Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

करात कपात करून महापालिकेचा नागरिकांना दिलासा
* १० रुपये बेसरेटच्या मुद्यावर आयुक्त ठाम *पुन्हा एकदा बेस रेट ५ रुपये करण्याचा बैठकीचा ठराव

नागपूर, ३० जून/ प्रतिनिधी

महापालिका आयुक्त बेस रेटच्या मुद्यावर ठाम राहल्याने आज सभागृहाने स्वत:च्या अधिकार क्षेत्रातील सामान्य कर, मलजल कर, सामान्य जल कर कमी करण्याचा प्रस्ताव पारित करून नागपूरकरांना थोडाफार दिलासा देण्याचा प्रयत्न केला. परंतु, बेस रेट ‘जैसे थे’ असल्याने मालमत्ता करात वाढ अटळ आहे. शहरात मालमत्ता कर आकारणीत सूसुत्रता यावी म्हणून १० रुपये बेस रेट आयुक्तांनी निश्चित केला.

शहरात पाऊस; इतरत्र आगमनाची प्रतीक्षाच
नागपूर, ३० जून / प्रतिनिधी

नागपूर आणि चंद्रपुरात आज दुपारनंतर पावसाने परत जोरदार हजेरी लावली. विदर्भाच्या अन्य भागात सायंकाळनंतर पावसाला प्रश्नरंभ झाला. कळमेश्वर, चंद्रपूरसह अन्य तालुक्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने दिलासा मिळाला असून पेरणीच्या लगबगीत असणाऱ्या बळीराजात उत्साह संचारला आहे. गेल्या रविवारी आलेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, परत उघाड पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. आज सायंकाळनंतर मात्र पश्चिम विदर्भातील अनेक तालुक्यात पावसाने हजेरी लावली.

शेवटची घटका मोजणाऱ्या कॅन्सरग्रस्तांवर प्रेमाची सावली
राम भाकरे
नागपूर, ३० जून

प्रत्येक रोगावर औषधानेच उपचार होतो असे नव्हे तर, प्रेमभावनाही रुग्णाला दिलासा देत असते, याची जाणीव ठेवूनच आयुष्याच्या शेवटच्या क्षणी रुग्णाचे जगणे सुसह्य़ करण्यासाठी इमामवाडा परिसरातील स्नेहांचल हॉस्पिस अँड पॉलिएटिव्ह केअर सेंटर ही चॅरिटेबल संस्था गेल्या तीन वर्षांपासून कॅन्सरग्रस्तांची सेवा करीत आहे. कॅन्सरची दहशत एवढी आहे की, कॅन्सर झाल्याचे सांगितल्यावर बहुसंख्य रुग्ण अर्धमेले होतात! कॅन्सरवर वैद्यकीय संशोधनाने उपचारांची अनेक तंत्रे विकसित केली असली तरी कॅन्सरच्या विळख्यातून बोटावर मोजण्याइतक्याच रुग्णांची मुक्तता होत असते. कॅन्सरग्रस्तांना आयुष्याच्या शेवटच्या क्षणी जीवन असह्य़ होऊन जाते. आज या दुर्धर रोगावरील उपचाराकरिता महिन्याकाठी किमान खर्च ५० ते ६० हजार रुपयांच्या घरात जाणारा आहे. गरीब कुटुंबातील रुग्णाला हा खर्च झेपणारा नाही. कॅन्सरचा रुग्ण घरातील लोकांना अनेकदा नकोसा वाटतो, त्याची अनेकदा अवहेलनाही होत असते.

तुका म्हणे ज्याला नाही गुरुभक्ती ।
त्याने भगवे हाती धरू नये ।।

संत ज्ञानेश्वरादी संतांच्या अलौकिक कार्यानंतर सुमारे दोनशे वर्षानी महाराष्ट्रात शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांनी हा भागवत धर्म पुनरुज्जीवित करण्याचं महान कार्य केलं. कोणाही जीवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचे या अभंग चरणाचा ध्वनिभूत जिवंत अर्थ श्री नाथरायांच्या रूपाने अवतीर्ण झाला होता. उन्हाळ्याच्या दिवसात गोदावरीच्या तप्त वाळवंटात भर दुपारी तळमळत रडत बसलेल्या बालकाला पाहून सुमनाहूनही कोमल असणारं नाथाचं अंत:करण कळवळलं! गोदावरीच्या स्नानानं शुर्चिभूत झालेल्या नाथांनी त्या बालकाला पटकून आपल्या कडेवर घेतलं.

राज्यात खरिपाच्या चार टक्के पेरण्या -थोरात
१७७ तालुक्यांमध्ये ४० टक्केहून कमी पाऊस
नागपूर, ३० जून / प्रतिनिधी
राज्यातील खरिपाच्या २९९ तालुक्यांपैकी तब्बल १७७ तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा ४० टक्केहून कमी पाऊस पडला असल्याने आतापर्यंत जेमतेम चार टक्केच पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती कृषी मंत्री व नागपूर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. मात्र, सध्याच्या अंदाजानुसार येत्या आठवडय़ात स्थिती सुधारेल अशी स्थिती आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्यातील फक्त १२ तालुक्यांमध्ये आतापर्यंत १२० टक्केपेक्षाअधिक पाऊस झाला आहे.

सिंचनाद्वारे परिसराचा कायापालट
मनीष मांडवगडे

मेहकर विधानसभा मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार प्रतापराव जाधव यांनी पाठपुरावा केला. सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी विधिमंडळात प्रतापराव जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली. मेहकर शहराचा वळण रस्ता, पैनगंगा नदीवरील अरुंद पूल यासाठी विधान भवन आणि स्थानिक प्रशासनासमोर आंदोलने केली. जागतिक दर्जाच्या लोणार सरोवराला विदेशी पर्यटक भेट देतात पण, तुलनात्मकदृष्टय़ा तेथे आधुनिक सुविधांचा अभाव आहे.

