Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

प्रादेशिक


वांद्रे-वरळी सागरी सेतूचे उद्घाटन काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते मंगळवारी झाले. या सागरी सेतूला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव देण्यात आले आहे.

आयपीएस’ पदांवर नेमलेल्या १५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार
मुंबई, ३० जून/प्रतिनिधी
राज्यात पोलीस उपायुक्त व पोलीस अधीक्षक या पदांवर भारतीय पोलीस सेवेचे (आयपीएस) अधिकारी नेमणे नियमानुसार बंधनकारक असूनही अशा १५ पदांवर नेमल्या गेलेल्या ‘नॉन आयपीएस’ अधिकाऱ्यांना बदलून त्यांच्या जागी ‘आयपीएस’ अधिकारी नेमले जातील, असे आश्वासन राज्य सरकारतर्फे आज मुंबई उच्च न्यायालयास दिले गेले. संजय मोहिते, एस. डी. बावीस्कर, दिलीप सावंत, एन. तांबोळी, पी. व्ही. उगले, व्ही. एन. देशमाने, अंकुश िशदे, एस. डी. येनपुरे, महेश यू. पाटील, एस. व्ही. कोल्हे, के. जी. पाटील, डी. व्ही. मंडलिक, ए. जे. सागर, पी. व्ही. देशमाने आणि एस. वाय. सिरन या ‘आयपीएस’ नसलेल्या १५ अधिकाऱ्यांना मुंबईत पोलीस उपायुक्त किंवा मुंबईबाहेर जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक या पदांवर नेमले गेलेले आहे.

शिक्षक सभेच्या ‘कॉमनवेल्थ’ पुरस्कारप्राप्त प्रकल्पावर महापालिकेचा दात!
संदीप प्रधान, मुंबई, ३० जून

‘जिथे पिकते तिथे विकत नाही’, या म्हणीचा तंतोतंत अनुभव बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षक सभेचे नेते रमेश जोशी घेत आहेत. ‘किशोरवयीन मुलींचे आरोग्य शिक्षण’ या सात लाखांहून अधिक विद्यार्थि नींपर्यंत पोहोचलेल्या शिक्षक सभेच्या प्रकल्पाला कॉमनवेल्थचा ‘एज्युकेशन गुड प्रॅक्टिस अ‍ॅवॉर्ड’ अलीकडेच क्वालालम्पूर येथे प्रदान करण्यात आले. मात्र मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीने तसेच अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध केल्याने हा प्रकल्प सध्या बृहन्मुंबईत राबविला जात नाही.

अटक टाळण्यासाठी दीपक मानकरची धावाधाव
मुंबई, ३० जून/प्रतिनिधी

पुण्याच्या जमीन बळकाव प्रकरणातील आरोपी, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष व त्याच पक्षाचे निलंबित नगरसेवक दीपक मानकर यांनी होऊ घातलेली अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात मोठे वकील लावून आज दिवसभर बरीच धावपळ केली.

मुंबईतील ‘एनएसजी तळा’चे उद्घाटन
मुंबई, ३० जून / प्रतिनिधी

न्यूयॉर्क, लंडन तसेच जगातील अन्य मोठय़ा शहरांप्रमाणे मेगा सिटी पोलिसिंगअंतर्गत हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले जाईल. मुंबईवर दहशतवादी हल्ला झालाच तर एनएसजी कमांडो तात्काळ उपलब्ध व्हावे यासाठीही या हेलिकॉप्टर्सचा वापर करता येईल, असे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी आज सांगितले.

