Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा
मुंबई, ३० जून / प्रतिनिधी

 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोटक्षेत्रात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे दिवसेंदिवस तलावांतील पाण्याची पातळी खालावत आहे. १५ जुलैपर्यंत पाऊस झाला नाही तर राखीव साठा वापरण्याची वेळ पालिकेवर येण्यार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. जूनच्या पहिल्या आठवडय़ात पाऊस न पडल्यामुळे पालिकेने पाणीकपात सुरू केली. सुरूवातीला १० टक्के असणारी कपात आता २० टक्के करण्यात आली आहे. तसेच पाणीपुरवठय़ाच्या वेळेतही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक विभागांत कमी दाबाने पाणी मिळत आहे तर वितरण व्यवस्थेच्या टोकाला असणाऱ्या मुंबईकरांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. सध्या मुंबईकरांना प्रतिदिन २२२० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कपातीच्या आधी तो ३४०० दशलक्ष लिटर प्रतिदिन असा होता. जून महिना उलटला तरी तलावांच्या पाणलोटक्षेत्रात पाऊस पडलेला नाही. सध्या मोडक सागरमध्ये १४९.६६ मीटर, तानसा ११९.२४ मीटर, तुलसी ७३.२१ मीटर, अप्पर वैतरणा ५९२.६० मीटर तर भातसामध्ये १०९.९५ मीटर पाण्याचा साठा आहे. मुंबईकरांना आणखी महिनाभर पुरेल इतका पाण्याचा साठा असला तरी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात पाऊस न झाल्यास गंभीर समस्या उद्भवू शकते, असे पालिकेतील सूत्रांनी सांगितले.

--------------------------------------------------------------------------
मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, हॉटेल चालकांनी ग्राहकांना कमी पाणी द्यावे, पाणी उकळून प्यावे, नळ उघडा ठेवू नये, बादली भरून वाहणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. दरम्यान, एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याबाबत पालिकेने काहीही निर्णय घेतलेला नाही, असे आज अतिरिक्त आयुक्त अनील डिग्गीकर यांनी स्पष्ट केले. उद्या स्थायी समितीत पाणीसाठय़ाबाबत अहवाल सादर करण्यात येणार असून स्थायी समितीत चर्चा होणार आहे. तसेच पाणीसाठय़ाबाबत आढावा घेतल्यानंतरच पुढील निर्णय होईल, मात्र तोपर्यंत पाणीकपात सुरूच राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.