वाहन तपासणी मोहीम तेजीत
१५ दिवसात कागदपत्रे दाखवली तर दंडापासून मुक्ती
नागपूर, ३० जून / प्रतिनिधी
वाहन तपासणी मोहिमेत वाहनांची कादगपत्रे पंधरा दिवसांच्या आत पोलिसांना दाखवता येतात, त्यासाठी दंड आकारण्याची गरज नाही, असा खुलासा नागरी सुविधा समन्वय समितीच्या बैठकीत आज अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. वाहतूक पोलीस उपायुक्त हरीष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व प्रश्नदेशिक उपपरिवहन अधिकारी बढीये यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.
पोलिसांकडून सुरक्षेसाठी शहरात सर्वत्र वाहन तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. त्यामुळे वाहनांच्या तपासणीसोबतच समाजकंटकांवरही नियंत्रण ठेवता येते.

कृषी पुरस्कारांचे आज नागपुरात वितरण
* राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार
* विदर्भातील १२ शेतकऱ्यांना कृषीरत्न पुरस्कार
* ‘लोकसत्ता’चे आसाराम लोमटे यांना शेतीमित्र पुरस्कार
नागपूर, ३० जून / प्रतिनिधी

राज्य सरकारतर्फे कृषी व फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कृषी रत्न पुरस्कारांचे उद्या, बुधवारी वितरण होणार आहे. राज्यपाल एस.सी. जमीर व श्रीमती अलेम्ला जमीर यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री अशोक चव्हाण व उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत वसंतराव देशपांडे सभागृहात सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होईल. कृषी मंत्री व नागपूर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात, फलोत्पादन मंत्री विनय कोरे, कृषी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर आणि फलोत्पादन राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे प्रमुख पाहुणे राहतील.

पेरण्या रखडल्या; शेतकरी चिंताक्रांत
नागपूर, ३० जून / प्रतिनिधी

गेल्यावर्षी सोयाबीनच्या पिकाने दगा दिल्याने यंदा शेतक ऱ्यांनी पुन्हा कापसाच्या पिकाला पसंती दिल्याचे चित्र नागपूर विभागात आतापर्यंत झालेल्या पेरण्यांवरून दिसून येत आहे. विशेष म्हणजे मान्सूनचा पाऊस चांगला पडण्याचे भाकित वर्तवल्यानंतरही पाऊस न झाल्याने पेरण्यांवर याचा मोठय़ा प्रमाणात परिणाम झाला आहे. नागपूर विभागात आतापर्यंत दोन टक्केच पेरण्या झाल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. मान्सून लांबल्याने पेरण्यांची वाट पाहत असलेल्या शेतक ऱ्यांनी गेल्या आठवडय़ात दोन दिवस चांगला पाऊस झाल्यानंतर पेरण्यांना सुरुवात केली.

फायनान्शिअल एक्स्प्रेसची बजेट एसएमएस अलर्ट सेवा
नागपूर, ३० जून / प्रतिनिधी
केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी ६ जुलैला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पात प्रत्येकासाठी काय दडलय, याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. नेमकी हीच बाब हेरून इंडियन एक्स्प्रेस लिमिटेडच्या फायनान्शिअल एक्स्प्रेस या अर्थविषयक दैनिकाने वाचकांसाठी मोबाईलवर बजेटसंबंधी एसएमएस अलर्टची सेवा उपलब्ध करून दिली आहे.युपीए सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर हा त्यांचा पहिलाच अर्थसंकल्प आहे. सुमारे २५ वर्षानंतर केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या सेवेचा लाभ घेण्यासाठी वाचकांना बजेटशी संबंधित महत्वाचा शब्द (‘की वर्ड’) मोबाईलवर टाईप करून ५८५५८ या क्रमांकावर पाठवल्यास त्वरित बजेटमधील माहिती एसएमएसद्वारे त्वरित उपलब्ध करून होणार आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर \ FELIVE असा एसएमएस ५८५५८ क्रमांकावर पाठवून या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

गर्दीमुळे अनेक विद्यार्थ्यांना अर्जच मिळाले नाही
अर्ज विक्री आजही सुरू राहणार
नागपूर, ३० जून / प्रतिनिधी

शेवटच्या दिवशी शहरातील विविध महाविद्यालयात पालक आणि विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दी केल्यामुळे अनेकांना अकरावीचे प्रवेश अर्जच मिळाले नाही. याची दखल घेऊन केंद्रीय प्रवेश समितीने पालकांची व विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी अर्ज विक्रीसाठी एक दिवस वाढवून दिला आहे. त्यामुळे उद्या, बुधवारी समितीने ठरवून दिलेल्या तीसही केंद्रांवर अर्ज विक्री केली जाणार आहे. आतापर्यंत विज्ञान, वाणिज्य आणि बायोफोकल शाखेसाठी एकूण ३८ हजार २६५ अर्जाची विक्री झाली आहे. ज्या विद्याथ्यार्ंनी अजुनही प्रवेश अर्ज घेतले नाही अशा विद्यार्थ्यांंसाठी केंद्रीय प्रवेश समितीने एक दिवस वाढवून दिला आहे. त्यामुळे उद्या, सोमवारी ठरवून दिलेल्या केंद्रांवर दुपारी ४ वाजेपर्यंत अर्जाची विक्री करण्यात येणार आहे. विविध केंद्रांवर आज विद्यार्थ्यांची गर्दी होती. धनवटे नॅशनल महाविद्यालयात दुपारच्यावेळी झालेल्या गर्दीमुळे अनेक पालकांना आणि विद्यार्थ्यांना दोन तास रांगेत उभे राहावे लागले. अर्ज विक्री सुरू असलेल्या अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची साधी सोयसुद्धा संबधितांनी केलेली नव्हती. अनेक पालकांनी याबाबत संताप व्यक्त केला. विज्ञान, वाणिज्य शाखेचे अर्ज कुठे मिळतील किंवा अर्जांसंबंधी कुठल्याही सूचना दिल्या जात नसल्यामुळे काही महाविद्यालयात गोंधळाचे वातावरण होते. अर्ज विक्रीच्या शेवटच्या दिवसापर्यंत विज्ञान शाखेत १६ हजार ६७१, वाणिज्य शाखेसाठी १३ हजार २५८ अर्जाची विक्री करण्यात आली असल्याची माहिती समितीने दिली आहे.

