Leading International Marathi News Daily

बुधवार, १ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा
गैरसोयीच्या मतदान केंद्रांवरील नेमणुकीस महिला कर्मचाऱ्यांचा विरोध
नाशिक / प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना दुर्गम भागात नेमण्यात आल्याने त्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागला. या समस्या आगामी विधानसभा निवडणुकीवेळी दूर न केल्यास महिला कर्मचारी कामकाजावर बहिष्कार टाकतील, असा इशारा नगरसेविका प्रा. देवयानी फरांदे यांच्यासह जलसंपदा खात्यातील महिला कर्मचाऱ्यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी अनेक महिला कर्मचाऱ्यांची नाशिक शहराबाहेर नेमणूक करण्यात आली होती. जिथे फक्त निवडणुकीच्या वेळेसच बस जाते, अशा ठिकाणांचाही त्यामध्ये समावेश होता. लाइट, पाणी, स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही, राहण्यासाठी शाळेच्या खोल्या, दारांना कडय़ा-कुलूप नाही, अशा गैरसौयींचा सामना महिला कर्मचाऱ्यांना त्यावेळी करावा लागला. कर्मचाऱ्यांची तालुक्यापर्यंत ने-आण करण्याची व्यवस्था निवडणूक आयोगाने केली, पण तालुक्यापासून शहरात येण्याची व्यवस्था झाली नाही. मतदानाच्या दिवशी काम संपेपर्यंत रात्रीचे दीड-दोन वाजले. परंतु शहराकडे परत येण्यासाठी कोणतेही साधन उपलब्ध करण्यात आले नव्हते. बहुतेक महिलांना दुसरा दिवस उजाडेपर्यंत तिथेच थांबावे लागले होते. अनेक केंद्रावर एक महिला व बाकी सर्व पुरूष कर्मचारी होते. अशावेळी तिच्या सुरक्षिततेची काळजी कोणी घ्यायची, या प्रश्नांचा निवडणूक आयोगाने विचारच केला नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
गरोदर महिलांचीही नेमणूक करण्यात आली होती. निवडणुकीचे काम महिला नाकारत नाहीत, पण किमान त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी यंत्रणेने घेतली पाहिजे. जिथे लाइट, पाणी, वाहतुकीची व्यवस्था आहे, जिथे आदल्या दिवशी रात्री राहण्यासाठी जावे लागणार नाही, अशा ठिकाणी महिलांना निवडणुकीचे काम देणे गरजेचे आहे. निवडणुकीच्या कामाचा मोबदला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा देण्यात आला व त्याबाबत स्पष्टीकरणही करण्यात आले नाही. काही ठिकाणी तर अद्याप मोबदलाही देण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे एका प्रशिक्षण वर्गाचा मोबदलाही देण्यात आलेला नाही, अशी तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. ५० वर्षांपुढील तसेच आजारी कर्मचारी, गरोदर व लहान मुले असणाऱ्या महिला, निवृत्तीसाठी एक दिवस ते एक वर्षे बाकी राहिलेले कर्मचारी, अशांना निवडणूक कामासाठी नेमण्यात येऊ नये, महिलांना काम द्यायचेच असेल तर शहरात किंवा त्या ज्या गावांमधून आलेल्या आहेत, त्या गावात नेमणूक करण्यात यावी, अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत.