Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

देशाची वाटचाल दुष्काळाच्याच दिशेने!
मान्सूनची लहर अन् नियोजन- १


अतिशय लहरी असलेला मान्सून, त्याच्या पावसातील चढ-उतार, त्याबद्दलचे अंदाज किती बरोबर येतात, त्यातील यशापयशाची कारणे, आपल्या नियोजनातील अपयश याबाबतची मालिका..

अभिजित घोरपडे

 

देशात संपूर्ण जून महिन्यात सरासरीच्या निम्माच पाऊस पडला असून, हवामान विभागाने जाहीर केलेल्या सुधारित अंदाजानुसार जुलै आणि ऑगस्ट महिन्यांमध्येही ही तूट भरून निघण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भारताची वाटचाल दुष्काळाच्या दिशेनेच सुरू असल्याची भीती देशभरातील हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सुरुवातीच्या या धक्क्यानंतर पावसाळय़ाच्या अखेरच्या टप्प्यात ‘एल-निनो’ सक्रिय होऊन पावसावर विपरीत परिणाम होण्याचा इशाराही काही अभ्यासकांनी दिला आहे.
देशात मान्सूनचे आगमन केवळ वेळेच्या आधी झाले. त्यानंतर मात्र पुढे सरकण्यास त्याला मोठा विलंब झाला. याशिवाय पुढे पोहोचूनही पावसाने विशेष हजेरी लावलीच नाही. देशभरात जून महिन्यात सामान्यत: १४४ मिलिमीटर पावसाची नोंद होते. त्या तुलनेत या वेळी निम्माच (७७ मिलिमीटर) पाऊस पडला आहे.
हवामान विभागाने गेल्याच आठवडय़ात सुधारित अंदाज दिला. त्यानुसार देशात जुलै महिन्यात सरासरीच्या तुलनेत ९३ टक्के, तर ऑगस्टमध्ये १०१ टक्के पाऊस पडेल. हा अंदाज बरोबर ठरला तरी जूनमधील पावसाची कमी भरून निघण्याची शक्यता नाही. ख्यातनाम हवामानतज्ज्ञ आणि बंगलोरच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेसमधील ‘सेंटर फॉर अ‍ॅटमॉस्फेरिक अ‍ॅन्ड ओशियानिक सायन्सेस’च्या डॉ. सुलोचना गाडगीळ यांनीही हीच भीती व्यक्त केली. ‘हंगामाच्या अखेरीस पाऊस सरासरीपेक्षा किमान ९० मिलिमीटरने कमी असला (म्हणजेच दुष्काळाची स्थिती) तरी आश्चर्य वाटणार नाही. सध्याच्या परिस्थितीत भर म्हणजे प्रशांत महासागरात एल-निनो हा घटक सक्रिय होत आहे. त्याचाही पावसावर विपरीत परिणाम होण्याचा धोका आहेच. त्याचा परिणाम सप्टेंबरमधील पावसावर पाहायला मिळू शकेल. त्यामुळे आशावाद म्हणून चांगले चिंतायचे म्हटले, तरी या वर्षी पावसाची स्थिती काही चांगली नाही,’ असे डॉ. गाडगीळ म्हणाल्या. पुण्यातील भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्थेच्या शास्त्रज्ञांनीही नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले की, पावसाची जून महिन्यातील कामगिरी व जुलैच्या सुरुवातीला उघडीप कायम राहणार असल्याचा अंदाज पाहता, भारत सध्या दुष्काळाच्या वाटेवरच आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक अजित त्यागी यांनी नवी दिल्लीहून ‘लोकसत्ता’शी बोलताना पावसाची स्थिती सुधारण्याबाबत आशावाद व्यक्त केला, पण पावसाची आताची तूट पाहता दुष्काळाची शक्यता फेटाळून लावता येत नाही, असे सांगितले. गेल्या शंभर वर्षांमधील पावसाच्या प्रमाणातील चढ-उतार पाहता, पावसाचे आगमन लांबले किंवा तो कमी पडला तरी त्याबाबत आश्चर्य वाटून घ्यायचे कारण नाही, असे त्यागी म्हणाले.