भीमशक्ती संघटनेची कर्जमाफीची मागणी
नागपूर, ३० जून / प्रतिनिधी
सामाजिक न्याय विभागाने अनुसूचित जाती व नवबौद्ध भूमीहिनांच्या स्वाभिमान सबलीकरण योजनेचे कर्ज माफ करावे, अशी मागणी भीमशक्ती संघटनेतर्फे सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे करण्यात आली.
भीमशक्तीच्या एका शिष्टमंडळाने हंसराज मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. अनुसूचित जाती व नवबौद्ध भूमीहिनांना ५० टक्के बिनव्याजी कर्ज म्हणून २ एकर ओलीत किंवा ४ एकर कोरडवाहू शेतजमीन देण्यात आली. आधी हे शेतमजूर होते. शासनाने त्यांचे सर्व कर्ज माफ केले. याशिवाय सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत सर्व महामंडळांच्या लाभार्थ्यांना देखील कर्जमाफी दिलेली आहे. याच धर्तीवर स्वाभिमान सबलीकरण योजनेचे कर्ज माफ करावे, अशी मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात रतिराम डोंगरे, डॉ. निजराम गायकवाड, रतिराम रेवतकर, गजानन नाटवटकर, अब्दुल रफिक, नरेंद्र जैन, सुधा जैन, वंदना भिमटे, रत्ना बोरकर, प्रतिभा वाघमारे, ज्योती जांभुळकर, प्रवीण बागडे, गणेश पाटील आणि श्यामराव मेश्राम आदींचा समावेश होता.

शिक्षण विभागाच्या वेतन निश्चितीचा कार्यक्रम जाहीर
नागपूर, ३० जून / प्रतिनिधी
नागपूर व शहर ग्रामीण भागातील अशासकीय खाजगी माध्यमिक खाळा, नगरपरिषद हायस्कूल, अध्यापक विद्यालये, अशासकीय कनिष्ठ महाविद्यालये आणि खाजगी कनिष्ठ महाविद्यालयातील सेवारत कर्मचाऱ्यांच्या सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आला. यासाठी सीताबर्डी येथील माजी शासकीय पटवर्धन हायस्कूल येथे शिबीर होणार आहे. सविस्तर कार्यक्रम लेखाधिकारी, शिक्षण विभाग यांच्या कार्यालयात उपलब्ध असून मुख्याध्यापक, प्रश्नचार्य व संबंधित लिपिकांनी १ जानेवारी २००६ रोजी सेवेत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मूळ सेवा पुस्तकासह, वेतन निश्चितीचे विकल्प आणि वेतन निश्चितीच्या दोन प्रतीत वितरणपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन लेखाधिकाऱ्यांनी केले आहे.

आमदार चतुर्वेदींच्या हस्ते रस्त्याचे लोकार्पण
नागपूर, ३० जून / प्रतिनिधी

कळमना बाजार ते विजयनगर आणि विजयनगर ते दुर्गा चौकपर्यंतच्या १ कोटी २० लाख रुपयांच्या रस्त्याचे लोकार्पण आमदार सतीश चतुर्वेदी यांच्या हस्ते झाले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दीपक कापसे, नगरसेवक देवेंद्र मेहर, दयाशंकर गिल्लोर, छोटू निर्मलकर, गणेश शाहू आणि कामताप्रसाद श्रीवास प्रमुख पाहुणे होते. या भागात प्रमुख रस्ता नसल्याने रहिवाशांची गैरसोय होत होती. दोन किलोमीटर लांबीच्या या रस्त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल, त्याचबरोबर या भागाचा विकासही होईल. पथदिवे लावण्यात येत असून लवकरच पेयजलाच्या वाहिनीचे कामही सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही माजी पालकमंत्री सतीश चतुर्वेदी यांनी यावेळी बोलताना दिली. कार्यक्रमास शत्रुघ्न शाहू, मानसिंग काटेकर, राजू निर्मलकर, विश्वनाथ वाघमारे, प्रभूदयाल हटवार आदी उपस्थित होते. प्रश्नस्ताविक रामकुमार वर्मा यांनी तर संचालन खुमान शाहू यांनी केले.

सांख्यिकी दिन उत्साहात साजरा
नागपूर, ३० जून / प्रतिनिधी
आयुक्त कार्यालयाच्या इमारतीत असलेल्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या प्रश्नदेशिक कार्यालयात प्रसिद्ध संख्याशास्त्रज्ञ दिवं. प्रश्ने.पी.सी. महालनोबीस यांच्या १६६ व्या जयंती दिनानिमित्त सांख्यिकी दिन साजरा करण्यात आला. यावेळी विज्ञान संस्थेच्या अधिव्याख्याता डॉ. एन.एन. कस्तुरीवाले प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या प्रश्नदेशिक कार्यालयाचे सहसंचालक धनंजय सुटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाला वस्त्रोद्योग संचालनालयाचे उपसंचालक एस.आर. भांगरे, प्रश्नदेशिक कार्यालयातील संशोधन अधिकारी एस.ए. भलावी प्रश्नमुख्याने उपस्थित होते. सहायक संचालक माधुरी माणिककुंवर यांनी प्रमुख अतिथी डॉ. कस्तुरीवाले यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमाचे संचालन व आभार संजय कडू यांनी मानले.

लोकराज्य देशातील सर्वाधिक खपाचे मासिक
नागपूर, ३० जून / प्रतिनिधी

राज्याच्या विकासाचा परिपूर्ण आढावा घेणारे व लोकप्रियतेचा चढता आलेख अधोरेखित करणारे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे लोकराज्य मासिक हे देशातील सर्वाधिक खपाचे दुसऱ्या क्रमांकाचे मासिक ठरले आहे. एबीसीने नुकत्याच केलेल्या पाहणीअंती हे सिद्ध झाले आहे. लोकराज्य मासिकाचा ३ लाख ७७ हजार इतका प्रमाणित खप असल्याचे प्रमाणपत्र एबीसीने दिले आहे.मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे मासिक देशातील सर्वाधिक खपाचे प्रथम क्रमांकाचे मासिक ठरेल, असा विश्वास माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक तथा लोकराज्यच्या मुख्य संपादक मनीषा पाटणकर- म्हैसकर यांनी व्यक्त केला आहे. पूर्वी कृष्णधवल असलेले लोकराज्य १ नोव्हेंबर २००६ मध्ये रंगीत झाले. आकर्षक मांडणी, अचुकता, विश्वासार्हता, लोकाभिमुख आशय तसेच घरोघरी लोकराज्य मोहीम यामुळे या मासिकाला प्रचंड प्रतिसाद लाभला, असे त्या म्हणाल्या.

जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे उद्या अनावरण
नागपूर, ३० जून / प्रतिनिधी
स्वातंत्र्य संग्राम सैनिक दिवं. जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ गुरुवारी सकाळी ९.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. चिखलीतील जवाहरलाल दर्डा कॉन्व्हेन्ट येथील परिसरात उभारण्यात आलेल्या या पुतळ्याचे अनावरण अन्न व नागरी पुरवठा मंत्री रमेश बंग यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी माजी मंत्री अनिल देशमुख राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून आमदार देवेंद्र फडणवीस, उद्योगपती सुधाकर शेट्टी राहणार आहेत. या कार्यक्रमास जास्तीतजास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन छात्र जागृतीचे अध्यक्ष धनराज बजाज, कार्याध्यक्ष सुरेश कोते, सचिव अ‍ॅड. निशांत गांधी यांनी केले आहे.

शिवसेनेतर्फे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुरस्कार योजना
नागपूर, ३० जून / प्रतिनिधी
शहर शिवसेनेतर्फे दक्षिण नागपूर क्षेत्रातील दहावी व बारावीच्या गुणवत्ता प्रश्नप्त विद्यार्थ्यांसाठी छत्रपती विद्यार्थी पुरस्कार योजना जाहीर करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ६० टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले, अशा विद्यार्थ्यांनी अर्ज करावयाचे असून ऑगस्ट महिन्यात गुणवत्ता प्रश्नप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे यांनी म्हटले आहे. शिवसेनेच्यावतीने गुणवत्ता प्रश्नप्त सर्वच वर्गातील विद्यार्थ्यांचा गौरव करण्याच्या दृष्टीने छत्रपती पुरस्कार योजना सुरू करण्यात आली असून वर्ग १ ते ९ च्या विद्यार्थ्यांच्या सत्काराचे वॉर्डनिहाय कार्यक्रम सुरू झाले आहे. एकूण पाच हजार विद्यार्थ्यांचा या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सत्कार होणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना ६० टक्केच्या वर गुण मिळाले आहेत, त्यांनी त्यांचे अर्ज शिवसेनेच्या रेशीमबाग कार्यालयात किंवा मानेवाडा चौकातील दक्षिण नागपूर शिवसेना कार्यालय अथवा तिरंगा चौकातील शिवसेना कार्यालयात पोहचून द्यावे. अर्जासोबत गुणपत्रीकेची झेरॉक्स कॉपी जोडावी. अधिक माहितीसाठी ९३२५४१७३०३ किंवा ९८२२७२७९२४ संपर्क करावा.

कमी गुण मिळाल्याने निराशा; विद्यार्थ्यांची आत्महत्या
नागपूर, ३० जून / प्रतिनिधी

दहावीत उत्तीर्ण होऊनही कमी गुण मिळाल्याने निराश झालेल्या एका तरुणाने सोमवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. संतोष उर्फ शंतनु गुलाब पाटील (रा. हिवरी नगर) हे त्याचे नाव आहे. त्याने घराच्या पहिल्या मजल्यावर छताच्या लाकडी खांबाला नॉयलॉन दोरीने गळफास घेतला. हे समजताच नंदनवन पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. संतोषच्या आत्महत्या करण्यामागील कारण स्पष्ट झालेले नाही. त्याने एका वहीच्या शेवटच्या पानावर ‘माझ्या आत्महत्येसाठी कुणासही जबाबदार धरू नये’ असे लिहिलेले होते. पोलिसांनी ती वही ताब्यात घेतली. संतोष याआधी तीनवेळा दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाला होता. गेल्या आठवडय़ात निकाल लागून तो उत्तीर्ण झाला. मात्र, अपेक्षेपेक्षा फारच कमी गुण मिळाल्याने तो निराश दिसत होता, असे त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले.

फडणवीस, जाधव यांचा उत्तर भारतीयांतर्फे निषेध
नागपूर, ३० जून / प्रतिनिधी
अंबाझरी दारूगोळा कारखान्यातील कामगार भरतीत परप्रश्नंतीयांचे प्रमाण अधिक असल्याच्या विरोधात भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठवडय़ात काढण्यात आलेल्या मोर्चाचा उत्तर भारतीय सभेने निषेध केला आहे. निवड पद्धतीत गैरव्यवहार झाला असल्यास त्याची निश्चितच चौकशी करण्यात यावी पण, विनाकारण लक्ष्य करून उत्तर भारतीयांना त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आल्यास त्याचा विरोध करण्यात येईल, असा इशारा सभेचे अध्यक्ष उमाकांत अग्निहोत्री यांनी एका पत्रकार परिषदेत दिला. आमचा कोणालाही विरोध नसून कोणाच्याही अधिकारावर डल्ला मारण्याचा आमचा प्रयत्नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला रामप्रताप शुक्ला, ठाकूर विजयसिंह, वीरेंद्र शुक्ला, रामसखा शुक्ला, विजय तिवारी, दिनेश मिश्रा, रामलखन तिवारी, अमरीश दुबे, प्रेमप्रकाश दुबे, जय हरिसिंग, ओमप्रकाश पांडे, रामचंद्र यादव, एन.के. सिंग, कृपाशंकर तिवारी, बबलू तिवारी, पंकज मिश्रा आणि विवेक शर्मा आदी उपस्थित होते. शिवसेनेतर्फे हुशार विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

शिवसेनेतर्फे गुणवंतांचा सत्कार
नागपूर, ३० जून/ प्रतिनिधी
दहावीच्या परीक्षेत दक्षिण नागपुरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवसेनेतर्फे सत्कार करण्यात आला. मिहीर महाकाळकरने ९७ टक्के, रूपल मरदा हीने ९२ टक्के गुण घेऊन उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार शिवसेना भवनात करण्यात आला. मिहीर महाकाळकर याचा नागपूर जिल्ह्य़ातून तिसरा, रूपल मरदाचा दुसरा क्रमांक आला. रूपा प्रेरणा, वैभव पंचाळ यांचाही सत्करा करण्यात आला. कार्यक्रमाला शिवसेनेचे विभाग प्रमुख नंदू थोटे, राजेश कनोजिया, निशांत चांदेकर, शंकर बेलखोडे, विलास डोंगरे, शशिकांत ठाकरे, संदीप रोकडे, पिंटू ढोबळे, सिद्धू कोमेजवार आणि जाजू उपस्थित होते.

चामट हायस्कूलचा निकाल ८३.५४ टक्के
नागपूर, ३० जून/ प्रतिनिधी
विठ्ठलराव चामट हायस्कूलचा दहावीचा निकाल ८३.५४ टक्के लागला. अक्षय सुरेश खराबे ८०.४६ टक्के गुण घेऊन प्रश्नवीण्यासह प्रथम तर, कलावती भाऊराव ढोक हिने दुसरा क्रमांक पटकावला. शाळेतून २० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत. विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय त्यांचे पालक, संस्था सचिव ज्ञानेश्वर चामट व के.डी. मुंगळे यांच्यासह सर्व शिक्षकांना दिले.

गुणवंतांचे अभिनंदन आरोही येमदे
नागपूर, ३० जून / प्रतिनिधी
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेत आरोही रामू येमदे या विद्यार्थिनीने ९२ टक्के गुण मिळवून नेत्रदीपक यश संपादन केले. आरोही बजाजनगरातील परांजपे विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही तिने मिळवलेल्या यशामुळे विद्यालयातील शिक्षकांनी तिचे विशेष कौतुक केले.
आकाश गेडाम
प्रतापनगर शिक्षण संस्थेतील आकाश राजेश गेडाम याने दहावीच्या परीक्षेत ९१.२३ टक्के गुण मिळवले. घरची परिस्थिती हलाखीची असून सुद्धा त्याने हे यश संपादन केले आहे.

शकुंतला कांबळे व मंगला धोंड यांचा देहदानाचा संकल्प
नागपूर, ३० जून / प्रतिनिधी

मरणोत्तर पार्थिव वैद्यकीय विद्यार्थ्यांना अध्ययन व अनुसंधानासाठी उपयुक्त व्हावे, या उद्देशाने संत्रा मार्केट, कुंभारपुरातील शकुंतला कांबळे व शंकरनगर येथील निवासी मंगला धोंड यांनी नुकतेच देहदानाचा संकल्प केला आहे. नेत्रदान व देहदान प्रचारक रमेश सातपुतेद्वारा संचालित देहराष्ट्रार्पणच्या स्वेच्छापत्राद्वारे गरजू वैद्यकीय महाविद्यालयाच्या रचनाशास्त्र विभागाला देहदान व महात्मे नेत्रपेढीला नेत्रदान करण्याचा संकल्प कांबळे व धोंड यांनी केला आहे.
निवृत्तांना ऑगस्टमध्ये सुधारित निवृत्तीवेतन
नागपूर विभागातील निवृत्तांना सहाव्या वेतन आयोगानुसार द्यावयाचे निवृत्तीवेतन व अनुषंगिक लाभ मे महिन्यात काही तांत्रिक अडचणींमुळे देता आला नसल्याचे लेखा व कोषागारे संचालनालय, नागपूर यांनी कळवले आहे. हा लाभ आता ऑगस्टमध्ये देण्यात येणाऱ्या जुलै महिन्याच्या निवृत्ती वेतनासोबत देण्यात येणार आहे.

