Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

पावसाअभावी आषाढीची बाजारपेठही सुनीसुनी..
नगर, ३० जून/प्रतिनिधी

आषाढी एकादशी दोन दिवसांवर आली तरी उपवासाचे पदार्थ खरेदी करण्यासाठी बाजारात फारशी वर्दळ दिसत नाही. पाऊस लांबल्याने हा परिणाम झाला असून, आर्थिक उलाढाल थंडावली आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. फळांची आवकही जेमतेम असून, मागणी वाढल्याने भाव वाढले आहेत.

कोल्हारचा ‘बंद’, उपोषण मागे
जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
कोल्हार, ३० जून/वार्ताहर
कोल्हार-भगवतीपूरच्या गावकऱ्यांनी सुरू केलेले आमरण व चक्री उपोषण, गाव बंद आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.भगवतीपूर देवालय ट्रस्टवर नव्याने नियुक्त प्रशासकीय मंडळ बरखास्त करावे, नवीन विश्वस्त मंडळ ग्रामसभेतून निवडावे, मंत्रिपदाचा गैरवापर करणाऱ्या राधाकृष्ण विखेंनी राजीनामा द्यावा, सहायक धर्मादाय आयुक्तांची चौकशी होऊन त्वरित बदली करावी या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने राहात्याचे तहसीलदार राहुल मुंडके यांनी आज स्वीकारले.

रेल्वेगेट प्रश्नी मंत्र्यांचे लक्ष वेधणार - गांधी
लोकसत्ता इफेक्ट
नगर, ३० जून/प्रतिनिधी
शहराबाहेरील बाह्य़वळण रस्ता सुरू होण्यासाठी अत्यावश्यक बनलेला रेल्वेगेटचा प्रश्न एका महिन्यात सोडवू. यासाठी १-२ दिवसांत दिल्लीत रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी, रेल्वे राज्यमंत्री मुनीअप्पा यांची भेट घेऊन त्यांना पत्र देऊ, असे आश्वासन खासदार दिलीप गांधी यांनी आज नगरमधील सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना दिले.

भाजपमधील गटबाजी; गांधींच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
नगर, ३० जून/प्रतिनिधी

लोकसभेचा एक मतदारसंघ ताब्यात येऊनसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा व शहर शाखेतील गटबाजी संपायला तयार नाही. पक्षाच्या जिल्हा शाखेच्या बैठकीत खुद्द खासदार दिलीप गांधी यांनीच याबद्दल खंत व्यक्त करीत उपस्थित पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.
विजयानंतर महिना उलटून गेल्यावर जिल्हा शाखेला आपल्या सत्काराची आठवण झाली, याबद्दल गांधी यांनी खेद व्यक्त केला.

‘पिंपळगाव जोगा’च्या जलपूजनासाठी मुख्यमंत्री येणार
निघोज, ३० जून/वार्ताहर

पिंपळगाव जोगा धरणाच्या पाण्याचे पूजन करण्यासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी येण्याचे मान्य केल्याची माहिती तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. भास्कर शिरोळे यांनी दिली.काल सायंकाळी माजी खासदार बाळासाहेब विखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ मुंबईत मुख्यमंत्र्यांना भेटले. यावेळी पिंपळगाव जोगा धरणाचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी लवकरच सचिव पातळीवरील बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.

भंडारदरा परिसराला मान्सूनची प्रतीक्षा
अकोले, ३० जून/वार्ताहर

जून महिना संपत आला, तरी भंडारदरा परिसरात अद्याप मान्सूनचे आगमन झाले नाही. या महिन्यात भंडारदरा येथे फक्त ९० मि. मी. म्हणजे सरासरीच्या फक्त २५ टक्के पावसाची नोंद झाली. मागील वर्षांच्या तुलनेत धरणात आज निम्माच पाणीसाठा आहे. मे महिना संपता संपता मान्सूनपूर्व पाऊस भंडारदऱ्याच्या पाणलोटक्षेत्रात हजेरी लावत असतो.

