Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

कालिदासदिनाचे कार्यक्रम ठरले केवळ एक उरकणे

 

महाकवी कालिदास यांनी रघुवंशम, कुमार संभवम, ॠतुसहारंग, मेघदूत, विक्रर्मोवर्शिय, आदिज्ञान, शांकुतल, मालदिविकादी विक्रम यासारखी खंड काव्ये लिहिली. या महान कवीचा ‘दिन’ दिमाखदार पध्दतीने होणे गरजेचे असताना सर्वाच्या लेखी केवळ एक ‘आटोपणे’ म्हणूनच त्याकडे पाहिले जाते. नाशिकमध्ये साजरा झालेला यंदाचा कालिदास दिनही त्यास अपवाद ठरला नाही.
महाकवी कालिदास दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय नाटय़ परिषद नाशिक शाखा व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाच्या प्रारंभी शाखेच्या मध्यवर्ती कार्यालयात नटराज पूजन, वसंत कानेटकर, कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यावेळी नाटय़ परिषदेची मोजकीच मंडळी उपस्थित होती. महापालिकेतील अधिकाऱ्यांचा तर पत्ताच नव्हता. यानंतर कार्यक्रमाला नियोजित वेळेपेक्षा दीड तास उशीराने सुरूवात झाली.
स्थायी समिती सभापती संजय बागूल, उपमहापौर अजय बोरस्ते, प्रभारी आयुक्त देवरे, नगरसेविका डॉ. हेमलता पाटील कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
बोरस्ते यांनी आपल्या भाषणात महापालिकेच्या आगामी अंदाजपत्रकात नाशिक ने सांस्कृतिक क्षेत्रात स्वतंत्रपणे वाटचाल करावी यासाठी ५०० आसन क्षमता असलेले स्वतचे वातानुकूलीत नाटय़गृह असावे अशी मागणी केली. बागूल यांनी या मागणीला अप्रत्यक्षपणेही अनुमोदन दिले नाही. शाखेच्या आगामी कार्यक्रमाला आपले सहकार्य असेल, आलेल्या नाटय़प्रेमींचे आभार मानत त्यांनी सर्वाची रजा घेतली.
नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रामदास बरकले यांनी मात्र नाटय़ परिषदेच्या कार्यक्रमाला, उपक्रमाला नाशिककरांची मनापासून साथ मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. मागे एकदा याच व्यासपीठावरून उपेंद्र दाते, प्रेमानंद गज्वी यांना पुरस्कार प्रदान करण्यापूर्वी आपल्या मनोगतात ‘नव्या कलावंताची केवळ पुरेशा मानधना अभावी आम्हाला साथ मिळत नाही, असे सांगितले होते. मात्र नवोदितांनी, नाटय़ प्रेमींनी या प्रवाहात सामील होण्यासाठी परिषदेमार्फत नेमके कोणते उपक्रम राबविले जातात, त्याची माहिती परिषदेच्या मोजक्या लोकांव्यतिरिक्त कोणालाही नसते. अशा स्थितीत रसिकांकडून परिषदेला नेमके काय अपेक्षित आहे?
यानंतर ओवी दीक्षित या बाल कलाकाराने ‘गण नायका, गौरी सुताय’ या नांदीवर नृत्य केले. प्रसन्न नृत्याला रसिकांनी दाद दिली. मध्यंतरानंतर महानगरपालिकेच्या वतीने जिजाई थिएटर्सचे ‘श्यामची आई’ हे बालनाटय़ सादर झाले. तोपर्यंत आधीच्या कार्यक्रमाला गर्दीही जेमतेमच होती. मात्र बालनाटय़ाला बालगोपाळांसह पालक वर्गाने मोठय़ा संख्येने हजेरी लावली.
यानंतर नाटय़ परिषदेच्या वतीने मयुरी थिएटर्सचे ‘ट्रेलर’ हे नाटक सादर करण्यात आले. कालिदासांची आठवण फक्त ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ पुरतीच मर्यादित नाही. यानिमित्ताने परिषद किंवा महानगरपालिका संस्कृत भाषा सभेसह बालकांसाठी संस्कृत शिबीर, एखादे संस्कृत नाटक असे कार्यक्रम घेऊ शकले असते. मात्र दोघांनी आर्थिक बाजूचा विचार करीत ‘गंगेत घोडे न्हाऊन घेतले’. हा संपूर्ण खर्च नाशिक महापालिकेचा होता, मग परिषदेचे सहकार्य कशासाठी ? केवळ एका व्यासपीठासाठी?
नाशिक कवी या संस्थेनेही एका छोटेखानी कार्यक्रमाने ‘कालिदास महोत्सवाला’ सुरूवात केली. या महोत्सवानिमित्त नवोदितांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी ग्रामीण भाग व शहरात ठिकठिकाणी काव्यमेळावा, काव्य मैफलीचे आयोजन करण्यात आले. निव्वळ काव्य वाचन करायचे होते तर ‘कालिदास महोत्सव’ असे लेबल का? नाशिक कवीने काव्य, गझल, कता यांची सीमा कधीतरी ओलांडावी. जुन्या, जाणत्या साहित्यिकांचे स्मरण आजच्या पिढीला व्हावे यासाठी उपक्रम सुरू करावा ही रास्त अपेक्षा. दीपक नाटय़ मंडळाने ‘विक्रमोर्वशिय’ या कालिदासांच्या नाटकाचे नाटय़ वाचन केले. यामध्ये शौनक गायधनी, यशश्री रत्नपारखी, कुंतल गायधनी, पावक गायधनी, नेहा विसपुते, विनीत पैठणे, प्रियंका दळवी, नुपूर विसपुते यांचा सहभाग होता.
चारुशीला कुलकर्णी