पोलीस निरीक्षक देवलकर यांचे अभिनंदन
नागपूर, ३० जून / प्रतिनिधी
दशमेश ट्रान्सपोर्टमध्ये नेपाळी गुरखांनी केलेल्या चोरीचा छडा लावल्याबद्दल पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब देवलकर यांचे नागरिकांतर्फे अभिनंदन करण्यात आले. गुरखांनी दशमेश ट्रान्सपोर्टमध्ये केलेल्या ५ लाख ४७ हजाराच्या चोरीचा तडा पाचपावली पोलिसांनी तत्परतेने लावल्यामुळे वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब देवलकर यांचे विदर्भ प्रदेश विकास परिषदेतर्फे अभिनंदन करण्यात आले. परिषदेच्या वॉर्ड अध्यक्ष सपना तलरेजा यांनी महिला मंडळासह देवलकर यांचे अभिनंदन केले. शहरात नेपाळी आणि बांगलादेशींचे होत असलेले स्थलांतराकडे तलरेजा यांनी लक्ष वेधले, तसेच लहान मुलांना पुढे करून भीक मागणाऱ्यांची समस्येवरही त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. महिला मंडळाच्या नंदा पाटील, कौशल्या, वत्सला पाटील, नंदा लांडगे आदी यावेळी उपस्थित होत्या.

सांख्यिकी दिन उत्साहात
नागपूर, ३० जून / प्रतिनिधी
आयुक्त कार्यालयाच्या इमारतीतील अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या प्रश्नदेशिक कार्यालयात प्रसिद्ध संख्याशास्त्रज्ञ दिवं. प्रश्ने.पी.सी. महालनोबीस यांच्या १६६ व्या जयंती दिनानिमित्त सांख्यिकी दिन साजरा करण्यात आला. यावेळी विज्ञान संस्थेच्या अधिव्याख्याता डॉ. एन.एन. कस्तुरीवाले प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या प्रश्नदेशिक कार्यालयाचे सहसंचालक धनंजय सुटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाला वस्त्रोद्योग संचालनालयाचे उपसंचालक एस.आर. भांगरे, प्रश्नदेशिक कार्यालयातील संशोधन अधिकारी एस.ए. भलावी प्रश्नमुख्याने उपस्थित होते. सहायक संचालक माधुरी माणिककुंवर यांनी डॉ. कस्तुरीवाले यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमाचे संचालन संजय कडू यांनी केले.

भारतीय सत्संग सत्सेवा संघटना विधानसभा निवडणूक लढवणार
नागपूर, ३० जून / प्रतिनिधी
भारतीय सत्संग सत्सेवा संघटना आगामी विधानसभा निवडणूक नागपुरातून लढवणार असल्याचे या संघटनेचे अध्यक्ष बळवंत निवांत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. लोकप्रतिधींबद्दल लोकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा, ही या मागील इच्छा असल्याचे स्पष्ट करून निवांत म्हणाले, लोकसभा आणि विधानसभेत पवित्र व उदात्त वातावरण निर्माण व्हावे, कामकाज सुरू होताना व संपतांना दोन मिनिटे ईश्वराचे मौन चिंतन व्हावे, दारूबंदी पूर्णत: अमलात यावी, त्यातून मिळणाऱ्या कराची भरपाई स्वीस बँकेतून व्हावी. दारिद्रय़ रेषेखालील लोकांना वैद्यकीय सेवा मोफत मिळावी यासाठी प्रयत्न केले जातील. समाजातील सर्व लोकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळावे, या व इतरही समाजाच्या हितासाठी संघटनेने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचे निवांत म्हणाले.

गरीब महिलांना फळांचे वाटप
नागपूर, ३० जून/ प्रतिनिधी

सचिन तेंडुलकर फॅन्स असोसिएशनतर्फे मोलमजुरी करणाऱ्या महिलांना राणी दुर्गावती चौकात शालोपयोगी वस्तू व फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी असोसिएशनचे संस्थापक युवराज गाडगे, सदस्य सुरेंद्रपाल सिंग छटवाल, हातीम भाई उज्जनवाला, संजय बोकडे, खुशाल गजभिये, उमेश खिलवानी, अ‍ॅन्ड्रज फान्सीस प्रमोद देशमुख, राजेश यादव उपस्थित होते.गाडगे म्हणाले, महिलांना शालोपयोगी वस्तू यासाठी देण्यात आल्या की, त्यांनी त्यांच्या मुलींना चांगले शिक्षण द्यावे, अशी अपेक्षा आहे. भविष्यात त्यांच्यातूनच कल्पना चावला, इंदिरा नुयी, चंदा कोचर, किरण बेदी, अरुंधती रॉय, झुल्लन गोसावी अशा कर्तृत्ववान महिला घडाव्या. महिलांनी मुलींना शिक्षणासाठी भरपूर प्रश्नेत्साहन देण्याची गरज आहे. असोसिएशनतर्फे बारावीच्या परीक्षेतील नेत्रदीपक यश मिळवल्याबद्दल अलमास, अश्विनी मराठे, श्रद्धा पनगंठीवार यांना हार्दीक शुभेच्छा देण्यात आल्या. संचालन कन्हैया वर्मा यांनी केले. जितू लालवानी यांनी आभार मानले. सुबान कुरैशी, कैलास जाधव, इकबाल भाई, मनोज बोंद्रे, यशवंत जांभुलकर, अमोल बागडे, पिंटू जनबंधू, प्रकाश हेडाऊ आणि बंटी समर्थ आदींचे यावेळी सहकार्य लाभले.