डेंग्यूबाबत मनपाकडून प्रतिबंधात्मक उपाय
समाजवादी पार्टीचे बोंबाबोंब आंदोलन
नगर, ३० जून/प्रतिनिधी
डेंग्यू आजाराबाबत महापालिकेने प्रतिबंधात्मक उपायांना सुरुवात केली आहे. मात्र, शहरात कुठेही डेंग्यूची मोठी साथ वगैरे नसून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले. दरम्यान, डेंग्यू या आजारामुळे निधन झालेल्या सानिया शेख (झेंडीगेट) हिच्या बूथ रुग्णालयामधील तपासण्यांचे अहवाल तपासले असता, त्यात डेंग्यूचा निर्देश नाही.

काँग्रेस नगरसेवकांचा सभात्याग
श्रीगोंदे पालिकेची सभा शाब्दिक चकमकीने गाजली
श्रीगोंदे, ३० जून/वार्ताहर
पालिकेची आज मासिक सभा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांतील शाब्दिक बाचाबाचीने चांगलीच गाजली! सत्ताधारी राष्ट्रवादीने बहुमताच्या जोरावर त्यांच्या व भाजप नगरसेवकांच्या प्रभागात सव्वा कोटींची रस्त्यांची कामे वाटली, असा आरोप करताना काँग्रेस नगरसेवकांच्या प्रभागांना दुजाभावाची वागणूक दिली असा आरोप करीत सभात्याग केला.

डॉ. गिरीश कुलकर्णी यांना ‘नीरा-गोपाल’ पुरस्कार जाहीर
नगर, ३० जून/प्रतिनिधी

स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांना पुणे येथील गो. नि. दांडेकर प्रतिष्ठानचा ‘नीरा-गोपाल पुरस्कार’ जाहीर झाला आहे. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येतो. डॉ. कुलकर्णी गेल्या वीस वर्षांपासून स्नेहालयच्या माध्यमातून देहविक्रय करणाऱ्या महिला, बालके व एड्सग्रस्त व्यक्तींच्या पुनर्वसनाचे काम करीत आहेत.या प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा मृण्मयी पुरस्कार प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांना जाहीर झाला आहे. दोन्ही पुरस्कारांचे वितरण दि. ८ रोजी संध्याकाळी ६ वा. डॉ. आनंद यादव यांच्या हस्ते होईल, अशी माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. वीणा देव यांनी दिली.

स्टेट बँकेकडून ४० कोटींचे गृह व मोटार कर्ज वितरित
नगर, ३० जून/प्रतिनिधी
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने पाच महिन्यांत ४० कोटींचे गृह व मोटार (कार) कर्ज वितरित करण्यात आले. बँकेच्या सावेडी शाखेत या सुविधेचा विभाग सुरू करण्यात आला. या विभागाने कर्ज अर्जाची छाननी, तपासणी, पूर्तता व शिफारस आदी प्रक्रिया पूर्ण करून शहरातील आठ शाखांमधून कर्जाचे वितरण केले. २२६ कारसाठी ५ कोटी व ४५०, गृहकर्ज प्रकरणी ३५ कोटींचे कर्ज वितरित करून पुणे विभागात सर्वात जास्त ४० कोटींचा व्यवसाय या विभागाने केला. याबद्दल कर्ज विभागाचे प्रमुख वेणूनाथ बिदे, मंजुश्री भोसले व योगेश नाईक यांचा सत्कार पुणे विभागाचे उपमहाप्रबंधक राकेश पुरी यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी सहायक महाप्रबंधक नवलकिशोर शर्मा, शंतनू पेंडसे, रूकसाना चौधरी, शिवाजी ओंदरे आदी उपस्थित होते.

‘पतसंस्थांनी वार्षिक सभेत सेवानियमाचा विषय घ्यावा’
नगर, ३० जून/प्रतिनिधी
पतसंस्थांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत सेवानियमाचा विषय चर्चेला घ्यावा, असा आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिला आहे, अशी माहिती पतसंस्था कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुधाकर टोकेकर यांनी दिली.पतसंस्था सेवानियम व सेवेविषयक असलेल्या तरतुदीचे पालन करीत नसल्यामुळे पतसंस्था कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. उपोषणास बसण्याचा इशारा त्यात देण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेत जिल्हा उपनिबंधकांना याबाबत कार्यवाही करण्याबाबत कळविले. त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी ज्या पतसंस्थांनी सेवानियम लागू केलेले नाहीत, त्यांना हा विषय वार्षिक सभेत घेण्याचा आदेश दिला.

