Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

पाच दिवस ‘टोल फ्री’
मुंबई, ३० जून / प्रतिनिधी

 

मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास महामंडळाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून सध्या मुंबईत २४ हजार कोटी खर्चाची कामे सुरू आहेत. आणखी ३० हजार कोटींची कामे आगामी काळात सुरू होणार असल्याचे सांगून, मुंबईकरांसाठी वांद्रे-वरळी सागरी सेतू पाच दिवस म्हणजे ५ जुलैपर्यंत ‘टोल फ्री’ ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज केली. वांद्रे रेक्लेमेशन मैदानात पार पडलेल्या वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. मुंबई आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र म्हणून विकसित व्हावी, यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सुमारे ५५ हजार कोटींची विकासकामे एमएमआरडीएच्या माध्यमातून हाती घेण्यात आली आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहे. कृषी, उद्योग, उर्जा यासारख्या क्षेत्रांत महाराष्ट्र अग्रेसर आहे. या सागरी सेतूच्या उभारणीमुळे महाराष्ट्र हे आजही देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध होते, असे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ याप्रसंगी म्हणाले. वरळी-हाजीअली आणि हाजीअली-नरिमन पॉइंट या सागरी सेतूंची कामे एकाच वेळी सुरू करण्याची सूचना करून, भविष्यात प्रकल्पांची कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याचा सल्ला भुजबळांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिला.
वांद्रे-वरळी सागरी सेतू ही मुंबईची नवी ओळख ठरणार असल्याचे सांगून, केंद्राने शिवडी-न्हावा शेवा ट्रान्सहार्बर लिंकच्या उभारणीला चालना दिल्यास मुंबईचा चेहरामोहरा बदलेल, असा विश्वास राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) विमल मुंदडा यांनी व्यक्त केला. या सागरी सेतूमुळे शहराच्या पश्चिम कॉरिडोरवरील वाहतुकीची समस्या सुटेल. त्याचबरोबर शहराला नवा मानबिंदु मिळेल, असे एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश गवई यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणात सांगितले.