Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

अस्वस्थ शिवसैनिकांसाठी मनसेचे ‘रेड कार्पेट’
प्रतिनिधी / नाशिक

 

लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात झालेला दारूण पराभव आणि त्याची योग्य ती कारणमीमांसा करण्याऐवजी पक्ष संघटना भलत्याच दिशेने भरकटू लागल्याने अस्वस्थ झालेल्या शिवसेनेतील वरिष्ठ पदाधिकारी अन् शिवसैनिकांप्रती मनसेने ‘सॉफ्टकॉर्नर’ ठेवला असून कोणत्याही अटी व शर्ती न टाकता आपल्या पक्षात दाखल होऊ इच्छिणाऱ्यांचे स्वागत करण्याचे ठरवले आहे. जाहीरपणे तसे आवाहन करताना मनसेने नाराज शिवसैनिकांसाठी राजगडाचे दरवाजे खुले केले आहेत. या माध्यमातून शिवसेनेतील नाराजांचा मोठा गट आपल्या जाळ्यात ओढण्यास मनसेने खुली तयारी दाखविल्याने स्थानिक पातळीवर सेनेची कमकुवत झालेली तटबंदी आगामी काळात आणखी ढासळण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
राज ठाकरे यांच्या सततच्या संपर्कामुळे आणि स्थानिक नेतेमंडळींच्या कुशल संघटनामुळे नाशिक हा मनसेचा गड म्हणून ओळखला जातो. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने शिवसेनेपेक्षा हजारो मते अधिक मिळवत त्याचा प्रत्यय आणून दिला आहे. या निवडणुकीत पार तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्या-कार्यकर्त्यांमधील कुरबुरी निवडणुकीच्या निकालानंतर अधिकच वाढल्याचे सांगण्यात येते. या पाश्र्वभूमीवर, येत्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी गेल्या सोमवारी शिवसेनेतर्फे आयोजित तीन पैकी दोन मेळावे रद्द झाले तर मध्य नाशिक क्षेत्रासाठी आयोजित मेळाव्यासही अल्प उपस्थिती लाभली. परिणामी, राजकीय वर्तुळात सेनेतील अंतर्गत खदखद हा चर्चेचा विषय बनला असल्याचे ‘टायमिंग’ अचूक साधत मनसेचे प्रदेश सरचिटणीस वसंत गीते यांनी याबाबतचे सूतोवाच केल्याने त्याला वेगळेच महत्त्व आले आहे.
शिवसेनेसह इतरही पक्षातून येवू इच्छिणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनसेत स्वागत केले जाणार असल्याचे गीते यांनी जाहीर केले. मनसेने आजवर माणसे तोडण्याचे नव्हे तर जोडण्याचे काम केले आहे. त्यामुळे माणसे जोडण्याच्या या प्रक्रियेत शिवसेनेतील जे जुने सहकारी व पदाधिकारी पक्षात प्रवेश करू इच्छित असतील त्यांचे स्वागत केले जाईल. तथापि, त्यांनी कोणत्याही अटी व शर्ती न घालता यावे, अशी आमची भूमिका असल्याचे गीते यांनी सांगितले. शिवसेनेतील अनेक वरिष्ठ नेते व शिवसैनिक मनसेत येण्यास उत्सुक आहेत. परंतु, त्यांची नावे आताच जाहीर करणे योग्य होणार नाही असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेत संघटनात्मक बदलांमुळे निर्माण झालेल्या नाराजीच्या पाश्र्वभूमीवर, मनसेने गुगली टाकून या नाराजीचा लाभ उठविण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिव्हारी लागणारा पराभव स्वीकारावा लागल्यावरही शिवसेनेने त्यापासून धडा तर घेतला नाहीच, शिवाय पराभवाची जबाबदारी स्वीकारण्याचे औदार्य तत्कालीन जिल्हाप्रमुख असणारे उमेदवार दत्ता गायकवाड वगळता कुणी दाखविले नाही. त्यातच आता विधानसभा मतदारसंघनिहाय महानगरप्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा घाट घातला जात आहे. परिणामी, पक्षांतर्गत मतभेद आणखी वाढीस लागल्याचे सांगितले जात असून काही जुन्या शिवसैनिकांसह इतरही नेत्यांनी अन्य पयार्यावर विचारमंथन सुरू केल्याचे बोलले जाते. सेनेतील ही नाराजी मनसेच्याच सर्वाधिक पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे मनसेने उमेदवारी अथवा तत्सम लाभ पदरात पाडून घेण्यासाठी ऐनवेळी दाखल होणाऱ्यांना पक्षात स्थान दिले जाणार नसल्याच्या आपली यापूर्वीची भूमिका काहिशी लवचिक केल्याचे दिसत आहे.