प्रा. काकडे यांचा सपत्नीक सत्कार
नगर, ३० जून/प्रतिनिधी
न्यू आर्टस महाविद्यालयातील प्रा. तानाजी काकडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी रामनाथ वाघ होते.जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे खजिनदार माजी आमदार नंदकुमार झावरे, विश्वासराव आठरे, रामचंद्र दरे, उपप्राचार्य बी. बी. गाडेकर, भीमराव काकड या वेळी उपस्थित होते. विखे, वाघ आदी मान्यवरांनी या वेळी प्रा. काकड यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करीत भावी जीवनासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. राज्याचे कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही दूरध्वनीवरून प्रा. काकड यांना शुभेच्छा दिल्या. प्रा. काकड यांनीही मनोगत व्यक्त केले.

जैन श्रावक संघातर्फे ६ पासून चातुर्मास
नगर, ३० जून/प्रतिनिधी
जैन श्रावक संघाच्या वतीने नवीपेठेतील रंभाबाई पितालिया जैन धर्मस्थानकात आयोजित चातुर्मास यंदा विनोदमुनी, सुंदरमुनी, प्रार्थनापटू जयवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. या चातुर्मासाचा प्रारंभ सोमवार (दि. ६)पासून सुरू होणार आहे. चातुर्मास काळात प्रवचनांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तप, आराधना, उपवास आदी सर्वच कार्यक्रमांत भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत यांनी केले आहे.

सहा. केंद्र संचालक आवटी नाशिक आकाशवाणीत
नगर, ३० जून/प्रतिनिधी

आकाशवाणी नगरचे सहायक केंद्र संचालक गोपाळ आवटी यांची नाशिक येथील आकाशवाणी केंद्रात बदली झाली. गेली ५ वर्षे आवटी नगर केंद्रात कार्यरत होते.वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती, जिल्ह्य़ातील निवडणुकांचे थेट प्रसारण, मान्यवरांच्या मुलाखती, प्रसिद्ध पुस्तकांचे क्रमश वाचन, शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारा कार्यक्रम याद्वारे आवटी यांच्या कारकीर्दीत नगर आकाशवाणी श्रोतेप्रिय झाली. आवटी यांनी यापूर्वी आकाशवाणी जळगाव, औरंगाबाद, रत्नागिरी, खंडवा (म.प्र.)केंद्र येथे काम केले.

बसपच्या दोघा कार्यकर्त्यांमध्ये मारामारी
नगर, ३० जून/प्रतिनिधी

बैठक घेण्यावरून बहुजन समाज पक्षाच्या दोघा कार्यकर्त्यांत आज स्टेट बँक चौकात हाणामारी झाली. त्यात नंदू खंडू बडेकर (वय ४०, रा. दरेवाडी, ता. नगर) जखमी झाला.दुपारी २ वाजता हा प्रकार घडला. सोमवारी (दि. ६) होणाऱ्या पक्षाच्या बैठकीला ‘तू यायचे नाही,’ असे म्हणत पप्पू जहागीरदार (रा. झेंडीगेट) या कार्यकर्त्यांने बडेकरला गजाने मारहाण केली. बडेकरला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.या प्रकरणी बडेकरच्या फिर्यादीवरून जहागीरदारविरुद्ध कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक चौधरी करीत आहेत.

औद्योगिक वसाहतीतील निवासी क्षेत्र मंजूर
श्रीरामपूर, ३० जून/प्रतिनिधी
औद्योगिक वसाहतीतील २२ एकर क्षेत्र निवासी प्रयोजनाकरिता राखीव करण्यात आल्याची माहिती एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब काळे यांनी दिली.औद्योगिक वसाहतीतील निवासी क्षेत्र मंजूर व्हावे, याकरिता मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता.औद्योगिक वसाहतीत उद्योजकांसाठी २२ एकर क्षेत्र राखीव ठेवण्यात आले असून, २ ते ३ गुंठय़ांचे ३०० प्लॉटस् पाडण्यात येणार आहेत. निवासी क्षेत्रात पाणी, वीज, रस्ते आदी सुविधा उपलब्ध केल्या जाणार असल्याची माहिती काळे यांनी दिली.निवासी क्षेत्र मंजूर होण्यास संपर्कमंत्री दिलीप वळसे, शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे, गोविंदराव आदिक, बाळासाहेब विखे मिळाल्याचे काळे यांनी सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी कोरडे
श्रीरामपूर, ३० जून/प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी खासदार झाल्यानंतर जिल्ह्य़ात कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी संघटनेचे नेवासे तालुकाध्यक्ष अंबादास कोरडे यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी सुभाष पटारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नाभिक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी जगताप
श्रीरामपूर, ३० जून/प्रतिनिधी
नाभिक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी संजय जगताप यांची निवड करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांचे बाबासाहेब कुटे, बाबासाहेब शेजूळ आदींनी अभिनंदन केले.
सरपंचपदी बिडगर
वांगी बुद्रुकच्या सरपंचपदी जगन्नाथ बिडगर यांची निवड करण्यात आली. सरपंच बिडगर हे माजी आमदार भानुदास मुरकुटे गटाचे आहेत.

