Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

नदीजोड प्रकल्पाद्वारे देवळा, सटाण्याचा पाणीप्रश्न सोडविण्याची मागणी
नाशिक / प्रतिनिधी
नदीजोड प्रकल्पाव्दारे देवळा व सटाणा तालुक्यातील पाणीप्रश्न सोडविणे शक्य असल्याने यासंदर्भात तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. दौलतराव आहेर यांनी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली आहे. नदीजोड प्रकल्पासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक जुलैच्या पहिल्या आठवडय़ात प्रस्तावित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचेही डॉ. आहेर यांनी निवेदनात म्हटले आहे.
देवळा व पूर्व भागातील १० गावांना गिरणा नदीतून पाणी पुरवठा केला जातो. ही योजना बरीच जुनी झाल्याने पुरक पाणी पुरवठा योजना सुरू करण्याची परिसरातील जनतेची मागणी आहे. रामेश्वर बंधाऱ्याची उंची वाढवून ही मागणी पूर्ण होऊ शकते. तसेच मालेगाव तालुक्यातील ५६ गांव पाणी पुरवठा योजनाही जुनी झाली असून त्यातील उमराणे व सौदाणे गटातील सोनज, टाकळी, उमराणे, सौंदाणे, शिरसोंडी, वऱ्हाळे, नांदगाव, सावकारवाडी, मांजरे, तिसगाव, गिरणारे, कुंभार्डे, चिंचवे, खारीपाडा आदी २६ गावांसाठी चिंचवे बंधाऱ्याची उंची वाढविल्यास १४४ द. ल. घ. फू. साठा होऊ शकतो, त्यामुळे पुरक पाणी पुरवठा योजना राबविणे शक्य असल्याचेही आहेर यांनी म्हटले आहे.
बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर पोहच कालव्यासाठी आर्थिक तरतूद व नियोजन झाले आहे. तळवाडे बंधाऱ्यापासून पूर पाणी तळवाडे गावाजवळून कालव्याव्दारे वाटोळी नाल्यात सोडण्याची मागणी तळवाडे, टेंभे, बिजोरसे आदी गावांची आहे. देवळा व मालेगाव २६ गावे पाणी पुरवठा योजनेला पुरक योजना राबविण्यासाठी नद्याजोड प्रकल्पांतर्गत कळवण तालुक्यातील बोरदैवत येथून मशाड नाल्याचे पाणी चणकापूर उजव्या कालव्याव्दारे रामेश्वर व चिंचवे बंधाऱ्यात आणल्यास व त्यांची उंची वाढविल्यास दुष्काळी भागासाठी लाभदायक ठरणार आहे. तळवाडे भामेर पोहच कालव्याचे पाणी वाटोळी नाल्यातून तळवाडेपुढील दुष्काळी गावांना दिलासा देणारे ठरणार आहे.
२००५ मध्ये जळगाव व धुळे जिल्ह्य़ात अल्प पाऊस झाल्यानंतर तत्कालिन जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाने पथदर्शी प्रकल्प तयार करून धुळे जिल्ह्य़ात गिरणा व बोरी नदीजोड, मोसम व कनोली नदीजोड, सोनवद प्रकल्प भरणे असे प्रकल्प राबविले. या नदीजोड प्रकल्पांमुळे धुळे जिल्ह्य़ातील ११६ गावांचा पाणीप्रश्न अल्पसा पाऊस पडूनही दूर झाला. जळगाव जिल्ह्य़ातील १६ हजाराहून अधिक विहिरींना पाझराचा फायदा झाला. धुळे, जळगाव जिल्ह्य़ातील पथदर्शी योजनेच्या धर्तीवर इतर जिल्ह्य़ांनीही नदीजोड प्रकल्पाव्दारे पाणी प्रश्न सोडवावेत असे शासनाने परिपत्रकाव्दारे निर्देशित केले आहे. या पथदर्शी योजनेच्या अनुषंगाने बौरदैवतच्या लघु पाटबंधारे योजनेचे अतिरिक्त पाणी देवळा, कळवण, चांदवड, मालेगाव भागातील दुष्काळी भागास उपलब्ध करण्याची मागणी अजित पवार यांच्याकडे १६ मे २००९ रोजी करण्यात आली. त्यानुसार २७ मे २००९ रोजी सदरहू कामाचा विषय जिल्हा नियोजन विकास समितीवर घेण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी २३ जून २००९ रोजी मुंबईत चर्चा केल्यानंतर त्यांनी सदरहू विषय जिल्हा नियोजन समितीच्या आगामी बैठकीत घेण्याचे सूचित केले, तसेच सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याचे मान्य केले, असेही डॉ. आहेर यांनी म्हटले आहे.
सदर प्रकल्पाबाबतचा आराखडा व टिप्पणी तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी उध्र्व गोदावरी प्रकल्प नाशिक विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत. बोरदैवत लघु पाटबंधारे योजनेचे अतिरिक्त पाणी वळविण्याचे काम पूर्ण झाल्यास देवळा, मालेगाव या दुष्काळी भागातील पाणी पुरवठा योजना राबविणे शक्य होणार आहे, असेही डॉ. आहेर यांनी म्हटले आहे.