Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

जीवन दर्शन
नाम तुझे सार

अंत:करणातला भाव निर्माण होण्याचे मुख्य साधन नामस्मरण. कबीर सांगतात, ‘‘नाम हे तेल असून त्यात मनाची वात भिजवली की देवरूपाची ज्योत आपोआप पेटेल.’’ नाम हे सगुण आणि निर्गुण यांचे प्रबोधक आहे. याला पुरंदरदास ‘दिव्य नाम’ म्हणतात. गुरुदेव रानडे याला ‘सबीज’

 

नाम म्हणतात. म्हणजे गुरुकृपा व साधन यांच्या योगे येणारा अनुभव. ‘ज्या नामाने देवाची प्रचिती येते तेच नाम खरे’ असा गुरुदेव रानडय़ांचा सिद्धान्त आहे. दिव्य शक्तीचे वाहक नाम आहे. सबीज नामात स्फोटशक्ती आहे. ती अनंत रूपांत अवतरते. गुरुदेवांच्या तत्त्वज्ञानाचे एक भाष्यकर ग. वि. तुळपुळे म्हणतात, ‘‘शेत उत्तम तयार केले तरी बीज दुसऱ्यापासून आणावे लागते. ज्याच्या शेतात ते पिकून चांगले पक्व झाले असेल तोच ते देऊ शकतो. हुरडा पेरून उगवत नाही. चांगली ज्वारीच पेरावी लागते. त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्या क्षेत्रात देव उत्तम प्रकारे पिकविला आहे, त्यांच्याकडून बीजनाम मागून घ्यावे लागते. सद्गुरू बीज देतात. पोती भरून फुकट खायला ज्वारी देत नाहीत. ती राबून पिकविली पाहिजे.’’ याचा अर्थ नीट ध्यानात आला, की ‘उघडे मंत्र’ व्यर्थ होतात. ‘नाम फुकाचे’ अशासाठी; संत कृपाळू असल्याने ते कुणालाही देतात. फुकाचे नाही अशासाठी, की नामाचे स्मरण ठेवले नाही तर ते फुकट जाते. नाम मनानेच करावे. म्हणजे उचित भाव येतो. ठराविक नेमाने नाम येते. नामाचा मानस उच्चार झाला पाहिजे. नामस्मरण ही मनाची एकाग्रता साधण्याची क्रियापद्धती आहे. देवाच्या रूपावर लक्ष असले की नामानुसंधान घट्ट होते. गुरुदेव रानडे म्हणतात, नामस्मरणात मेरुमणि नसलेली माळ वापरावी. म्हणजे जपसंख्येचा अहंकार नाहीसा होतो. संधिकालातला नेम गुरुदेव महत्त्वाचा मानतात. हा संधिकाल जागृती व सुषुप्ती यातला होय. रात्री झोप येण्याच्या क्षणी व सकाळी जागृती येण्याच्या क्षणी होणारे नामनेम महत्त्वाचे आहे. गुरुदेव म्हणाले, ‘‘पुष्कळ मंडळी आली म्हणजे सप्ताह चांगला झाला असे नाही. पुष्कळ साधकांनी एकत्र जमून नेम केला म्हणजे सप्ताह चांगला झाला.’’ म्हणून संतश्रेष्ठ ज्ञानदेव म्हणतात, ‘सार सार सार, विठोबा, नाम तुझे सार’.
यशवंत पाठक

कुतूहल
दीर्घिकांची निर्मिती
दीर्घिकांची निर्मिती केव्हा व कशी झाली?

