Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

आयुक्तांच्या ‘हुकूमनाम्या’ला महापौरांचे आव्हान !
संदीप आचार्य

महापालिकेने लोकहिताचे घेतलेले धोरणात्मक महापौरांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आजपर्यंतचे संकेत पालिका आयुक्त जयराज फाटक यांनी पायदळी तुडविल्याची टीका करीत गटनेत्यांच्या बैठकीतही आयुक्त केवळ आपलाच हेका चालवून लोकप्रतिनिधींची एखादीही विनंती मान्य करत नाहीत, असा गौप्यस्फोट महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी आज केला. मुंबईत दररोज जागोजागी अनधिकृत झोपडय़ा बांधल्या जात आहेत. त्यामुळे मुंबई बकाल होत चाललेली असतानाही त्याविरोधात आयुक्त ठोस कारवाई कधी करणार, असा सवालही महापौरांनी केला.

३५ हजार झाडांची कत्तल; लागवड मात्र शून्य
कोटय़वधींचा खर्च करूनही पालिकेची उद्याने ओसाडच!

बंधुराज लोणे

उद्याने, क्रीडांगणे खासगी संस्थांना काळजीवाहू तत्वावर देण्याचा वाद पालिकेत रंगल्याच्या पाश्र्वभूमीवर मुंबईतील उद्याने आणि क्रीडांगणांच्या विकासावर पालिकेने वर्षभरात कोटय़वधी रुपये खर्च करूनही ही उद्याने ओसाड अवस्थेतच आहेत. वर्षभरात पालिकेने सुमारे ३५ हजार झाडे तोडण्यासाठी परवानगी दिली. मात्र एकाही नवीन झाडाची लागवड केली नाही, आरोप करण्यात येत आहे. याबाबत सत्ताधारी आणि विरोधी पक्षही शांत बसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

लेझर्सचं ‘तारा-नृत्य’
प्रतिनिधी

वांद्रे-वरळी समुद्र सेतूचा तो कौतुक सोहळा पाहण्यासाठी सोमवारी रात्री असंख्य उत्साही मुंबईकरांनी शिवाजी पार्क चौपाटीवर गर्दी केली होती. पश्चिम-पूर्व उपनगरांत टोकाला राहणारे चाकरमानी मुंबईकरही दादरला उतरून चौपाटीवर जमले होते. तिथून समुद्र सेतूचा तो भव्य त्रिकोणकृती टॉवरबरोबर समोर दिसत होता. स्टीलच्या रिममुळे पांढरा चकचकीत दिसणारा तो पूल आता लेझरच्या किरणांनी उजळून निघाल्यावर कसा दिसेल, याचे औत्सुक्य त्या गर्दीच्या मनात दाटून आले होते. ८ वाजून १० मिनिटांनी तो लेझर शो सुरू झाला.

बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशनात अनुया म्हैसकर निर्मित ‘सुखान्त’चा खास खेळ
प्रतिनिधी

उद्यापासून अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे भरविण्यात येणाऱ्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या चार दिवसांच्या अधिवेशनात शुक्रवारी संजय सूरकर दिग्दर्शित आणि अनुया म्हैसकर निर्मित ‘सुखान्त’ या चित्रपटाचा खास खेळ आयोजित करण्यात आला आहे. यासंदर्भात अनुया म्हैसकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या की निर्माती म्हणून हा माझा पहिलाच चित्रपट असून इच्छा मरण हा या चित्रपटाचा विषय आहे. इच्छा मरण हा विषय जगभर अनेकदा चर्चिला गेला आहे. त्यामुळे हा विषय केवळ मराठीपुरता किंवा भारतीयांपुरता मर्यादित नाही तर ‘युनिव्हर्सल’ आहे. म्हणूनच ‘सुखान्त’ हा चित्रपट अमेरिकेत होत असलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात दाखविण्याचे ठरविले. याविषयी अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या की, दिग्दर्शक संजय सूरकर यांचीच कथा असून, पटकथा व संवाद लेखन किरण यज्ञोपवित यांचे आहे. तसेच संवेदनशील अभिनेता अतुल कुलकर्णी याने मुलाची तर ज्योती चांदेकर यांनी केली आहे. तसेच अभिनेता तुषार दळवी आणि कविता मेढेकर यांच्याही यात प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट मुंबईसह राज्यभर कधी प्रदर्शित करणार असे विचारल्यावर आधी विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवून नंतर तो मुंबई व राज्यात प्रदर्शित करण्याचा विचार आहे, असेही अनुया म्हैसकर यांनी सांगितले. टोरंटो चित्रपट महोत्सवात दाखविण्यासाठी हा चित्रपट पाठविण्याची तयारी सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

ऑगस्टमध्ये मराठी व्यापारी मित्रमंडळातर्फे महाराष्ट्र व्यापारी पेठेचे आयोजन
प्रतिनिधी

