Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

बोर्डाने तपासलेल्या उत्तरपत्रिका आता पाहता येणार!
आशिष पेंडसे
पुणे, ३० जून

 

गोपनीयतेच्या बागुलबुव्यामध्ये अडकून पडलेल्या दहावी-बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका विद्यार्थी-पालकांना आता पाहण्यास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. निकालाबाबत वाढत्या अविश्वासाच्या पाश्र्वभूमीवर बोर्डाच्या परीक्षांच्या मूल्यांकनाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरेल.
बारावीनंतर आता दहावीच्या मूल्यांकनाबाबत विद्यार्थी-पालकांकडून मोठय़ा प्रमाणावर नाराजीचा सूर उमटला आहे. वर्षभर चांगले गुण मिळाल्यानंतर बोर्डाच्या परीक्षांमध्ये अचानक शून्य गुणांपासून फक्त १५-२० गुणच देण्यात आल्याने विद्यार्थी-पालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. परिणामी बारावीसाठी मोठय़ा संख्येने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यात आले, तर कोल्हापूरमध्ये काही दिवसांपूर्वी आंदोलनदेखील करण्यात आले. बोर्डाच्या परीक्षांच्या निकालाबाबतच्या या वाढत्या अविश्वासाच्या पाश्र्वभूमीवर उत्तरपत्रिका पाहाण्यासाठी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. ‘आगामी परीक्षेपासून (पुरवणी किंवा ऑक्टोबर) या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असून, मूल्यांकनाचा दर्जा व पर्यायाने बोर्डाच्या परीक्षांवरील समाजाचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल,’ असा विश्वास राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजयशीला सरदेसाई यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला.
प्रस्तावित योजनेनुसार मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीमध्ये विद्यार्थी व पालकांना उत्तरपत्रिका पाहाण्याची संधी देण्यात येईल. उत्तरपत्रिका योग्य रीतीने तपासली गेली आहे की नाही, याचे शंकानिरसन करून घेण्याची संधी त्याद्वारे मिळेल. त्याचप्रमाणे उत्तरपत्रिका न्याहाळल्यानंतर फेरमूल्यांकनासाठी अर्ज करायचा की नाही, याचा निर्णय विद्यार्थी-पालकांना घेता येईल. या योजनेसाठी स्वतंत्र कक्ष स्थापण्यात येणार असून, गैरप्रकार टाळण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
‘उत्तरपत्रिका उपलब्ध करून दिल्याने परीक्षकांवर अविश्वास दाखविला जात असल्याची भावना योग्य नाही. किंबहुना परीक्षा पद्धत अधिक पारदर्शक होण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल. त्याचप्रमाणे परीक्षकांच्या कामालाही विश्वासार्हता व समाजमान्यता मिळेल. निकालानंतर उत्तरपत्रिका पाहाण्याची मुभा देणारी योजना गुजरात मंडळात राबवली जात आहे. महाराष्ट्र राज्य मंडळाच्या मुंबई व नाशिक विभागीय मंडळाच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखालील समिती गुजरातच्या दौऱ्यावर जात आहे. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये ही योजना कशा पद्धतीने राबवायची, त्यासाठी किती शुल्क आकारायचे, एकटा विद्यार्थी वा पालकाला उत्तरपत्रिका उपलब्ध करून द्यायची की दोघांनीही उपस्थित राहाणे बंधनकारक करायचे, पालकांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांसमवेत अन्य कुणाला येण्याची परवानगी द्यायची की नाही, अशा कार्यवाहीसंदर्भातील धोरणात्मक निर्णय घेतले जातील. कोणत्याही परिस्थितीमध्ये आगामी परीक्षेनंतर (पुरवणी वा ऑक्टोबर) उत्तरपत्रिका पाहाण्याची मुभा विद्यार्थी-पालकांना देण्यात येईल,’ अशी माहिती डॉ. सरदेसाई यांनी दिली.