Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

सोनियांनी फोडला प्रचाराचा नारळ
मुंबई, ३० जून / खास प्रतिनिधी

 

गेल्या पाच वर्षांंमध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्राला भरीव मदत केलीच, पण केवळ मुंबईला गेल्या आर्थिक वर्षांत १२ हजार कोटी रुपये दिले आहेत. मुंबईच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकार बांधील असल्याचे सांगत काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला.
वांद्रे-वरळी सागरी मार्गाच्या उद्घाटन समारंभात प्रचाराचा नारळ फोडण्यापूर्वी प्रत्यक्ष पुलावर जाऊन सोनिया गांधी यांनी समुद्राला नारळ अर्पण केला होता. निसर्ग शांत राहावा या उद्देशाने नारळ अर्पण करण्यात आल्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी गेली दशकभर राज्यात सत्तेत असताना मुंबईत भरीव असे कोणतेच काम झाले नव्हते. वांद्रे-वरळी सागरी मार्ग या पाश्र्वभूमीवर लक्षणीय ठरणार आहे. या सागरी सेतुचा निवडणुकीत पुरेपूर वापर करून घेण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. हे समारंभात पदोपदी जाणवत होते. मुंबईच्या महापौर डॉ. शुभा राऊळ यांचा अपवाद अवगळता विरोधी पक्षाचा एकही प्रतिनिधी व्यासपीठावर किंवा प्रेक्षकात उपस्थित नव्हता. या समारंभाला शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, गुलाम नबी आझाद, प्रफुल्ल पटेल, गुरुदास कामत व प्रतिक पाटील हे केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, उद्योगमंत्री नारायण राणे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार कृपाशंकर सिंह व राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आमदार सचिन आहिर आदी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत मुंबईकरांनी काँग्रेस आघाडीला दिलेल्या पाठिंब्याबद्दल सोनियांनी सुरुवातीलाच मुंबईकरांना धन्यवाद दिले. देशातील कोणतेही क्षेत्र असे नाही की, मुंबई वा महाराष्ट्राने नाव कमावलेले नाही, असे गौरवौद्गार त्यांनी काढले. मुंबईकरांना भेडसावणाऱ्या समस्यांचा उल्लेख करून त्या म्हणाल्या की, वाहतूक ही समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी अभियानांतर्गत महाराष्ट्र व त्यातही मुंबईच्या वाटय़ाला सर्वाधिक निधी आला आहे. केंद्र सरकारच्या सर्वच महत्त्वाकांक्षी योजनांचा महाराष्ट्राला फायदा झाला आहे. देशातील महानगरांचा विकास व्हावा, अशी काँग्रेस पक्षाची भूमिका असून, जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली जाईल. मुंबई हे जागतिक पातळीवरील आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्यात येत आहे. मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर व्हावे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुंबईच्या विकास योजनांना केंद्राने यापूर्वी मदत केली आहे व भविष्यात करण्यात येईल, असे सांगत मुंबईकरांना आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पाठीशी राहण्याचे अप्रत्यक्षपणे आवाहन केले.

मराठीचे वावडे
वांद्रे-वरळी सागरी पुलाच्या उद्घाटन समारंभात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाला मराठीचे वावडे असावे, असेच चित्र होते. व्यासपीठाच्या मागे फक्त इंग्रजी भाषेत फलक लावण्यात आला होता. शासकीय कार्यक्रमात नेहमीच मराठीचा वापर केला जातो. याचा बहुधा रस्ते विकास मंडळाला विसर पडला असावा. तसेच सूत्रसंचालन अर्धेअधिक हिंदी भाषेतच करण्यात आले. तसेच सूत्रसंचालकाने अनेक वेळा बम्बई असाच उल्लेख केला.