मराठी व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन व्यापार-उद्योग वाढीसाठी आणि जास्तीत जास्त मारठी युवकांनी व महिलांनी उद्योग व्यवसायात येण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मराठी व्यापारी मित्रमंडळातर्फे यंदाही महाराष्ट्र व्यापारी पेठेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा ही व्यापारी पेठ येत्या १५ ऑगस्ट ते २० ऑक्टोबर २००९ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. पेठेचे यंदाचे २० वे वर्ष आहे. डिसिल्व्हा हायस्कूलचे पटांगण, रानडे मार्ग, दादर (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आलेली ही पेठ सकाळी १० ते रात्री ८.३० या वेळेत खुली राहाणार असून ८० ते ८५ मराठी व्यापारी यात सहभागी होणार आहेत. १९८९ मध्ये व्यापारी पेठेल सुरुवात झाली. या पहिल्या पेठेचे उद्घाटन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. अनेक नवीन उद्योजकांनी या व्यापारी पेठेतून आपल्या व्यवसायाला सुरुवात करून आज ते यशस्वी व्यावसायिक बनले आहेत. गणपती ते दिवाळी या कालावधीत ही व्यापारी पेठ नवीन उद्योजकांसाठी व्यापाऱ्याची शिकवण देणारी कार्यशाळा आहे. व्यापारी मित्र मंडळाचे अध्यक्ष ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर, उपाध्यक्ष किशोर रांगणेकर, कार्याध्यक्ष विजय कामेरकर, पेठेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अनुक्रमे अनंत भालेकर व अनंत म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारी मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सहकार्याने ही व्यापारी पेठ काम करत आहे. यंदाच्या व्यापारी पेठेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी मराठी व्यापारी मित्रमंडळाच्या कार्यालयात सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० या वेळेत (रविवार सोडून) ०२२-२४३७९७५०/३२५१८८४६ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘कोकणातील प्रदूषणकारी प्रकल्पांच्या विरोधात संघर्षांचे रणशिंग फुंकणार’
प्रतिनिधी

वारकऱ्यांनी संघटितरित्या प्रखर संघर्ष केल्याने दाऊसारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीला आपला गाशा गुंडाळावा लागला. आज काही स्वार्थी राजकीय नेते मंडळी कोकण विकासाच्या नावाखाली प्रदूषणकारी प्रकल्प आणत आहेत. त्यामुळे कोकणचे वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही. म्हणूनच कोकणाला या प्रदूषणकारी प्रकल्पांच्या विळख्यातून मुक्त करायचे असेल तर कोकणवासीयांनी आता या प्रकल्पांच्या विरोधात संघटितरित्या संघर्षांचे रणशिंग फुंकले पाहिजे, असे सांगून समस्त कोकणी माणसांना संघटित व्हावे,असे आवाहन कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहनराव केळुसकर यांनी येथे बोलताना केले. कोकण विकास आघाडीने निसर्गसंपन्न कोकणला उद्ध्वस्त करण्याचा सरकारी डाव हाणून पाडण्याच्या उद्देशाने कोकणातील पर्यावरणप्रेमी, संस्था, नागरिक, ग्रामविकास मंडळे यांची संयुक्त जाहीर सभा आयोजित केली होती. ही सभा दादर येथील छबिलदास हायस्कूलमध्ये झाली. त्यावेळी केळुसकर बोलत होते. व्यासपीठावर मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कुमार कदम, सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संरक्षण संघटनेचे अध्यक्ष वसंतराव ऊर्फ अण्णा केसरकर, आघाडीचे सरचिटणीस सूर्यकांत पावसकर, उपाध्यक्ष भाऊसाहेब परब आदी मान्यवर होते.

आषाढी एकादशीनिमित्त एस. टी. च्या विशेष गाडय़ा
प्रतिनिधी

आषाढी एकदशीनिमित्त राज्य मार्ग परिवहन मंडळातर्फे मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला नेहरू नगर आगार तसेच पनवेल आणि उरण अशा पाचही आगारांतून पंढरपूर यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी आणि वारकऱ्यांसाठीही विशेष गाडय़ा सोडण्यात येत आहेत. २८ जूनपासून या विशेष बसगाडय़ा सोडण्यात येत असून, २ जुलैपर्यंत हा उपक्रम सुरू राहील, अशी माहिती राज्य परिवहनचे मुंबई विभाग नियंत्रक एस. डी माईनहळ्ळीकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. खास वारकऱ्यांच्या मागमीनुसार या जादा गाडय़ांची व्यव्यस्था करण्यात आली आहे. तसेच भाविकांच्या मागणीनुसार ग्रुप बुकिंगकरिता जादा बसगाडय़ांची व्यवस्थाही परिवहन मंडळाने केली आहे. त्याशिवाय परतीच्या वाहतुकीसाठी ४ ते ७ जुलै दरम्यान पंढरपूरहून जादा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. त्याचे आरक्षण सुरू करण्यात आल्याचेही पत्रकात नमूद केले आहे. आगाऊ आरक्षण पंढरपूर येथील चंद्रभागा नगर यात्रा बसस्थानक शेड क्र. १३ व १४ येथून प्रवाशांना परतीचे तिकिट आरक्षित करता येणार असून, आरक्षणाची वेळ सकाळी ९.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठीही विशेष गाडय़ा सोडण्यात येतील.

दहावी नापास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
प्रतिनिधी

दहावीच्या परीक्षेत नापास झालेले विद्यार्थी मानसिकदृष्टय़ा खचून जातत असे विद्यार्थ्यांसाठी संकल्प संस्थेतर्फे उद्या संध्याकाळी ६ वाजता विनामूल्य मार्गदर्शन केले जाणार आहे. दादर पश्चिम येथील काणे हॉल येथे हा कार्यक्रम होणार असून सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी ९८२००९६०७९ या मो. क्र. वर संपर्क साधावा.