आयआयटी प्रवेश परीक्षेत आशिष ताजणेचे यश
श्रीरामपूर, ३० जून/प्रतिनिधी
आय.आय.टी. प्रवेश परीक्षेत लोणी येथील आशिष प्रकाश ताजणे उत्तीर्ण झाला. या परीक्षेस चार लाख विद्यार्थी बसले होते. मात्र, अवघे १० हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ताजणे याने देशपातळीवर २१०वे, तर इतर मागासवर्गीयांत २३वे मानांकन मिळविले, तसेच कें द्रीय अभियांत्रिकी परीक्षेत देशात ९४वा व राज्यात इतर मागासवर्गीयांत पहिला आला. ग्रामीण मुलांना आय.आय.टी. प्रवेश परीक्षेची माहिती नसते. त्यामुळे आंध्र, राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार राज्यांतील विद्यार्थी फायदा घेतात. खासगी शिकवण्यामुळे त्यांना यश मिळते. आता विद्यार्थ्यांना आय.आय.टी. प्रवेश परीक्षेचे मार्गदर्शन क रण्याचा मनोदय त्याने व्यक्त केला. प्रवरा बँकेतील प्रकाश ताजणे यांचा आशिष मुलगा असून त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयात घेतले. प्रा. रामकिसन वर्मा यांचे त्याला मार्गदर्शन मिळाले. आशिषचे शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे, माजी खासदार बाळासाहेब विखे, प्रवरा बँकेचे अध्यक्ष विजय गुणे, उपाध्यक्ष का. बा. ताढे यांनी अभिनंदन केले.

पालिकेने वसाहतीची नोंद करण्याची मागणी
श्रीरामपूर, ३० जून/प्रतिनिधी
नगरपालिका हद्दीतील रासकर वसाहतीमागे राहणाऱ्या ६३ कुटुंबांच्या वसाहतीची पालिकेने नोंद करावी, अशी मागणी स्वतंत्र मजूर पक्षाचे अध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी केली आहे.रासकर मळा भागात गेल्या अनेक वर्षांपासून ही कुटुंबे राहत आहेत. त्यांना शिधापत्रिका देण्यात आल्या असून, मतदारयादीत त्यांचे नाव आहे. दारिदर्््यरेषेखाली ही कुटुंबे असून, पालिकेने या भागात नागरी सुविधा दिल्या पाहिजेत, असे रणशूर म्हणाले.पालिकेने वसाहतीची नोंद करावी; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा रणशूर व पक्षाचे सचिव श्याम गायकवाड यांनी दिला आहे.

गौणखनिजाची रक्कम दिल्यावरच पुढील लिलावाचा निर्णय
श्रीरामपूर, ३० जून/प्रतिनिधी

वाळूचे लिलाव केले, सरकारने ठेकेदारांकडून रक्कम वसूल केली, परंतु हिश्श्याची रक्कम अद्यापि ग्रामपंचायतींना अदा करण्यात आली नाही. त्यामुळे आधी गौणखनिजाची रक्कम अदा करा, मगच लिलावाचा निर्णय घ्या असा इशारा उक्कलगावकरांनी दिला आहे. नायब तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला. ग्रामपंचायतीची सरकारकडे मोठय़ा प्रमाणात रक्कम थकित आहे. ती त्वरित अदा करावी, अशी मागणी विकास थोरात यांनी सभेत केली. सभेस बन्सीभाऊ थोरात, जनार्दन थोरात, ज्ञानदेव थोरात, प्रल्हाद फुलपगार, बाळासाहेब थोरात, दिलीप थोरात, बापू धनवटे, ताराचंद पारखे आदी उपस्थित होते.