ऊसतोडणी कामगारांना आता १०८ रुपये मजुरी
मुंबई, ३० जून/प्रतिनिधी

ऊसतोडणी मजदूर व साखर संघ यांच्यात चार वर्षांकरिता करार करण्याचा, चालू आर्थिक वर्षांत ऊस तोडणी व वाहतुकीकरिता २० टक्के तर पुढील तीन वर्षांकरिता २५ टक्के वाढ देण्याचा तसेच ऊसतोडणी मजूरांकरिता विमा योजना तीन महिन्यांत लागू करण्याचे निर्णय शरद पवार व गोपीनाथ मुंडे यांच्या लवादाने दिला आहे. यामुळे टनाला मजुरांना ७७ रुपयांऐवजी १०८ रुपये मिळणार आहे. ऊसतोडणी कामगार व साखर कारखाने यांच्यातील प्रश्नासंबंधी तोडगा काढण्याकरिता हा लवाद साखर संघ व ऊस तोडणी मजदूर संघटना यांनी नेमला होता. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत काल व आज झालेल्या चर्चेनंतर लवादाने वरील निर्णय दिले. ऊसतोडणी मजदूर व साखर संघ यांच्यातील करार चार वर्षांकरिता असेल, २००८-०९ या वर्षांकरिता ऊस तोडणी व वाहतूक याकरिता २० टक्के तर २००९-२०१२ या तीन वर्षांकरिता २५ टक्के वाढ देण्यात येईल, ऊसतोडणी मुकादमाचे कमिशन एक टक्क्यांनी वाढविले जाईल, ऊसतोडणी मजदुरांसाठी तीन महिन्यात विमा योजना लागू करण्यात येईल, दादासाहेब रुपवते समितीच्या शिफारशी लवकरात लवकर लागू करण्यासाठी साखर संघ शासनाकडे आग्रह धरील, असे निर्णय लवादाने दिले. याखेरीज १४ मागण्या लवादाने मान्य केल्या, अशी माहिती महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी व वाहतूक मजूर व मुकादम संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब बांगर यांनी दिली.

९०:१० कोटय़ावरील सुनावणी अपूर्णच
मुंबई, ३० जून/प्रतिनिधी

इयत्ता ११ वीच्या प्रवेशांमध्ये ‘एसएससी’च्या विद्यार्थ्यांसाठी ९० टक्के जागा राखून ठेवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास आव्हान देणाऱ्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी आज दुसऱ्या दिवशीही अपूर्णच राहिली. मुख्य न्यायाधीश न्या. स्वतंत्र कुमार व न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या खंडपीठापुढे आज अर्जदारांतर्फे नवरोज सिरवाई व जिम्मी पोचखानावाला या दोन ज्येष्ठ वकिलांचे युक्तिवाद झाले. ‘आयसीएसई’ बोर्डातर्फे ज्येष्ठ वकील राजू सुब्रह्मण्यम यांनी सुरु केलेला युक्तिवाद दिवसअखेर अपूर्ण राहिला. उद्या बुधवारी दुपारी जेवणाच्या सुट्टीनंतर दोन तास पुढील युक्तिवाद होतील. अर्जदारांचे युक्तिवाद संपल्यानंतर सरकारतर्फे के. के. सिंघवी व अनिल साखरे हे विशेष ज्येष्ठ वकील उत्तर देतील. शिवाय गरज पडल्यास एसएससी बोर्ड, त्यांच्याशी संलग्न शाळांमधील शिक्षक-पालक संघटना व एसएससी विद्यार्थ्यांचे पालक इत्यादींचे वकीलही युक्तिवाद करतील. उद्याच्या दोन तासांत युक्तिवाद पूर्ण होणार नाहीत व गुरुवारचा दिवस जनहित याचिकांचा असतो हे लक्षात घेता लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेल्या या प्रकरणावरील सुनावणी शुक्रवारपूर्वी पूर्ण होण्याची चिन्हे नाहीत. त्यानंतरही न्यायालयाने लगेच निकाल न देता तो राखून ठेवला तर चित्र स्पष्ट व्हायला आणखीही काही दिवस लागू शकतील. महाविद्यालयांनी त्यांच्याकडे आलेल्या अर्जानुसार पहिली गुणवत्ता यादी ५ जुलैला लावायची आहे.

एमटीएनएलची आता थ्रीजी नेटवर्कवर ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सेवा
मुंबई, ३० जून/ व्यापार प्रतिनिधी

महानगर टेलिफोन निगम लिमिटेडने आपल्या थ्रीजी सेल्युलर सेवेअंतर्गत मुंबईकर ग्राहकांसाठी प्रति सेकंद ३.६ मेगाबाइट इतकी वेगवान इंटरनेट जोडणी देणारी ‘थ्रीजी जादू ब्रॉडबॅण्ड सेवा’ही आजपासून सुरू केली. हा ‘थ्रीजी जादू ब्रॉडबॅण्ड पॅक’ ग्राहक ३०० रु. शुल्क भरून घेऊ शकतील. एमटीएनएलने सुरुवात म्हणून आपल्या थ्रीजी सिमसह एचएसडीपीए डेटा कार्डचा प्रमोशनल पॅक ३४९९ रुपयांत ग्राहकांना उपलब्ध केला आहे. यासोबत आता ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सेवेचा लाभ घेण्यासाठी रु. ९९ ते रु. २५०० या दरम्यानच्या वेगवेगळ्या ‘थ्रीजी जादू’ प्लॅन्समधून ग्राहकांना निवड करता येईल. हँडसेटसह येणारी समग्र थ्रीजी मोबाईल सेवाही मुंबईकरांसाठी एमटीएनएल लवकरच सुरू करणार आहे.