Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

भूमिपूजन ते उद्घाटन: स्वातंत्र्यवीर सावरकर ते राजीव गांधी असा ‘प्रवास’!
मुंबई, ३० जून/प्रतिनिधी

 

वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या भूमीपूजन समारंभाच्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्या सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याची घोषणा केली होती. त्याचा विसर राज्यातील सरकारला पडला असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना खूष करण्याकरिता मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्व. राजीव गांधी यांचे नाव देण्याची घोषणा घाईगर्दीत केल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी केली. राज्यात युतीचे सरकार असताना ४२० कोटी रुपयांत हा सागरी सेतू पूर्ण होणार होता. राज्यातील काँग्रेसप्रणीत सरकारच्या नाकर्तेपणामुळे त्यावरील खर्च १६८० कोटी रुपयांच्या घरात गेला. या सेतूच्या उभारणीचे संपूर्ण श्रेय युती सरकारचे असताना युतीच्या काळात या सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याचा जो निर्णय झाला त्याचा मात्र काँग्रेसला सोयीस्करपणे विसर पडला असल्याची टीका गडकरी यांनी केली.
फुले, आंबेडकर अथवा बाबू गेनू यांचे नाव का नाही? - उद्धव ठाकरे
वांद्रे-वरळी सागरी सेतूला राजीव गांधी यांचे नाव देऊन काँग्रेस आघाडी सरकारने मुंबई आणि महाराष्ट्राशी गद्दारी केली आहे असे मत व्यक्त करून शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी हे नामकरण शिवसेना मान्य करणार नाही, असा इशारा दिला आहे. या सेतूला फुले, आंबेडकर अथवा बाबू गेनू यांचे नाव का नाही, असा सवालही त्यांनी केला आहे. एरवी राजकीय स्वार्थासाठी फुले-आंबेडकर यांच्या नावांची जपमाळ ओढणारे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना या वेळी त्यांची आठवण का झाली नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. या सेतूला राजीव गांधी यांचे नाव देणे हा काँग्रेसच्या लाचारीचा नमुना आहे. या सेतूला स्वा. सावरकर यांचे नाव देणे उचित ठरते. सावरकरांचा जन्म मुंबईत झाला नसेल, पण ते महाराष्ट्राशी संबंधित वीरपुरुष आहेत. महाराष्ट्रच नव्हे तर देशासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी लढाई सुरू केली ती समुद्रातूनच. त्यांनी पुकारलेल्या क्रांतीचे समुद्राशी एक ऐतिहासिक नाते आहे. त्यामुळे त्यांचेच नाव या सेतूला देणे उचित ठरते.