Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

मीटरविना प्रवासी वाहतूक करणाऱ्या १८ रिक्षाचालकांवर कारवाई
प्रतिनिधी / नाशिक

 

शहरातील बेशिस्त रिक्षा वाहतुकीस शिस्त लावण्याच्या अध्यायात आता आणखी एक नवीन पाऊल उचलण्यात आले असून प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस यांनी मंगळवारपासून संयुक्तपणे रिक्षा मीटर तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत पहिल्या दिवशी मीटरविना प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या १८ रिक्षाचालकांवर ‘मेमो’ बजावण्यात आले आहेत.
शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याच्या प्रक्रियेत रिक्षाचालकांचा मनमानी कारभार हा सध्या सर्वात मोठा अडथळा ठरला आहे. रिक्षा चालकांची दादागिरी आणि नियमांचे उल्लंघन करण्याची मानसिकता मोडून काढण्यासाठी वाहतूक शाखेने आजवर अनेकदा धडक मोहिमा राबविल्या, मात्र रिक्षाचालकांना शिस्त काही लागू शकली नाही, अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे. रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करावे म्हणून मध्यंतरी वाहतूक शाखेने पुढाकार घेत संबंधितांना नियमांचे पालन करण्याविषयी समुपदेशनाचा मार्गही अवलंबिला होता. त्यानंतर क्षमतेहून अधिक प्रवाशांची वाहतूक, गणवेश व कागदपत्रांची अपूर्णता राखणाऱ्या चालकांवर कारवाईचे सत्र सुरू केले. ही मोहीम सुरू असताना प्रादेशिक परिवहन विभागाने मीटरच्या मुद्यावरून रिक्षा चालकांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी वाहतूक पोलिसांची मदत घेण्यात आल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी दिली. मीटरनुसार प्रवासी वाहतूक न करणाऱ्या रिक्षाचालकांची तपासणी यावेळी करण्यात आली. त्यामध्ये १८ चालकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर ‘मेमो’ बजाविण्यात आल्याचे डोळे यांनी सांगितले.