Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

वांद्रे वरळी सागरी मार्ग वाहतूक समस्या सोडविणार का ?
बंधुराज लोणे
मुंबई, ३० जून

 

मुंबईकरांसाठी आज खुल्या करण्यात आलेल्या वांद्रे-वरळी सागरी मार्गामुळे मुंबईतील वाहतूक समस्या सुटेल, असा दावा केला जात आहे. मात्र वाहतूक समस्येबाबत तयार करण्यात आलेल्या एका अहवालानुसार शहरात बांधण्यात येणाऱ्या नवीन पुलांमुळे वाहतूक समस्या सुटणार तर नाहीच उलट दक्षिण मुंबईत समस्या वाढण्याची शक्यता आहे. सागरी पुलामुळेही वरळी, हाजीअली आणि वांद्रे येथे प्रचंड वाहतूक कोंडी होणार आहे, असे मत वाहतूक तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
मुंबईतील वाहतूक समस्येबाबत साधारण १९९० च्या दशकात गांभीर्याने विचार करण्यात येत होता. याच काळात राज्य सरकारने के. जी. परांजपे यांची एक समिती स्थापन केली होती. सार्वजनिक वाहतुकीवर भर देण्यात यावा, सागरातील नव्या जमीन भरावास परवानगी देऊ नये आणि एमएमआरडीएने शहराच्या भावी काळातील गरजा लक्षात घेऊन एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करावा, असे परांजपे समितीने सुचविले होते. त्यानुसार एमएमआरडीएने लंडन येथील डब्ल्यू. एस. अ‍ॅटकिन्स इंटरनॅशनल या संस्थेच्या मदतीने वाहतूक आराखडा तयार केला. वांद्रे वरळी सागरी पुलाचे काम सुरू होण्याआधीच म्हणजे १९९४ मध्येच सरकारला सादर करण्यात आला. या अहवालानुसार शहरात नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलामुंळे वाहतूक कोंडी कमी होणार नाही तर मध्य मुंबईतील ताडदेव, अॉपेरा हाऊस, नाना चौक, काळबादेवी या परिसरात वाहतूक समस्या अधिक जटिल होईल.
टाटा कन्सल्टन्सीच्या याच काळातील एका पाहणीनुसार मुंबईत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाच बळकट करणे गरजेचे आहे. शहर सार्वजनिक वाहतुकीचा ५१ टक्के वाटा आहे तर खासगी वाहतुकीचा फक्त १७ टक्के वाटा आहे. साधारण ३२ टक्के जनता टॅक्सी, रिक्षाचा वापर करीत असते. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक अधिक वाढविणे महत्वाचे आहे, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
वाहतूक तज्ज्ञ सुधीर बदामी यांच्या मतेही सागरी पुलामुळे वाहतुकीची समस्या सुटणार नाही तर हाजीअली, वरळी आणि वांद्रे येथे वाहतूक कोंडी होईल. माहीम कॉजवेवरून दररोज साधारण एक लाख ४० हजार वाहने शहरात येतात. आता यापैकी काही वाहने सागरी पुलावरून जातील. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे या पुलावरून दररोज एक लाख २५ हजार वाहने जातील. पण हा आकडा कमी असेल, असे बदामी यांना वाटते. हे अंतर सात मिनिटांत कापले जाईल, मात्र नंतर होणाऱ्या कोंडीतून कसा मार्ग काढणार असा सवाल बदामी यांनी केला आहे. थोडक्यात या पुलाचा साधारण १५ टक्के मुंबईकरांना फायदा होईल, कारण त्यांच्याकडे स्वत:चे वाहन आहे. मात्र या पुलामुळे मुंबईची वाहतूक समस्या कमी होण्याची शक्यता नाही, असा दावा बदामी करतात. शिवाय खासगी वाहनांमुळे शहरात प्रदूषण वाढत आहे. सार्वजनिक वाहनांपेक्षा खासगी वाहनांमुळे चौपट प्रदूषण होत आहे, असेही बदामी यांनी सांगितले. सागरी पूल बांधण्यात येत होता त्यावेळी समुद्रात टाकण्यात आलेल्या भरावाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या समितीचे प्रमुख गिरीश राऊत यांनीही या पुलामुळे समस्या सुटणार नसल्याचे म्हटले आहे. या पुलासाठी समुद्रात टाकण्यात आलेल्या भरावामुळे समुद्राचे संतुलन बिघडले आहे, असा दावाही राऊत यांनी केला.