दीर्घिकांच्या निर्मितीची सुरुवात ही कोणत्या कारणाने झाली आणि त्यांचा जो आकार आपल्याला दिसतो तो तसा का आहे हे शास्त्रज्ञ नेमकं सांगू शकत नाही. दीर्घिकांची निर्मिती केव्हा झाली आणि त्यांची उत्क्रांती कशी झाली हे मात्र सांगता येतं. ही निर्मिती वायूच्या महाकाय ढगांच्या आकुंचनातून झाली असावी. विश्वनिर्मितीनंतरच्या पहिल्या काही अब्ज वर्षांत या निर्मितीला लागणारे वायू मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होते. या काळातच ही निर्मिती झाली असावी. एखादी दीर्घिका निर्माण होण्यासाठी लागणारा प्रत्यक्ष काळ हा काही कोटी वर्षांचा असावा.
विश्वाची निर्मिती एका महास्फोटातून सुमारे १४ अब्ज वर्षांपूर्वी झाली. या महास्फोटानंतर सर्वप्रथम हायड्रोजन आणि हेलियम हे वायू अस्तित्वात आले. यानंतर विश्वातील अनेक भागांत काही कारणांमुळे अस्थिरता निर्माण होऊन या वायूच्या ढगांचे अधिक घनतेचे वेगवेगळे गट निर्माण झाले. (या गटांना शिशु अवस्थेतील दीर्घिका म्हणता येईल.) या अधिक घनतेच्या जागी गुरुत्वाकर्षणही अधिक असल्यामुळे अधिकाधिक वायू तेथे खेचले गेले. त्यानंतर हा ढग स्वत:भोवती फिरू लागला. ढगाच्या या फिरण्यामुळे त्याचा मधला भाग पसरत जाऊन ढगाला तबकडीचा आकार प्राप्त झाला. तसेच या ढगातील वेगवेगळय़ा भागातही वायूंचे छोटे ढग तयार होऊ लागले आणि त्यांच्यापासून ताऱ्यांची निर्मिती झाली. म्हणजे दीर्घिकांचे स्वरूप हे मुख्यत: वायूचे मेघ आणि अनेक तारे यांचे अस्तित्व असलेला एक महाकाय फिरता ढग असे असते. दीर्घिकेतील हे सर्व घटक एकमेकांशी गुरुत्वाकर्षणाने जखडलेले असतात. दीर्घिकांत तारे निर्माण होण्याची क्रिया ही दीर्घिकेत पुरेसा वायू शिल्लक असेपर्यंत चालू राहते. अनेक दीर्घिकांच्या केंद्राशी सूर्याच्या लक्षावधीपट वजन असणारे अतिप्रचंड कृष्णविवर असू शकते.
अरविंद परांजपे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दिनविशेष
वसंतराव नाईक
१ जुलै १९१३ हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस. कृषिक्षेत्रातील योगदानामुळे त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात कृषिदिन म्हणून साजरा केला जातो. विदर्भातील यवतमाळ जिल्हय़ातील गहुली या गावी त्यांचा जन्म झाला. वसंतरावांनी नागपूरच्या मॉरिस कॉलेजातून बी.ए.ची पदवी संपादन केली. पुढे ते वकील झाले. तो काळ स्वातंत्र्याच्या चळवळीने मंतरलेला. स्वातंत्र्याच्या चळवळीत ते सहभागी झाले. पुढे राजकारणात उडी घेतली. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यावर ते महसूलमंत्री म्हणून कार्यरत होते. १९६३ ते १९७५ ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. सलग बारा वर्षे मुख्यमंत्रिपदी राहण्याचा त्यांचा हा विक्रम आजही अबाधित आहे. या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा घडवून आणल्या. त्यांच्या काळात चार कृषी विद्यापीठांची स्थापना झाली. त्यामुळे कृषी संशोधनाला चालना मिळाली. शेतीसाठी वीज, पाणी तसेच अवजारांसाठी कर्ज देण्याची तरतूद केली. महाराष्ट्रात संकरित पिकाची मुहूर्तमेढ रोवून हरितक्रांतीचे पर्व सुरू केले. शेतीबरोबर दुग्धव्यवसायाला चालना दिली. पाझर तलाव व वसंत बंधारा यांचे जनकत्व त्यांच्याकडे जाते. रोजगार हमी योजनाही त्यांनीच राबवली. पंचायत राज सुरू करण्याचे श्रेयही त्यांच्याकडे जाते. राजकारणाचे अनेक चढउतार त्यांनी पाहिले. मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यावर लोकसभेत खासदार म्हणून ते निवडून आले. अखेपर्यंत कार्यरत असणाऱ्या वसंतराव नाईकांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाची कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली.
संजय शा. वझरेकर