बियाणे व खत उपलब्ध करून देण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
नागपूर, ३० जून / प्रतिनिधी

ऐन पेरणीच्या वेळी शेतक ऱ्यांना बी-बियाणे व खताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे तो शासनाने तात्काळ उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी माजी खासदार प्रकाश जाधव यांनी सावनेरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.शेतकरी पेरणीसाठी तयार असताना बी-बियाणे व खतांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. प्रकाश जाधव म्हणाले, अनेकदा शेतक ऱ्यांच्या अशिक्षिततेचा, अज्ञानाचा फायदा उठवून प्रमाणित न केलेल्या खतांचा, बी-बियाण्यांचा पुरवठा खुल्या बाजारातून होतो. अनेकदा पेरले ते उगवत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. शेतक ऱ्यांची फसवणूक होऊ नये या दृष्टीने सरकारने पावले उचलावी, अशी मागणी जाधव यांनी केली. नेहमीप्रमाणे बी-बियाणे आणि खताचा अनधिकृत तुटवडा निर्माण करून वाटेल त्या भावाने बी- बियाणे व खताची विक्री होऊन पुन्हा शेतक ऱ्यांची फसवणूक होईल का, अशा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला. हंगामाच्या तोंडावर बी-बियाणे, खते विक्रेत्यांवर कारवाई करणे गरजेचे असून त्या दृष्टीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जाधव यांनी केली. यावेळी उपजिल्हा प्रमुख अशोक झिंगरे, प्रवीण बेलसरे, वंदना लोणकर, माधुरी चौधरी, दत्ता धोचे, सुरेश लंगडे, घनश्याम मक्कासरे उपस्थित होते.

हुडको कॉलनीतील रस्त्याचे काम तातडीने करण्याची मागणी
नागपूर, ३० जून / प्रतिनिधी
नागसेननगरमधील एमआयजी व एलआयजी हुडको कॉलनीत मागील दोन महिन्यापासून कासवगतीने सुरू असलेले रस्ता रुंदीकरणाचे काम त्वरित करण्यात यावे. रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे रहिवाशांना त्रास होत असल्याची तक्रार वॉर्ड सुधार कृती समितीने केली आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामाकरता एमआयजी व एलआयजी येथील इमारत क्र. १ ते १२ पर्यंतच्या तळमजल्या वरील गाळेधारकांचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. बांधकाम पाडण्यात आल्यामुळे मलबा, विटा व इतर साहित्य गाळेधारकांच्या घरासमोर पसरले आहे. रस्ता रुंदीकरणाचा ठेका मनपाने हैदराबाद येथील ठेकेदाराला दिला आहे. याकरता सुमारे ८० लाखाचा खर्च आहे पण, ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे नागपुर सुधार प्रन्यासतर्फे टाकण्यात आलेली ड्रेनेज लाईन फुटली. त्यामुळे जागोजागी सांडपाणी जमा होत आहे. रस्ता रुंदीकरण करताना नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यात येत नसल्यामुळे पावसाळ्यातील पाणी सडकेवरच जमा होण्याची भीती या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही सर्व कामे पूर्ण करावी, अशी मागणी वॉर्ड सुधार कृती समितीचे अध्यक्ष असंघ रामटेके, रामसुमेर प्यासी, राजेश नारनवरे, विक्की मेश्राम, रवी सहारे, शंकर सहारे, अरूण साखरे आदी पदाधिकारी व सदस्यांनी केली आहे.

उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री निकोसे यांची रिनायसन्स महाविद्यालयाला भेट
नागपूर, ३० जून / प्रतिनिधी

उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री यशवंत निकोसे यांनी रिनायसन्स कॉलेज ऑफ कम्प्यूटर सायन्स अ‍ॅन्ड अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी या महाविद्यालयास नुकतीच सदिच्छा भेट दिली. महाविद्यालयाचे संचालक वाल्मिक जांभूळकर व संस्थेचे अध्यक्ष अशोक गोकुलदास गावंडे यांनी त्यांचे स्वागत केले. सद्याच्या परिस्थितीत संगणकाशी निगडीत असलेल्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा आहे. सरकारी व नावाजलेल्या खासगी कंपन्यातील नोकरीकरता व व्यवसायाकरता या अभ्यासक्रमाचे फार महत्त्व आहे, असे निकोसे म्हणाले. या महाविद्यालयाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून चालवण्यात येणाऱ्या संगणकाशी निगडीत विद्या शाखा उत्तर नागपुरातील मागासवर्गीय व इतर समाजातील विद्यार्थ्यांच्या दाराशी आणून सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे, याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे राज्यमंत्री निकोसे म्हणाले.

मोतीबाग रेल्वे आरक्षण केंद्रावर दलालास अटक
नागपूर, ३० जून/ प्रतिनिधी

रेल्वेच्या तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्या एका दलालास आज मोतीबाग आरक्षण केंद्रावर अटक करण्यात आली. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप कुमार मोतीबाग आरक्षण केंद्राचे निरीक्षण करण्यासाठी गेले होते. निरीक्षण करताना त्यांना तेथे एक तरुण संशयास्पद स्थिती आढळून आला. त्याची विचारपूस करत असताना तो तरुण पळून जावू लागला. प्रदीप कुमार यांनी त्याला पकडून रेल्वे सुरक्षा दलाच्या स्वाधीन केले. अटक झालेल्या तरुणाचे नाव आकाश गजभिये असून तो पवन नगर येथील रहिवासी आहे. त्याच्याजवळून चार तिकिटे, तीन रद्द केलेली तिकिटे सापडली. अधिक विचारपूस केल्यानंतर त्याने तिकिटांचा काळा बाजार करीत असल्याचे सांगितले. रेल्वे सुरक्षा दलाच्या मोतीबागचे ठाण्याचे ठाणेदार जी.ए. गरकल या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

