Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

सुरगाण्याच्या आदिवासी शेतकऱ्यांचा आंतरराज्य अभ्यास दौरा
नाशिक / प्रतिनिधी
अ‍ॅग्रीकल्चर ट्रेनिंग मॅनेजमेंट एजन्सी (आत्मा) अंतर्गत सुरगाणा तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने नुकताच विविध राज्यातील अभ्यास दौरा पूर्ण केला. कृषी विषयक माहितीसाठी या अभ्यास दौऱ्याचे आयोजन तालुका कृषी अधिकारी दिलीप देवरे यांनी केले होते. तालुक्यातील सुमारे ५० शेतकरी दौऱ्यात सहभागी झाले होते, अशी माहिती अभ्यास दौऱ्याचे समन्वयक किशोर भरते यांनी दिली.
दौऱ्याची सुरूवात पुण्याजवळील राजगुरूनगर येथील केंद्रीय लसुण व कांदा संशोधन केंद्राच्या भेटीने झाली. यानंतर पुणे कृषी महाविद्यालयातील फुले व भाजीपाला लागवडीच्या उच्च तंत्रज्ञान प्रकल्पाची माहिती शेतकऱ्यांनी घेतली. गणेशखिंड येथील डाळिंब संशोधन केंद्र, तळेगाव दाभाडे येथील फलोत्पादन प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूरचे गुळ संशोधन केंद्र, वारणा दूध प्रकल्प येथील कामकाजाचीही माहिती शेतकऱ्यांनी घेतली. दुसऱ्या टप्प्यात कर्नाटकातील धारवाडचे कृषी विद्यापीठ, कोरडवाहू फळसंशोधन केंद्र, म्हैसूरचे केंद्रीय रेशीम संशोधन केंद्र, केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन केंद्र, बंगळुरू येथील हॉर्टीकल्चर ट्रेनिंग स्कूल, औषधी वनस्पती उद्यान, तिरुपतीची कोरडवाहू फळबाग लागवड, हैदराबाद कृषी विद्यापीठातील भात संशोधन केंद्र, गुंटूर मसाला पीक संशोधन केंद्र अशा विविध ठिकाणांना भेट देऊन शेतकऱ्यांनी माहिती घेतली. शेवटच्या टप्प्यात परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठातील माहिती तंत्रज्ञान केंद्र, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचे महत्व, अन्न प्रक्रिया उद्योग, शेतीशी निगडित संशोधित औजारे यांची माहिती देण्यात आली. उती संवर्धन केंद्रात शेतकऱ्यांना वनस्पतीच्या कोणत्याही भागापासून रोप कसे तयार करावे, हे सांगण्यात आले. याप्रसंगी शेतकऱ्यांनी उती संवर्धन तंत्रज्ञानापासून तयार करण्यात आलेली जी-९ जातीची केळीची रोपे खरेदी केली. या दौऱ्यात शेतकऱ्यांसमवेत भरते यांच्यासह कृषी विभागाचे प्रमोद गोलाईत, विजय देवरे, अशोक राऊत हे कर्मचारी सहभागी झाले होते.