दिवसभर कोठेही फिरायचे आणि रुग्णांना वाटप होत असलेल्या खिचडीवर ताव मारण्यासाठी तो तेथे यायचा.

सोयगावमधील ३२ ठिकाणचे पाण्याचे नमुने दूषित
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
सोयगाव, ३० जून/वार्ताहर

तालुक्यातील ४६ गावांत घेतलेल्या पाण्याच्या ९२ नमुन्यांपैकी ३२ नमुने दूषित आढळून आले. तालुक्यातील दूषित पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. महागडी जलशुद्धीकरण प्रक्रिया ग्रामपंचायतीला न परवडणारी ठरू लागल्याने या पावसाळ्यात गावक ऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बहुतांश आजाराचे मूळ हे दूषित पाण्यात असल्याने पिण्याचे पाणी शुद्ध, र्निजतुक असणे आवश्यक ठरले आहे. यासाठी ‘ब्लिचिंग पावडर’ पाण्यात टाकून पाणी शुद्ध करण्याची जुनी पद्धतच अनेक ग्रामपंचायतींकडून अवलंबली जात आहे. जीवन प्राधिकरणमार्फत सोयगावला एकमेव जलशुद्धीकरण यंत्रणा आहे. अशी शुद्धीकरण यंत्रणा चालवणे अन्य ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्टय़ा परवडत नाही. यामुळे या भागात शुद्ध पाणी मिळणे अवघड झाले आहे. तालक्यातील जरंडी, सावळतबारा, बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या हद्दीतील ४६ गावांत घेतलेल्या ९२ नमुन्यांपैकी ३२ पाणी नमुने दूषित निघाले आहेत. अनेक ठिकाणी विहीर, हातपंपांमधील पाणीही पिण्यासाठी अयोग्य असल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे.

लाच घेतल्याबद्दल तलाठय़ास कारावास
हिंगोली, ३० जून/वार्ताहर

लाच घेतल्याबद्दल तलाठी उत्तम जमला पवार याला दोन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा आज देण्यात आली. अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एस. वासेकर यांनी हा निकाल दिला.खटल्याची माहिती देताना सरकारी वकील ज्ञानदेव टेकनूर यांनी सांगितले की, हिंगोली तालुक्यातील सवड येथील शेख खाजा शेख काळू यांनी वडिलांचे निधन झाल्याने वारसा फेरफार करण्यासाठी सवडचा तलाठी उत्तम पवार याच्याकडे सात-बारा फेरफार नक्कल मागितली. त्याने त्यासाठी ३०० रुपयांची मागणी केली. शेख खाजा यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात २ ऑगस्ट २००६ रोजी तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक भगत यांनी हिंगोली तहसील कार्यालयाजवळ ३ ऑगस्ट २००६ रोजी सापळा रचला. तीनशे रुपयांची लाच घेतल्याचा इशारा फिर्यादीने करताच श्री. भगत यांनी पवारला पकडले. न्यायालयाने एकूण सहा साक्षीदार तपासल्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने शिक्षा देण्यात आली. दंड न भरल्यास पवारने सहा महिन्यांची साधी कैद भोगायची आहे.

चंपावती बँकेतील ठेवीदारांचे उपोषण
बीड, ३० जून/वार्ताहर

चंपावती बँकेतील घोटाळ्यातील दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करावा व बँकेतील ठेवीदारांच्या १९ कोटी रुपयांच्या ठेवी परत देण्यात याव्यात या मागण्यांसाठी ठेवीदारांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. बँकेने ठेवीदारांच्या १९ कोटी रुपयांच्या ठेवी परत कराव्यात, घोटाळ्यातील दोषींविरुद्ध कठोर कारवाई करावी, बँकेचे दुसऱ्या बँकेत विलिनीकरण व्हावे आदी मागण्यांचा समावेश आहे. नवनाथ नाईकवाडे, बलभीम बजगुडे, जालिंद मस्के आदी उपोषणास बसले होते.