गोष्ट डॉट कॉम
खबदाडीतले डोळे

सुट्टीत आजोबांकडे छोटय़ा खेडेगावात आलेला उमेश मित्रांबरोबर खेळताना वाडय़ामागच्या कोठीच्या खोलीत येऊन लपला. बराच वेळ तो कोणालाच सापडत नव्हता. तोही कोठीच्या बाहेर येत नव्हता. कोठीच्या वरच्या बाजूला खबदाडातून चार डोळे त्याच्याकडे टक लावून बघताना त्याला दिसले. तो घाबरला. धावत आजोबांकडे आला. आजोबा म्हणाले, अरे ती गव्हाणीतल्या घुबडांची पिलं आहेत. त्यांचे आई-बाबा त्यांच्यासाठी खाद्य शोधायला गेले असतील. संध्याकाळी येतील. ‘घरी काम करणारा पांडोबा म्हणाला, उमेशदादा, घुबड रात्री घुऽऊ घुऽऽऊ आवाज करतं.’ उमेशची मोठी बहीण सुमिता मोठी धीट होती. ती म्हणाली, घुबडांचा आवाज ऐकायला आणि मोठी घुबडं पाहायला आपण कोठीतच झोपू या. पांडोबाचा पोरगा शंकर म्हणाला, मी पण राहणार तुमच्याबरोबर.अंधार वाढला. तसतशी मुलांची उत्सुकता वाढू लागली. तेवढय़ात पिलांच्या दिशेने घुऽऊ घुऽऽऊ असा आवाज ऐकायला येऊ लागला. सगळय़ांच्या नजरा तिकडे वळल्या. मांजराच्या पावलांनी सगळे एकत्र गोळा झाले. घुबडे त्यांच्या डोळय़ांत डोळे घालून पाहात होती. आपल्या बाळांना काही धोका तर नाही ना? मुले उठली आणि हळूहळू दुसऱ्या बाजूकडे निघाली. दोन्ही घुबडे त्यांच्याकडे पाहात मान वळवत होती आणि काय चमत्कार, मुले त्यांच्या पाठीमागे पोहोचली. तेव्हा घुबडांनी मान ९० अंशात पूर्ण मागे वळवली. ‘भुतं नाहीत ना ही’ उमेश कुजबुजला. ‘नाही रे. ते आपली मान पूर्ण मागे फिरवू शकतात. भित्रा कुठला.’ सुमिता दबक्या आवाजात खेकसली. आणलेले खाद्य घुबडे आपल्या बाळांना भरवत होती. तेवढय़ात खस्फस् झाली. छोटय़ा उंदरांची पळापळ सुरू झाली. घुबडांनी उंदरांवर झडप घातली. पिलांनी आणि मोठय़ा घुबडांनी उंदरांच्या मेजवानीवर ताव मारला. बराच वेळ यात गेला होता. सगळय़ाच मुलांची थोडी चुळबुळ सुरू झाली. पावलांचा आवाज, दबक्या आवाजातली बोलणी.. तो एवढासा आवाजही घुबडांना अस्वस्थ करायला, धोक्याची सूचना मिळायला पुरेसा होता. आपल्या बाळांना धोका आहे म्हणून घुबडे धास्तावली. दोन्ही घुबडे सावध झाली. त्यांचे कान जनावरांसारखे दिसायला लागले. कान मोठे झाले, कारण कानावरचा पडदा उडताना बाजूला झाला. पिलांना घेऊन भरारी मारली. घुबडे आकाशातून उडत होती. आपल्यामुळे आजोबांच्या कोठीच्या खोलीत राहणारी घुबडे आणि त्यांची गोजिरवाणी पिले दूर गेली म्हणून सुमिता, उमेश, शंकर फार हिरमुसले. पशुपक्षी, कीटक यांना आपण जपायला हवे. त्यांना असुरक्षित वाटेल असे काही आपल्याकडून होऊ नये. त्याच्या राहत्या जागेपासून दूर जायला आपल्यामुळे भाग पडले, असे होणे आपल्याला गुन्हा वाटायला हवा. आपण त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करायला हवे. आजचा संकल्प : मी प्राणिमात्रांची काळजी घेईन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com