Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

परप्रांतीयांचे संरक्षण काँग्रेस करेल-सोनिया
जयप्रकाश पवार
मालेगाव, ३० जून

 

देशाच्या अन्य प्रांतातून रोजगारासाठी येणाऱ्या भाषिकांमुळे त्या त्या शहराचा वा राज्याचा विकासच होत असतो. अशा स्थितीत प्रांतवादाचा मुद्दा पुढे करून स्थलांतरीत नागरिकांना बाहेर घालविण्याची भाषा कुणी करणार असेल, तर यापुढे सहन केले जाणार नाही. काँग्रेस सरकार अशा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी उपाययोजना हाती घेईल, असा इशारा काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी राज ठाकरे यांचा नामोल्लेख न करता मालेगावच्या छोटेखानी सभेत दिला. परप्रांतीय वा त्यांच्या लोंढय़ांच्या आक्रमणाच्या मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण राज्यात रान उठवत आहेत. या पाश्र्वभूमीवर, लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर प्रथमच संवेदनशील मालेगावच्या दौऱ्यावर आलेल्या सोनियांनी परप्रांतीयांच्या मुद्याला हात घालत आगामी काळात त्यांच्या सुरक्षिततेची हमी या निमित्ताने घेतली. येथे उभारण्यात आलेल्या नव्या सुसज्ज रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी झालेल्या छोटेखानी भाषणात सोनियांनी अनेक मुद्यांना स्पर्श केला असला तरी त्यांचा संपूर्ण भर अन् रोख हा परप्रांतीयांच्या मुद्यावरच होता. देशाच्या अन्य राज्यातून रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांमुळे स्थानिक परिसराचा विकासच होतो. त्यांना रोजगाराच्या निमित्ताने दोन पैसे मिळत असले तरी त्यांच्या श्रमाच्या योगदानामुळे परिसर उर्जितावस्थेत येण्यास मदत होते, ही बाब नाकारून चालणार नाही. या लोकांचा तिरस्कार करून प्रश्न सुटण्याऐवजी तो जटील होत जाईल. ही बाब लक्षात घेवूनच आगामी काळात देशात वा महाराष्ट्रात ज्या ठिकाणी अशा प्रकारचे विविध भाषा व प्रांतांचे लोक एकवटले असतील त्यांच्या सुरक्षेची हमी काँग्रेस सरकार घेईल, असा इरादा देखील सोनियांनी भाषणात व्यक्त केला.