Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

कारवाईच्या भीतीने अधिकाऱ्यांचे गणेश नाईकांकडे आर्जव
जयेश सामंत

नवी मुंबई महापालिकेतील आजवरचा सर्वात मोठा घोटाळा म्हणून चर्चेत आलेल्या अतिक्रमण घोटाळ्यातील मुख्य आरोपी एच. बी. भिसेला अटक होताच, या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचाही लवकरच पर्दाफाश होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विशेष म्हणजे, या घोटाळ्यामुळे गोत्यात आलेल्या महापालिकेतील सात आजी-माजी विभाग अधिकाऱ्यांनी या प्रकरणातून सुटका व्हावी, यासाठी थेट जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे धाव घेतल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. दादा आम्हाला वाचवा, असे आर्जव या अधिकाऱ्यांनी नाईकांकडे केल्याच्या सुरस कहाण्या आता महापालिका वर्तुळात चर्चेत आल्या आहेत. विशेष म्हणजे, या घोटाळ्यातील कारवाईची कुऱ्हाड आपल्यावर कोसळू नये, यासाठी एका माजी उपायुक्ताने तर गुन्हेगारी क्षेत्रातील भाईमंडळींशी टच असलेल्या शहरातील एका बिल्डर डॉनकडेही जोडे झिजविल्याची चर्चा आहे.

गुन्हेगारांचा गुलाबरावांना हिसका
शहरातील गुन्हेगारी वाढली

नवी मुंबई/प्रतिनिधी : नवी मुंबईतील वाढत्या गुन्हेगारीमुळे एकीकडे शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले असताना ऐरोली परिसरात २०-२५ वयोगटातील तरुणांकडे गावठी कट्टे, रिव्हॉल्व्हर यासारखी प्रश्नणघातक शस्त्रे राजरोसपणे सापडू लागल्याने या भागात कायदा-सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. विशेष म्हणजे, ज्येष्ठ पत्रकार हेमंत जुवेकर यांच्यावर गुरुवारी रात्री लुटारूंनी केलेल्या हल्ल्यामुळे शहरात गुन्हेगारांचा वावर किती वाढला आहे, हेदेखील स्पष्ट झाले असून, स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

तीन कंपन्यांत वेतनवाढीचा करार
उरण/वार्ताहर - नवी मुंबई जनरल कामगार संघटना आणि हिंद टर्मिनल प्रश्न. लि. भेंडखळ, मास्टर मरिन सव्‍‌र्हिसेस व यू. एल. ए. कंपनीच्या व्यवस्थापनाबरोबर नुकताच वेतन करार झाला. कामगार नेते महेंद्र घरत, संघटनेचे सल्लागार रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या वेतनवाढीच्या करारामुळे महिला सफाई कामगारांसह अनेक कामगारांना मासिक ३६०० रुपये वेतनवाढ व इतर सेवा-सुविधांचा लाभ होणार आहे. तीन वर्षांच्या वेतनवाढीच्या करारामुळे ठेकेदारीत काम करणाऱ्या असंघटित कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

नवी मुंबई मराठी पत्रकार संघ निवडणूक विकास महाडिक यांची अध्यक्षपदी फेरनिवड
बेलापूर/वार्ताहर - नवी मुंबई मराठी पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी नुकतीच वाशी येथे संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आली.
या संघाच्या अध्यक्षपदी विकास महाडिक (लोकसत्ता) यांची फेरनिवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी विनय म्हात्रे (आयबीएन लोकमत), सचिव अंकुश वैती (वार्ताहर), सहसचिव मनीषा ठाकूर (सकाळ), खजिनदार चतुर्भुज लिगाडे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच सदस्यपदी नीलेश पाटील (सामना), विश्वनाथ सावंत (ई टी. व्ही. मराठी), बी. बी. नायक (टाइम्स ऑफ इंडिया), नागदेव मोरे (लोकमत), ज्ञानेश चव्हाण (सकाळ), विनायक पाटील (स्टार माझा), विकास मोकल (कृषीवल), विजय भोर यांची नियुक्ती करण्यात आली.गृहहीन पत्रकारांसाठी गृहनिर्माण प्रकल्प राबविणे आणि नवी मुंबईत भव्य पत्रकार भवन निर्माण करणे हे कार्यकारिणीचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे संघाचे सचिव अंकुश वैती यांनी सांगितले.

रोटरीच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नरपदी डॉ. दीपक पुरोहित
पनवेल/प्रतिनिधी - पनवेलमधील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ आणि शल्य चिकित्सक डॉ. दीपक पुरोहित यांची रोटरी क्लबच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नरपदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे या पदी निवड होणारे रायगड जिल्ह्यातील ते पहिलेच रोटरियन ठरले आहेत. रायगड आणि पुणे जिल्हा मिळून रोटरीचा हा डिस्ट्रिक्ट असून, या परिसरातील सर्व रोटरी क्लबचे प्रमुखपद डॉ. पुरोहितांकडे आले आहे. बुधवारी १ जुलै रोजी ते आपल्या पदाची सूत्रे स्वीकारणार असून, पहिल्याच दिवशी पनवेल परिसरात एकूण चार ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचा कार्यक्रम त्यांनी आखला आहे. जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था असणाऱ्या रोटरी क्लबने पोलिओला जगातून हद्दपार करण्यासाठी गेली २४ वर्षे तन-मन-धन अर्पण केले आहे, असे सांगत भविष्यातही आरोग्यविषयक सेवा आणि सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी रोटरी कार्यरत राहील, असे ते म्हणाले. रोटरी क्लबतर्फे यंदापासून पनवेलमधील वि. खं. विद्यालय, याकूब बेग, बांठीया विद्यालय आणि कोळेश्वर विद्यालय येथे पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे, तसेच वर्षभरात ५५० गरजूंना व्हीलचेअर्सचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.