जोरदार पावसाआधीच रस्त्यांवर खड्डे!
औरंगाबाद, ३० जून/प्रतिनिधी

शहरात अद्यापि जोरदार पावसाला सुरूवात व्हायची आहे. दोन दिवसांमध्ये झालेल्या तुरळक पावसामुळे शहरातील रस्त्यांचे रुपांतर खड्डय़ांमध्ये झाले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच डागडुजी करण्यात आलेल्या रस्त्यांचीच अशी अवस्था झाली आहे. मोठा पाऊस होण्याआधीच रस्त्यांची अशी अवस्था झाल्याने मुसळधार पाऊस झाल्यावर रस्ते जागेवर राहतील का, असा प्रश्न आताच समोर आला आहे.पावसाळ्यापूर्वी नेहमीप्रमाणे रस्त्यांची डागडुजी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी काही कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पावसाळ्यात रस्त्यांचे डांबरीकरण करणे शक्य होत नसल्यामुळे काही रस्त्यांवर गरज नसतानाही पावसाळ्यापूर्वी डांबर अंथरण्यात आले. मात्र पावसाचे पाणी या रस्त्यांवर पडताच डांबर खडीपासून वेगळे झाले आणि त्याबरोबर खड्डे पडले. दोनच दिवसाच्या पावसाने रस्त्यांची ही अवस्था आहे. शिवाय महानगरपालिकेच्या विद्यमान वर्षांच्या अंदाजपत्रकात डागडुजीसाठी फारशी तरतूद नसल्यामुळे वर्षभर खड्डेमय रस्त्यातून वाट काढण्याची सवय लावून घेण्याची वेळ औरंगाबादकरांवर आली आहे.

आता रक्ताचीही चोरी!
चोरीचे रक्त वापरले कोणाला?
औरंगाबाद, ३० जून /प्रतिनिधी

रक्ताचीही चोरी होते, हे आज उघडकीस आले. प्रसिद्ध मराठवाडा रक्तपेढीतून तेथेच कामास असलेल्या तंत्रज्ञाने एप्रिलपासून आतापर्यंत वेगवेगळ्या रक्तगटाच्या २० बाटल्या आणि ‘प्लाझ्मा’ चोरल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी नीलेश सुरेश धारीवाल (वय ३०, भडकलगेट) यास अटक केली.चोरीस गेलेले रक्त आणि प्लाझ्माची बाजारातील किंमत किती आहे, त्याहीपेक्षा त्या कोणाला वापरण्यात आल्या, वापरण्यापूर्वी रक्तगट तपासण्यात आला होता का, हे प्रश्न महत्त्वाचे असल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक खुशालचंद बाहेती यांनी सांगितले.नीलेश गेल्या अनेक महिन्यांपासून मराठवाडा रक्तपेढीत कामाला आहे. संचालकांचा विश्वास बसल्याने अनेक व्यवहार तो एकटा सांभाळत असे. नोंदणीनुसार काही मालिकेतील रक्ताच्या बाटल्या गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यांचा शोध घेण्यात आला. त्यातून काही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे त्यांनी तक्रार देण्याचा निर्णय घेतला.संस्थेची बदनामी होऊ नये म्हणून त्यांची तक्रार करण्याची इच्छा नव्हती. तक्रारीशिवाय पोलिसांनी रक्तचोराचा शोध लावावा, अशी त्यांची विनंती होती. संस्थेतीलच कोणीतरी रक्त चोरले असल्याचे स्पष्ट होते. दुपारी गुन्हे शाखेत जाऊन तक्रार देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून अवघ्या काही तासातच आरोपीला गजाआड केले. जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे.

भारतीय दलित पँथरची निदर्शने
औरंगाबाद, ३० जून/खास प्रतिनिधी

शहरातील विविध वस्त्या व झोपडपट्टय़ांमध्ये राहणारे नागरिक शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत. या नागरिकांची नावे दारिद्रयरेषेखालील यादीत समाविष्ट करून घेण्यासाठी भारतीय दलित पँथरच्या वतीने औरंगाबाद महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. औरंगाबाद महानगरपालिकेने १९८४ मध्ये १४ वसाहती झोपडपट्टय़ा म्हणून घोषित केल्या आहेत. या वसाहतीमधील काही ठराविक नागरिकांची नावेच दारिद्रयरेषेखालील यादीत आहेत. गरजू नागरिकांची नावे या यादीत नाहीत. त्यांची नावे यादीत समाविष्ट करण्यात यावीत, या मागणीसाठी अध्यक्ष लक्ष्मण भुतकर, सचिव विश्वनाथ दांडगे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. या निदर्शनात अशोक मगरे, सतीश राऊत, रतन जाधव यांचा सहभाग होता.

पत्रकार कादरी, गंभीरे व मुंदडा यांना पुरस्कार
कळंब, ३० जून/वार्ताहर

तालुका मराठी पत्रकार संघातर्फे देण्यात येणारा (कै.) शिवशंकर अप्पा धोंगडे जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार ‘सकाळ’चे उस्मानाबाद आवृत्तीचे उपसंपादक आयुब कादरी यांना जाहीर झाला. (कै.) रा. ई. काकडे तालुकास्तरीय पत्रकार पुरस्कार ‘सकाळ’चे दिलीप गंभीरे आणि (कै.) गणेश घोगरे तालुकास्तरीय पत्रकारिता पुरस्कार ‘सामना’चे शिराढोणचे वार्ताहर राजेश मुंदडा यांना जाहीर करण्यात आला. पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सतीश टोणगे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. ग्रामीण भागातील पत्रकारांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने तालुका मराठी पत्रकार संघातर्फे गेल्या १० वर्षांपासून वेगवेगळे पुरस्कार दिले जातात. पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती श्री. टोणगे व संघाचे सल्लागार मित्रजित रणदिवे यांनी दिली.

‘पंचायत राज्य समिती लातूरमध्ये विकासकामांची तपासणी करणार’
जळकोट, ३० जून/वार्ताहर
जळकोटसह लातूर जिल्ह्य़ातील सर्वच तालुक्यांत झालेल्या विकासकामांची त्याचप्रमाणे शासनातर्फे राबविण्यात आलेल्या विविध योजनांची विधिमंडळ पंचायत राज्य समितीमार्फत पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती पंचायत राज समितीचे सदस्य टी. पी. कांबळे यांनी नुकतीच दिली. दलित वस्ती सुधार योजना, तांडा वस्ती सुधार योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, भारत निर्माण योजना, जलस्वराज्य प्रकल्प यांसह केंद्र व राज्य शासन यांच्यामार्फत विविध योजनांतर्गत कोटय़वधी रुपयांचा निधी देण्यात येतो. या निधीचा विनियोग कोणत्या प्रकारे करण्यात आला, त्यात अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला आहे का, याची कसून तपासणी करण्यात येणार आहे. यात काही गैरप्रकार आढळला तर संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले. .ही समिती गुरुवारी (दि. २ ) जळकोट येथे येणार असल्याचे समजते.

सोयगावमध्ये पिंपळाचे जुने झाड कोसळले
सोयगाव, ३० जून/वार्ताहर

पिंपळाचे जुने झाड आज कोसळले. संकटाची जाणीव झाल्याने आजुबाजुच्या गावकऱ्यांनी पळ काढल्याने दुर्घटना टळली. नारळी बागेत दत्त मंदिराजवळ पिंपळाचे मोठे झाड होते. आज पाऊस नव्हता, हवाही नव्हती तरी दुपारी हे पिंपळाचे झाड मुळासकट उखडू लागले. हे झाड एका घराच्या भिंतीवर अलगद कोसळले. हे पाहताच गावकऱ्यांनी पळापळ करून आजूबाजुच्या लोकांना संकटाची जाणीव दिली. त्यामुळे लोक सावध झाले. हे झाड कोसळल्यानंतर पाऊस व वादळाला सुरुवात झाली.

‘बँकेच्या अधोगतीस जबाबदार असणाऱ्यांची संपत्ती जप्त करा’
उस्मानाबाद, ३० जून/वार्ताहर

जिल्हा बँकेच्या अधोगतीस जबाबदार असणाऱ्यांची संपत्ती जप्त करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. जिल्ह्य़ातील सहकारी संस्था, पतसंस्था, खरेदी-विक्री संघ, मजूर सहकारी संस्था व वैयक्तिक कर्ज घेऊन ३ अब्ज ५० कोटी रुपये थकविण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा बँक डबघाईस आली आहे. लोकप्रतिनिधी व कर्जदार अधिकारी व कर्मचारी यांची संपत्ती जप्त करून त्याचा लिलाव करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हा बँकेचा व्यवहार सुरळीत करण्याच्या अनुषंगाने तातडीने पावले उचलावीत अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देणारे निवेदन मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी द. रा. बनसोड यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष बंटी मंजुळे, जिल्हा चिटणीस दिनेश देशमुख, शहराध्यक्ष स्वप्नील जगताप आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्य़ा आहेत.