तरुणाची आत्महत्या; लॉटरी दुकानदाराविरुद्ध गुन्हा
नागपूर, ३० जून / प्रतिनिधी

एका तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी जरिपटका पोलिसांनी एका लॉटरी दुकानदाराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. मनीष देविदास झोडापे (रा़ मिसाळ ले-आऊ ट) याने तीन जूनला पहाटे पाच वाजताच्या सुमारास घरी छताच्या बांबुला पांढऱ्या दुपट्टय़ाने गळफास घेऊन आत्महत्या केली. जरिपटका पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मनीष हा लकी ऑनलाईन या लॉटरीच्या दुकानात नोकर होता. दुकानात रोज लॉटरी घ्यायला येणारा बबलु महावीरप्रसाद शर्मा (रा़ वैशालीनगर) याच्याकडे ६५ हजार रुपयांची उधारी झाली. ‘ही रक्कम देतो’, असे म्हणत मनीषला तो त्याच्या घरी घेऊन गेला. मात्र, रक्कम न देता बबलू पळून गेला. एवढी उधारीची रक्कम पाहून दुकान मालक चंदु ऊर्फ चतुर्भुज नामदेव हरसुलकर (रा़ वैशालीनगर) हा संतप्त झाला. त्याने मनीषला अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. दुसऱ्या दिवशीपर्यंत ही रक्कम आणून न दिल्यास मारून टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे अपमानित झालेल्या मनीषने आत्महत्या केल्याची तक्रार त्याचे वडील देविदास झोडापे यांनी केली. या तक्रारीवरून जरिपटका पोलिसांनी आरोपी चंदु ऊर्फ चतुर्भुज नामदेव हरसुलकर व बबलु महावीरप्रसाद शर्मा (दोघेही रा़ वैशालीनगर) या दोन आरोपींविरुद्ध मनीषला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

समारोप सोहोळ्यादरम्यान आयोजित नाटकातील एक दृश्य.
बहुजन रंगभूमीच्या शिबिराचा समारोप
नागपूर, ३० जून/प्रतिनिधी
बहुजन रंगभूमीद्वारा आयोजित उन्हाळी नाटक, नृत्य, चित्रकला व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिराचा समारोप कोराडी येथील मनोरंजन क्लब क्र.२ मध्ये करण्यात आला. नागपूर व कोराडी या दोन विभागातंर्गत आयोजित शिबिरात सुमारे शंभर कलावंत सहभागी झाले होते. शिबिरात लेखन, दिग्दर्शन, अभिनय व इतर बाबींवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. समारोप कार्यक्रमाला संस्कृती रहाटे, पी. इंगळे, माधवी जांभूळकर, विरेंद्र गणवीर, एम.एस. खरकर, नरेंद्र तलैय्या, विजय मानकर उपस्थित होते. समारोप कार्यक्रमाचे संचालन कपिल मडकवार यांनी केले. जीवराज काळे यांनी आभार मानले.
कामठीतील तरोडी-टेमसना मार्गाची दुरूस्ती करण्याची मागणी
कामठीतील तरोडी ते टेमसना या रहदारीच्या मार्गाचे काही महिन्यांपूर्वीच खडीकरण करण्यात आले पण, आता या मार्गाची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यापूर्वी बांधकाम विभागाने या मार्गाचे डांबरीकरण करावे, अशी मागणी शिवसेनेचे कामठी उपतालुका प्रमुख विजय चिकटे यांनी केली आहे. या परिसरातील नागरिकांना या मार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही. दवाखाना, शाळा, कार्यालयांमध्ये जाण्यासाठी हा एकच मार्ग आहे. त्यामुळे लवकरात लवकर या मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी गणपत डेरे, बंडु चिकटे, अनिल खोंडे, अनिल कडू, सुनील ठाकरे, सुरेश देवगडे आदींनी केली आहे.

विवाहितेचा मृत्यू; पती व सासूवर गुन्हा
नागपूर, ३० जून / प्रतिनिधी
एका विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी जरिपटका पोलिसांनी तिचा पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रज्ञा अश्वीन डोंगरे (रा. इंदोरा) ही तिच्या घरी स्वयंपाक करीत असताना अचानक जळाली. तिला प्रथम मेयो व तेथून गजभिये रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना सोमवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. तिचा पती आरोपी अश्वीन विनोद डोंगरे व त्याची आई यशोदा विनोद डोंगरे (दोन्ही रा़ इंदोरा) या दोघांनी मारहाण केली तसेच शारीरिक व मानसिक त्रास दिल्यामुळे प्रज्ञाने आत्महत्या केली, अशी तक्रार शीला विजय घरडे (रा प्रशांतनगर, अमरावती) यांनी केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अश्वीन विनोद डोंगरे व त्याची आई यशोदा विनोद डोंगरे (दोन्ही रा़ इंदोरा) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला़

मुलींना पळवून नेल्याची आईची तक्रार
नागपूर, ३० जून / प्रतिनिधी
दोन मुलींना पळवून नेल्याच्या त्यांच्या आईच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. २३ जूनला सायंकाळी ही महिला कामावर गेली असता घरी असलेल्या तिच्या सोळा आणि सतरा वर्षाच्या दोन मुलींना आरोपी रवी नागेल (रा़ सोमलवाडा) व त्याचा मित्र प्रसन्ना या दोघांनी पळवून नेले, अशी तक्रार मुलींच्या आईने केली. या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला़