Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

वांद्रे-वरळी पुलास राजीव गांधी यांचे नाव !
पवारांच्या काँग्रेसबाबतच्या भूमिकेबद्दल आश्चर्य
मुंबई, ३० जून / खास प्रतिनिधी

 

आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्यावरून काँग्रेस व राष्ट्रवादीत बेबनाव निर्माण झाला असतानाच काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी वांद्रे-वरळी सागरी पुलाला राजीव गांधी यांचे नाव देण्याची आग्रही सूचना करून आज सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पवारांच्या काँग्रेसबद्दलच्या एकूणच सौम्य भूमिकेवरून विधानसभा निवडणुकीत आघाडी होणार हे तर निश्चितच मानले जात असून, भविष्यात राष्ट्रवादीचा उलट प्रवास सुरू होण्याची ही नांदी नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.
गेल्या पाच वर्षांंमध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला भरीव मदत दिली असून, आणखी निधी देण्याचे सुतोवाच करून काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. या पुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीने निवडणुकीच्या प्रचाराच्या दृष्टीनेच उपयोग करून घेतला. शरद पवारांच्या सूचनेचा तातडीने स्वीकार करीत या सागरी पुलाला राजीव गांधी यांचे नाव देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लगोलग जाहीर केले.
काँग्रेस व राष्ट्रवादीचे संबंध काहीसे ताणले गेल्याच्या पाश्र्वभूमीवर सोनिया गांधी व शरद पवार हे एकत्र येत असल्याने त्याला राजकीय वर्तुळात महत्त्व होते. पवारांनी देशाच्या माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार, विज्ञान या क्षेत्रांतील प्रगतीचे सारे श्रेय राजीव गांधी यांना देत या देशाची भरारी ही राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीचे फळ असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत करणाऱ्या पवारांनी राजीव गांधी यांच्या कार्याची प्रशंसा मुक्तकंठाने आणि सोनिया यांना कळण्यासाठी हिंदूीत केली. सोनियांच्या उपस्थितीत राजीव गांधी यांचे गुणगान गाण्याची पवारांची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वी २००४ च्या निवडणुकीच्या वेळी सोलापूरमध्ये झालेल्या दोन्ही नेत्यांच्या संयुक्त सभेत पवारांनी राजीव गांधी यांच्यावर अशीच स्तुतीसुमने उधळली होती. रस्ते उपक्रम हे खाते आपल्या पक्षाच्या डॉ. विमल मुंदडा यांच्याकडे असल्याने या पुलाला राजीव गांधी यांचे नाव देण्याचा आदेश नव्हे, पण सूचना करीत असल्याचे पवारांनी सांगताच उपस्थित काँग्रेसजनांच्या भुवया उंचावल्या. पवारांनंतर मुख्यमंत्री चव्हाण हे भाषण करण्यास उभे राहिले, पण पवार पुन्हा माईकपाशी आले व त्यांनी मुख्यमंत्र्यांना थांबवत माईकचा ताबा घेतला. ते म्हणाले की, काही लोक राजीव गांधी यांचे नाव दिल्याने भूमिपुत्राचा मुद्दा उपस्थित करतील, पण राजीव गांधी यांचा जन्म मुंबईत झाला होता आणि ते मुंबईचे एक सर्वोत्तम भूमिपुत्र होते, असे पवार म्हणाले. पवारांचा आजचा नूर आणि सूर पाहून उपस्थित काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली.